स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीचे व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर बरेच लोकप्रिय झाले तरी त्यात एक त्रुटी होती. त्याच्या काडतुसांमध्ये मक्र्युरी फल्मिनेट हे स्फोटक होते. काही वेळा एक गोळी झाडल्यानंतर सर्व काडतुसांचा स्फोट होऊन सर्व गोळ्या एकदम झाडल्या जात.

या त्रुटी दूर करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८५७ साली ‘मॉडेल वन’ नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्याने त्यापूर्वीच्या पर्कशन कॅप रिव्हॉल्व्हरचा काळ संपवला आणि खऱ्या अर्थाने आधुनिक रिव्हॉल्व्हरचे युग सुरू झाले. त्याचे .२२ कॅलिबरचे रिम फायर काडतूसही स्मिथ अ‍ॅण्ड वेसननेच विकसित केले होते. तेव्हापासून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने आपल्या बंदुकांसाठी काडतूस विकसित करण्याची परंपरा आजतागायत कायम राखली आहे. मॉडेल वन जरी वापरास सुटसुटीत असले तरी त्याच्या .२२ कॅलिबरच्या गोळ्या जंगली श्वापदे मारण्यास किंवा युद्धात शत्रूसैनिकांना रोखण्यास पुरेशा शक्तिशाली नव्हत्या.

त्यामुळे स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने गोळीचा आकार आणि ताकद वाढवून .३२ कॅलिबरच्या गोळ्या डागणारे ‘मॉडेल टू’ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. ते मॉडेल वनपेक्षा बरेच शक्तिशाली होते. त्याला सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी अमेरिकी गृहयुद्ध (१८६१ ते १८६५) सुरू झाले होते. त्या वेळी कोल्ट कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्ससह स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्सनाही मोठी मागणी आली. गृहयुद्धाच्या काळात स्मिथ अ‍ॅण्ड वेसन अमेरिकेतील एक मोठी बंदूकनिर्माती कंपनी म्हणून नावारूपास आली.

मात्र अमेरिकी गृहयुद्ध संपल्यानंतर तेथील सर्वच शस्त्रास्त्रनिर्मात्या कंपन्यांची बाजारपेठ ओसरली. कंपन्या तग धरून राहण्यासाठी धडपडू लागल्या. युद्धानंतर १८६७ साली स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीची महिन्याकाठी केवळ १५ रिव्हॉल्व्हर विकली जात होती. या मंदीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेबाहेरील बाजारपेठेचा मागोवा घेणे क्रमप्राप्त होते. त्याच दरम्यान पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र प्रदर्शन भरणार होते. स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने परिश्रमपूर्वक त्यांच्या शस्त्रांमध्ये सुधारणा करून ती पॅरिसमध्ये मांडली. ती पाहून रशियन सैन्याचे प्रतिनिधी आणि झारचा पुत्र युवराज अलेक्सिस बरेच प्रभावित झाले. रशियाने त्यांच्या सैन्यासाठी स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या २० हजार रिव्हॉल्व्हर्सची ऑर्डर दिली. त्यात मॉडेल थ्री या रिव्हॉल्व्हरचा प्रामुख्याने समावेश होता. मॉडेल थ्री .४४ कॅलिबरची सेंटर फायर प्रकारची काडतुसे डागत असे. १८६८ ते १८७० या काळात उत्पादनास सुरुवात झालेले हे अमेरिकेतील पहिले मोठय़ा कॅलिबरचे रिव्हॉल्व्हर होते.

अमेरिकी लष्करातील मेजर जॉर्ज स्कोफिल्ड (Major George W. Schofield) यांनी मॉडेल थ्रीमध्ये काही बदल केले. त्यांचा समावेश करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८७५ साली स्कोफिल्ड यांच्या नावानेच नवे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्यासाठी .४५ स्कोफिल्ड नावाचे खास काडतूसही विकसित केले. त्याला अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या दशकात स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने या दोन्ही सैन्यांना लाखो रिव्हॉल्व्हर्स पुरवल्या आणि कंपनीला चांगलीच ऊर्जितावस्था प्राप्त झाली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com