एकीकडे हँडगन प्रकारात रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुलांचा विकास होत असताना रायफलमध्येही अनेक स्थित्यंतरे होत होती. गरज आणि तंत्रज्ञानातील प्रगती या दोन घटकांचा त्यावर मुख्य प्रभाव पडत होता. त्याच्या प्रत्येक टप्प्याची आणि प्रत्येक बंदुकीची तपशीलवार चर्चा करणे शक्य नसले तरी या ऐतिहासिक बंदुकांचा धावता आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.

सन १७०० च्या आसपास अमेरिकेत केंटकी रायफल वापरात होती. जेम्स कूपर यांच्या ‘द लास्ट ऑफ द मोहिकन्स’ या पुस्तकातील ‘हॉकआय’ नथॅनिएल पोए यांनी केंटकी रायफल वापरल्यामुळे ती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘ब्लंडरबस’ नावाची मोठय़ा व्यासाची आखूड बॅरल असलेली पिस्तूल वापरात होती. तिचा आवाज मोठा व्हायचा पण अचूकचा आणि प्रभाव फारसा नसायचा. त्यावरून मोठा गाजावाजा करून फारसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या गोष्टीसाठी इंग्रजीत ब्लंडरबस हा शब्द वापरला जातो. त्यानंतरच्या काळात ब्राऊन बेस आणि लाँग लँड पॅटर्न मस्केट वापरात होत्या. त्यांनी ब्रिटिश साम्राज्य विस्तारास हातभार लावला.

अमेरिकेने १७७६ साली ब्रिटनपासून स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारल्यानंतर शस्त्रांची कमतरता जाणवू लागली. त्यावेळी अमेरिकी काँग्रेसने फ्रान्सकडे गुप्त दूत पाठवून शस्त्रे आणि आर्थिक मदतीची मागणी केली. फ्रान्सने अमेरिकेला पॅटर्न १७६६ मस्केट पुरवल्या. त्यांचे पुढे अमेरिकेत स्प्रिंगफील्ड आर्मरीमध्ये उत्पादन होऊ लागले. त्या अमेरिकी पॅटर्न १७९५ मस्केट म्हणून ओळखल्या गेल्या.

त्यानंतरच्या काळात इझेकिल बेकर यांनी तयार केलेल्या बेकर रायफल वापरात आल्या. त्यांच्या बॅरलमध्ये आत सात वक्राकार खाचा (ग्रूव्ज) पाडल्या होत्या. या रायफलिंगमुळे बेकर रायफल बरीच अचूक होती. त्याच काळात प्रशियन सैन्याची येगर रायफल प्रचारात होती. अमेरिकेतील १८४१ साली वापरात आलेल्या मिसिसिपी रायफलने मेक्सिकोबरोबरील युद्धात चांगली कामगिरी केली होती. स्वित्र्झलडमधील जीन सॅम्युएल पॉली यांनी १८१२ ते १८१६ या काळात ब्रिच-लोडिंग रायफल विकसित केली.  तर प्रशियातील जोनाथन निकोलाऊस फॉन ड्रेझी यांनी तयार केलेल्या ‘निडल गन’मुळे फायरिंग पिनच्या वापराचा मार्ग सुकर झाला. याशिवाय यूएस मॉडेल १८४२ रायफल्ड मस्केट, ब्रिटिश व्हिटवर्थ. ४५१ शॉर्ट रायफल यांचाही उल्लेख गरजेचा आहे.

ख्रिस्तियन शार्प्स यांनी १८४८ साली तयार केलेली शार्प्स रायफल आणि ख्रिस्तोफर स्पेन्सर यांची मॉडेल १८६५ स्पेन्सर रायफल यांनी अमेरिकी गृहयुद्धात महत्त्वाची कामगिरी केली. स्पेन्सर रायफलच्या टय़ूब मॅगझिनमध्ये सात काडतुसे बसत. त्यामुळे ती बंदूक रविवारी लोड करून खुशाल आठवडाभर फायर करत राहावी, अशी तिची ख्याती होती. ती सुरुवातीची कार्बाइन होती. अमेरिकेतील १८६७ मॉडेल स्नायडर रायफल ब्रिटिशांनी त्यांच्या पॅटर्न १८५३ रायफल (१८५७ च्या उठावात वापरलेल्या) बदलण्यासाठी वापरल्या. पुढे त्यांच्या जागी स्वित्र्झलडचे फ्रेडरिक फॉन मार्टिनी आणि अमेरिकेचे हेन्री पीबडी यांनी बनवलेली मॉडेल १८७१ मार्टिनी-हेन्री रायफल वापरात आली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com