अमेरिकेतील गृहयुद्धाचा फायदा केवळ स्थानिक शस्त्रास्त्र निर्मात्यांनाच होत  होता असे नाही. तर अटलांटिक महासागरापार युरोपमधील ब्रिटनसारख्या देशांनीही त्याचा चांगलाच लाभ उठवला होता. ब्रिटनच्या बर्मिगहॅम या शहरातील ‘गन क्वार्टर’ नावाने ओळखला जाणारा भाग बंदूक निर्मात्यांसाठी प्रसिद्ध होता.

बर्मिगहॅम शहराच्या उत्तरेकडील स्टीलहाऊस लेन, शॅडवेल स्ट्रीट आणि लव्हडे स्ट्रीट यांच्यामध्ये वसलेल्या भागाला गन क्वार्टर म्हणत. सतराव्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत तेथे बंदूक निर्मितीचा व्यवसाय बहरला आणि अनेक बंदूक कंपन्या नावारूपास आल्या. त्यात जोसेफ बेंटली, वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट, विल्यम त्रांतर, ए. ए. ब्राऊन अ‍ॅण्ड सन्स आदी कंपन्या विशेष गाजल्या. ब्रिटनच्या सुप्रसिद्ध ली-एनफिल्ड रायफल्सची निर्माती वेस्टली रिचर्ड्स आणि आफ्रिकेत बंदुका पुरवणारी फार्मर अ‍ॅण्ड गॅल्टन, डब्ल्यू. डब्ल्यू. ग्रीनर आदी कंपन्याही इथल्याच. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमध्ये सर्वप्रथम १६३० साली बंदुकीची निर्मिती झाल्याच्या नोंदी आहेत. तेव्हापासून अगदी १९६० च्या दशकात बर्मिगहॅम इनर रिंग रोडच्या बांधणीसाठी गन क्वार्टरचा बराचसा भाग पाडून टाकेपर्यंत तेथे बंदुकांचा व्यवसाय सुरू होता. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमधील कंपन्यांनी तयार केलेल्या बंदुका सतराव्या शतकात इंग्लिश गृहयुद्धापासून नेपोलियनची युद्धे, क्रिमियन युद्ध, अमेरिकी गृहयुद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरही वापरल्या गेल्या. येथील काही कंपन्यांनी अमेरिकी गृहयुद्धात दक्षिणेकडील बंडखोर राज्यांना (कन्फेडरेट स्टेट्स) शस्त्रे पुरवून भरपूर नफा कमावला.

लंडनस्थित रॉबर्ट अ‍ॅडम्स यांच्या कंपनीने १८५० च्या दशकात अमेरिकेतील सॅम्युएल कोल्ट यांच्या कंपनीला युरोपमध्ये मोठी स्पर्धा निर्माण केली होती. १८५४ साली बाजारात आलेल्या अ‍ॅडम्स सेल्फ-कॉकिंग रिव्हॉल्व्हरने ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेक सेनाधिकाऱ्यांची मने जिंकली. त्यामध्ये एक गोळी झाडल्यानंतर चेंबर फिरवण्यासाठी हॅमर वापरावा लागत नसे. थेट ट्रिगर दाबल्यावर चेंबर फिरणे आणि गोळी झाडणे ही दोन्ही कार्ये होत असत. म्हणजेच आजच्या डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरची ती सुरुवात होती. तसेच जोसेफ बेंटली यांच्या १८५३ साली वापरात आलेल्या बेंटली डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरनेही मोठी बाजारपेठ काबीज केली.

बर्मिगहॅममध्ये १७९० साली विल्यम डेव्हिस यांनी ‘बुलेट मोल्ड’ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे जावई फिलिप वेब्ली यांनी १८४५ मध्ये त्याची सूत्रे स्वीकारली आणि वेब्ली कंपनीचा जन्म झाला. त्याचे १८५७ मध्ये डब्ल्यू. अ‍ॅण्ड सी. स्कॉट अ‍ॅण्ड सन्स या कंपनीबरोबर विलिनीकरण झाले आणि ‘वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट’ या कंपनीची निर्मिती झाली. मूळच्या वेब्लीचे ‘लाँगस्पर’ रिव्हॉल्व्हर बरेच गाजले. नंतरच्या वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉटची ‘मार्क वन’ आणि ‘मार्क सिक्स’ ही रिव्हॉल्व्हर मॉडेल्स ब्रिटिश सैन्याने अधिकृत शस्त्र म्हणून स्वीकारली. ब्रिटिश सैन्याचा ती बराच काळ आधार होती. ती दुसऱ्या महायुद्धानंतरही अनेक देशांत वापरात होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com