कुवेतच्या मुक्तीसाठी १९९१ साली झालेले आखाती युद्ध हे इराकी स्कड (अल-हुसेन) आणि अमेरिकी पॅट्रियट क्षेपणास्त्रांनी गाजले. या युद्धात सद्दाम हुसेनच्या इराकने सौदी अरेबियावर ४३ तर इस्रायलवर ३९ स्कड क्षेपणास्त्रे डागली. सौदी अरेबियावर सोडलेली ७० टक्के आणि इस्रायलवर सोडलेली ४० टक्के स्कड क्षेपणास्त्रे पॅट्रियट क्षेपणास्त्रांनी हवेत पाडल्याचा दावा अमेरिकेने केला. त्यावर आक्षेपही घेण्यात आले. मात्र पॅट्रियट क्षेपणास्त्राचे महत्त्व या युद्धाने बरेच वाढवले.

अमेरिकेने नाइके हक्र्युलस आणि हॉक ही क्षेपणास्त्रे बदलण्यासाठी १९७० च्या दशकात पॅट्रियटच्या विकासाला सुरुवात केली आणि १९८०च्या दशकात ते सेनादलांत सामील झाले. पॅट्रियट सोव्हिएत युनियनची विमाने किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी तयार करण्यात आले होते. १९९१ साली जेव्हा त्याचा वापर झाला तेव्हा त्याने पाडलेली इराकी स्कड ही सोव्हिएत बनावटीची क्षेपणास्त्रे होती हा योगायोग. सुरुवातीला अमेरिकेने पॅट्रियट विमानवेधी क्षेपणास्त्र (अँटि-एअरक्राफ्ट मिसाइल) म्हणून तयार केले होते. पण नंतर त्यात क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्र (अँटि बॅलिस्टिक मिसाइल मिसाइल) म्हणून बदल करण्यात आले.

पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीत फिरता नियंत्रण कक्ष, रडार, अँटेना, जनरेटर आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक असे पाच भाग आहेत. संपूर्ण यंत्रणा संगणकावर आधारित आहे. पॅट्रियटचे ५००० रडार अँटेना एका वेळी १०० लक्ष्यांचा माग काढून त्यांतील कोणाचाही वेध घेऊ शकतात. त्यांचा पल्ला ७० ते १६० किमी आहे. रडार आकाशात शत्रूच्या येणाऱ्या क्षेपणास्त्राचा वेध घेते. शत्रूचे क्षेपणास्त्र रडारवर दिसताच संगणकीकृत नियंत्रण कक्षाद्वारे पॅट्रियट क्षेपणास्त्र डागले जाते. पॅट्रियटवरील रडार शत्रूच्या क्षेपणास्त्रावर लहरी सोडते. शत्रूच्या क्षेपणास्त्रावर आपटून परतलेल्या लहरींचा माग काढून नियंत्रण कक्ष पॅट्रियटचे दिशादर्शन करतो. लक्ष्याच्या जवळ जाताच प्रॉक्झिमिटी फ्यूजच्या मदतीने पॅट्रियटवरील स्फोटकांचा स्फोट होतो आणि शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होते. लढाऊ विमाने आणि लघू किंवा मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांविरुद्ध पॅट्रियट प्रभावी असले तरी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांविरुद्ध अद्याप त्याचा उपयोग शक्य नाही. कारण पॅट्रियट ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने (माक ३) प्रवास करते, तर आंतरखंडीय क्षेपणास्त्रावरील बॉम्ब पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांचा वेग ध्वनीच्या १५ पट असतो.

आखाती युद्धातील अनुभवापासून धडा घेत इस्रायलच्या राफाएल कंपनीने (येथे फ्रान्सच्या दसाँ कंपनीच्या राफेल विमानांशी गल्लत करू नये) आयर्न डोम नावाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तयार केली. आयर्न डोम ४ ते ७० किमी अंतरात शत्रूचे तोफगोळे, रॉकेट, विमाने किंवा क्षेपणास्त्रे पाडू शकते. त्याचा पल्ला २५० किमीपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती २०११ साली तैनात करण्यात आली आणि त्यांचा २०१२ आणि २०१४ साली पॅलेस्टिनी गनिमी योद्धय़ांशी झालेल्या संघर्षांत वापर झाला. पॅलेस्टिनी गनिमांनी डागलेल्या रशियन बनावटीच्या कात्युशा आणि बीएम-२१ ग्राद रॉकेट्सपैकी ९० टक्के रॉकेट्स आयर्न डोमनी पाडल्याचा दावा इस्रायलने केला. यासह इस्रायल आयर्न बीम, अ‍ॅरो, बराक-८ आणि डेव्हिड्स स्लिंग नावाच्या क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com