आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्रे ही अतिसंहारक अस्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) या प्रकारात मोडतात. त्यातही जैविक अस्त्रे खऱ्या अर्थाने महाभयंकर आहेत. आण्विक आणि रासायनिक अस्त्रांचे परिणामही भयंकर असले तरी ते ठरावीक भागात मर्यादित असतात आणि काळानुसार ओसरू लागतात. मात्र जैविक अस्त्रे एकदा वापरली की त्यावर वापरणाऱ्याचेही नियंत्रण राहत नाही. अस्त्र म्हणून वापरलेले सूक्ष्मजंतू वारा, पाणी याद्वारे कोठेही पसरू शकतात. रोगाने बाधित झालेल्या व्यक्ती, प्राणी, पक्षी यांच्या प्रवासावर नियंत्रण ठेवता येत नाही. हवामान, तापमान आदी घटकांनुसार जंतूंचे पुनरुत्पादन होऊन नवनव्या प्रदेशात त्यांची लागण होऊ शकते आणि साथी पसरू शकतात. त्यामुळे जैविक अस्त्रांचा भस्मासुर एकदा बंद बाटलीतून बाहेर काढला की त्याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे महाकठीण काम आहे.

रासायनिक अस्त्रांप्रमाणेच जैविक अस्त्रांच्या वापरालाही जुनी परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात असिरियन लोकांनी शत्रूच्या विहिरीत राइ अर्गोट नावाचे सूक्ष्मजीव सोडल्याचे दाखले मिळतात. तार्तारांनी १३४६ साली जिओनीज लोकांच्या ताब्यात असलेल्या क्रिमियातील काफा शहरावरील आक्रमणात प्लेगने बाधित मृतदेह वापरले होते. रशियाचा झार पहिला पीटर याच्या सैन्याने १७१० साली एस्टोनियातील रेवाल या शहरात संरक्षक भिंतींवरून प्लेगने बाधित मृतदेह फेकले होते. त्यामुळे आतील स्वीडिश सैन्यात प्लेगची साथ पसरावी हा हेतू होता.

जैविक अस्त्रांमध्ये रोग उत्पन्न करणारे सूक्ष्मजंतू, त्यांच्यापासून किंवा अन्य प्राण्यांपासून मिळवलेली विषारी द्रव्ये वापरली जातात. जैविक अस्त्रे साधारण पाच प्रकारची असतात. त्यात विषाणू (उदाहरणार्थ एबोला, मारबर्ग, स्मॉलपॉक्स, रिफ्ट व्हॅली, यलो फीव्हर), जीवाणू (उदा. अँथ्रॅक्स, कॉलरा, प्लेग), रिकेट्शिआ प्रकारचे सूक्ष्मजंतू (उदा. टायफस, क्यू फीव्हर, रॉकी माऊंटन स्पॉटेड फीव्हर), बुरशींपासून मिळवलेली विषारी द्रव्ये आणि रायसिन, बोटय़ुलिनम टॉक्झिन, स्टॅफिलोकोकस एंटरोटॉक्झिन, टेट्रोडोटॉक्झिन यांसारख्या विषारी द्रव्यांचा समावेश होतो.

प्रसाराच्या पद्धतीनुसारही जैविक अस्त्रांचे वर्गीकरण केले जाते. इन्फ्लुएन्झा, लासा फीव्हर, क्यू फीव्हर आणि अँथ्रॅक्स हे हवेतून पसरतात. ई-कोलाय, साल्मोनेला, टायफॉइड, कॉलरा हे जंतू पाणी आणि अन्नावाटे पसरतात. तर प्लेग, टायफस, यलो फीव्हर हे कीटक आणि अन्य प्राण्यांमार्फत पसरतात.

एखादा रोग उत्पन्न करणारा सूक्ष्मजंतू जैविक अस्त्र म्हणून वापरायचा असेल तर त्यात काही गुणधर्म असावे लागतात. त्याने कमी वेळात मोठय़ा प्रमाणात रोग उत्पन्न होणे आवश्यक असते. त्याचा हवा, पाणी, अन्नावाटे वेगाने प्रसार झाला पाहिजे. ते जंतू प्रयोगशाळेत वेगाने आणि मोठय़ा प्रमाणावर तयार करता आले पाहिजेत. तसेच त्यांची हाताळणी सोयीची हवी आणि शस्त्रांद्वारे ते जंतू फेकताना त्यांची परिणामकारकता कमी होता कामा नये.

जैविक अस्त्रे प्रयोगशाळेत कमी खर्चात तयार करता येतात. वैद्यकीय किंवा औषधांसाठीच्या संशोधनाच्या नावाखाली त्यांचे उत्पादन लपवता येते. त्यामुळे त्यांना गरिबांची अण्वस्त्रे असेही म्हणतात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com