जर्मन अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आणि बोल्ट-अ‍ॅक्शन तंत्राचा परमोच्च बिंदू म्हणून माऊझर गेवेर १८९८ (Mauser Gewehr 98) या रायफलची ख्याती आहे. जर्मनीसह विविध देशांत तिच्या १०० दशलक्षहून अधिक प्रतींची निर्मिती झाली आहे. या सगळ्या बंदुका सलग मांडल्या तर पृथ्वीला अडीच वेळा प्रदक्षिणा घातली जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सैनिकांची ही खरी सोबतीण होती. पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष लढणाऱ्या आणि आयर्न क्रॉस हा जर्मनीचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळवणाऱ्या अ‍ॅडॉल्फ हिटलरची ही आवडती रायफल होती.

एकोणिसाव्या शतकात नेपोलियन बोनापार्टने युरोपच्या बऱ्याचशा भूभागावर नियंत्रण स्थापित केले होते. जर्मनीतील वुर्टेमबर्ग या प्रांतातील राजा फ्रेडरिक हादेखिल त्याचा मांडलिक बनला होता. फ्रेडरिकने १८११ साली त्याच्या प्रांतातील निकार नदीच्या काठावरील ऑबर्नडॉर्फ या गावातील ऑगस्टाइन मोनास्टरीचे रूपांतर करून तेथे रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी सुरू केली. माऊझर गेवेहर ९८ रायफलचे रचनाकार पॉल आणि विल्हेम माऊझर यांचे वडील तेथे बंदूक निर्मितीसाठी कामाला होते. त्यांच्या हाताखाली या दोन बंधूंनी बंदुकीच्या तंत्रज्ञानाचे प्राथमिक धडे गिरवले. त्या काळी प्रशियात ड्रेझी यांची निडल गन प्रसिद्ध होती. पॉल माऊझर यांच्या ती  १८५८ साली प्रथम पाहण्यात आली. त्याहून चांगली रायफल आपण बनवू शकतो असा आत्मविश्वास पॉल यांना वाटला.

त्यातून त्यांनी १८६८ साली बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल बनवली. त्याचे पेटंट त्यांनी युरोपऐवजी अमेरिकेत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉल यांना ते सॅम्युएल नोरीस यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्या भागीदारीतून माऊझर-नोरीस रायफल तयार झाली. पुढे नोरीस यांना या भागीदारीत रस उरला नाही आणि त्यांनी त्यातून अंग काढून घेतले. मात्र जाता-जाता मॉडेल १८७१ इन्फंट्री रायफलचे प्रात्यक्षिक जर्मन सम्राट कैसर विल्हेम पहिले यांना दाखवण्याची सोय केली. कैसरना बंदूक आवडली. मात्र तिच्या उत्पादनाचे हक्क माऊझर यांना न देता त्यांनी राष्ट्रीय गुपित म्हणून सरकारी कारखान्यात या बंदुकीचे उत्पादन केले. माऊझर यांना बंदुकीच्या रिअर साइट्सच्या उत्पादनावर समाधान मानावे लागले. त्यातही ८५ टक्के रॉयल्टी मध्यस्थ म्हणून नोरीस यांना गेली.

पुढे १८७३ मध्ये माऊझर यांनी रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी विकत घेतली. १८७७ साली झालेल्या युद्धात तुर्कस्तानच्या सैनिकांनी १५ गोळ्या मावणाऱ्या विन्चेस्टर रायफल वापरून रशियाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. त्यामुळे अनेक गोळ्या मावणाऱ्या स्वयंचलित बंदुकांना मागणी आली. १८७१ ते १८८४ या काळात माऊझरनी टय़ूब मॅगझिनमध्ये ८ गोळ्या बसणाऱ्या रायफलची निर्मिती केली. त्यापुढे १८८९ च्या बेल्जियन मॉडेलमध्ये मॅगझिन वापरले आणि १८९३ च्या स्पॅनिश मॉडेलमध्ये काडतुसात स्मोकलेस पावडर वापरली. याशिवाय बोल्ट अ‍ॅक्शनच्या तंत्रात सुधारणा केली. गेवेर १८९८ मध्ये पाच गोळ्या मावत आणि त्या एका वेळी भरण्यासाठी स्ट्रिपर क्लिप तंत्रज्ञान वापरात आले होते. यातून गेवेर ९८ त्या काळातील जगातील सर्वात खात्रिशीर बोल्ट अ‍ॅक्शन रायफल बनली होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com