पहिल्या महायुद्धातील एक प्रसंग. दमदार जर्मन आक्रमणापुढे बेल्जियमने नांगी टाकलेली. दरम्यान, ४ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटनने युद्धाचा पुकारा केला. आता आगेकूच करणाऱ्या जर्मन फौजांच्या आणि बेल्जियन सैन्याच्या मध्ये बेल्जियममधील मोन्स (Mons) या गावात ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे (बीईएफ) ७५,००० सैनिक छातीचा कोट करून उभे ठाकलेले होते. जर्मन सैन्य ब्रिटिशांपेक्षा संख्येने खूप जास्त होते. पण ती कमी ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्या बंदुका आणि त्या चालवण्याच्या असाधारण कौशल्याने भरून काढली.

मोन्सजवळील मालप्लाकेट येथे २३ ऑगस्ट १९१४ रोजी लढाईला तोंड फुटले. ब्रिटिशांनी जर्मन सेनेला नुसते रोखलेच नाही तर त्यांना मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी स्वीकारायला भाग पाडले. दोन दिवसांनी ल कॅटो (Le Cateau) येथे त्याचीच पुनरावृत्ती झाली. या विभागातील एकंदर युद्धात ब्रिटिशांना माघार घ्यायला लागली. तरीही त्यांनी जर्मनांना बराच काळ थोपवून धरले. ब्रिटिश सैनिकांचा (टॉमी) मारा इतका प्रखर होता की जर्मनांना वाटले ब्रिटिशांकडे मशीनगन आहेत. वास्तविक मोन्स येथे ब्रिटिशांच्या हाती होत्या शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल्स. याच बंदुकांना आपण  ०.३०३ (पॉइंट थ्री नॉट थ्री) रायफल म्हणून ओळखतो. ज्या आजही आपल्या पोलीस दलात वापरात आहेत. ब्रिटिशांनी त्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासह पुढे कोरियन युद्धातही वापरल्या.

जेम्स पॅरिस ली आणि विल्यम मेटफर्ड यांनी तयार केलेली ली-मेटफर्ड रायफल ब्रिटिश सेनेने १८८८ साली स्वीकारली. पुढे ती बदलण्यासाठी शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल बनवण्यात आली. जेम्स ली यांचे डिझाइन वापरून लंडनजवळील एनफिल्ड येथील रॉयल स्मॉल आम्र्स फॅक्टरी येथे ती बनवली. म्हणून तिला ली-एनफिल्ड रायफल म्हणतात. तिच्या नळीचा आतील व्यास ०.३०३ इंच आहे म्हणून तिला पॉइंट थ्री नॉट थ्री म्हणतात. तिचे सुरुवातीचे मॉडेल  एमएलई (MLE) म्हणून ओळखले जायचे. पण सैनिक तिला एमिली (Emily) म्हणत. पुढील मॉडेल एसएमएलई (SMLE) होते. तिला (Smelly) म्हटले जायचे. तिचे १० गोळ्या मावणारे मॅगझिन आणि सफाईदार बोल्ट-अ‍ॅक्शन या जमेच्या बाजू होत्या. मैलभरापर्यंत ती अचूक मारा करू शकत असे.

साधारण सैनिक त्यातून मिनिटाला १५ ते २० गोळ्या तर काही निष्णात सैनिक मिनिटाला ३० गोळ्या झाडू शकत. ब्रिटिश सैनिकांचे हेच कौशल्य मोन्सच्या लढाईत कामी आले होते. एसएमएलई रायफल नंबर १ मार्क ३ ही बंदूक १९०७ मध्ये तर पुढील रायफल नंबर ४ मार्क १ ही बंदूक १९३९ साली वापरात आली. पुढे १९५० च्या दशकात ब्रिटिश सैन्यात एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) वापरात येईपर्यंत .३०३ वापरात होती.

आजवर या रायफलच्या विविध देशांत मिळून १७ दशलक्षच्या वर प्रती तयार झाल्या आहेत. भारतीय लष्करात तर या रायफल होत्याच पण पोलीस दलातही त्या अद्याप आहेत. मुंबईतील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यावेळीही पोलिसांनी .३०३ रायफलनिशीच दहशतवाद्यांचा मुकाबला केला होता.