हवामानात अनुकूल किंवा प्रतिकूल बदल करून त्याचा शस्त्रासारखा वापर करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक युगात या प्रयोगांची सुरुवात केली ती १९४६ साली अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरीतील विन्सेंट शीफर आणि आयर्विंग लँगमूर या संशोधकांनी. त्यांनी प्रयोगात पाण्याच्या बाष्पाच्या थंड ढगांमध्ये शुष्क बर्फाचे (ड्राय आइस म्हणजेच गोठलेला कार्बन डायऑक्साइड) कण सोडले असता जलबिंदूंचे बर्फाच्या कणांमध्ये रूपांतर झाले आणि तो बर्फ खाली पडला. शुष्क बर्फाच्या ऐवजी सिल्व्हर आयोडाइड किंवा लेड आयोडाइड ही रसायने वापरून असाच परिणाम साधता येतो. त्यातूनच क्लाऊड सिडिंग हे तंत्र विकसित झाले आणि कृत्रिम पावसाचा उगम झाला.

सुरुवातीला केवळ शास्त्रीय पातळीवर असलेले हे संशोधन पुढे युद्धशास्त्राकडे वळले. शीतयुद्धाच्या काळात व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने कृत्रिम पाऊस आपल्या फायद्यासाठी वापरला होता. व्हिएतनामचा भूभाग विषुववृत्तीय जंगलांचा आणि डोंगराळ. गनिमी काव्याच्या लढाईसाठी अगदी सुयोग्य. त्याच्याच आधारे सोव्हिएत युनियनच्या मदतीने लढणाऱ्या उत्तर व्हिएतनामी गनिमी योद्धय़ांनी दक्षिण व्हिएतनामच्या पाठीशी असलेल्या अमेरिकेला जेरीस आणले होते. उत्तर व्हिएतनामचे नेते हो-चि-मिन्ह यांच्या नावाने ओळखल्या गेलेल्या हो-चि-मिन्ह ट्रेल या मार्गावरून येणारी गनिमांची रसद तोडण्यासाठी अमेरिकेने प्रोजेक्ट पॉपआय नावाने १९६७ ते १९७२ या काळात एक गुप्त मोहीम राबवली होती. त्यानुसार पूर्व आशियाई मॉन्सून थोडासा लांबवून हो-चि-मिन्ह ट्रेलच्या आसपासच्या प्रदेशात अधिक पाऊस पाडणे आणि त्यायोगे जंगलातील रस्ते, पायवाटा, पूल, खिंडी पुराच्या पाण्याने भरून, तसेच मार्गावर चिखल माजवून आणि दरडी कोसळवून रसदपुरवठा रोखण्याचे उद्दिष्ट होते. अमेरिकी हवाईदलाच्या ५४व्या वेदर रेकॉनेसन्स स्क्वॉड्रनमधील विमाने आणि वैमानिकांनी या भागात क्लाऊड सिडिंग करून पावसाळा वाढवला. या दलाचे ब्रीदवाक्य होते – मेक मड, नॉट वॉर. त्याचा बऱ्याच प्रमाणात अमेरिकी सैन्याला फायदा झाला. जगापासून आणि खुद्द अमेरिकी काँग्रेसपासून लपवून ठेवलेल्या या मोहिमेबद्दल जॅक अँडरसन या पत्रकाराने प्रथम वाच्यता केली आणि हे प्रकरण उजेडात आले.

त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९७७ मध्ये वातावरणाचा लष्करी डावपेचांसाठी वापर करण्याविरुद्ध एक ठराव संमत केला. पण त्याला डावलून अमेरिका, रशिया, चीनसह अन्य काही देशांत या विषयावर संशोधन सुरू आहे. चीनने ८ ऑगस्ट २००८ रोजी बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी आणि १ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या ६०व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यातील संचलनावेळी कार्यक्रमस्थळी दाटलेले पावसाळी ढग पांगवण्यासाठी हवामानात बदल करण्याच्या तंत्राचा वापर केला.

अमेरिकेच्या अलास्का प्रांतात १९९२ साली हार्प (हाय फ्रिक्वेन्सी अ‍ॅक्टिव्ह ऑरोरल रिसर्च प्रोग्रॅम) या नावाने एक प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार तेथे उच्च क्षमतेच्या अँटेनांचे मोठे जाळे उभे करण्यात आले. हे अँटेना उच्च वारंवारितेच्या रेडिओ लहरींच्या माध्यमातून वातावरणातील आयनोस्फियर या पट्टय़ात प्रचंड प्रमाणात ऊर्जा प्रसारित करू शकतात. त्यातून स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वातावरणात बदल करून तापमान वाढवता येते. थोडक्यात, ही प्रणाली वातावरणातील मोठय़ा हिटरसारखी काम करते आणि घातक वैश्विक किरणे पृथ्वीवर येण्यापासून रोखणाऱ्या आवरणाला भगदाड पाडते. त्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवामानात बदल करून शेती आणि पर्यावरणाचा नाश करता येणे शक्य आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com