अमेरिकी सैन्यावर १८९८ च्या स्पेनबरोबरील युद्धात जी परिस्थिती ओढवली होती तशीच दुर्दशा रशियन सैन्यावर १८७७-७८ साली ऑटोमन तुर्की साम्राज्याबरोबर प्लेवेन येथे झालेल्या युद्धात आली होती. रशियन सैनिकांकडे बर्दन सिंगल-शॉट रायफल होत्या. तर तुर्क सैनिकांकडे एकावेळी अनेक गोळ्या झाडू शकणाऱ्या विन्चेस्टर रिपिटिंग रायफल होत्या. साहजिकच तुर्कानी रशियनांचा धुव्वा उडवला. मग रशियाने बंदुका बदलण्याचा निर्णय घेतला.

अनेक बंदुका चाचणीसाठी आणण्यात आल्या. त्यात रशियाच्या कॅप्टन सर्गेई मोझिन यांची ३-लाइन (७.६२ मिमी) आणि बेल्जियन डिझायनर लिआँ नगांट यांची ३.५ लाइन (९ मिमी) रायफल स्पर्धेत होत्या. रशियन गणन पद्धतीनुसार १ लाइन म्हणजे इंचाचा दहावा भाग. त्यानुसार ३-लाइन म्हणजे ७.६२ मिलीमीटर व्यास असलेली बंदुकीची नळी. निवड समितीची मते दुभंगली होती. दोन्ही रायफलमध्ये काही गुण-दोष होते. त्यांच्या संकरातून जी रायफल तयार झाली तिला मोझिन-नगांट मॉडेल १८९१ म्हणून ओळखले जाते.

रशियन सैन्याची ही अत्यंत खात्रीलायक बंदूक होती. जगातील सर्वाधिक उत्पादन झालेल्या रायफल्सपैकी ती एक आहे. तिच्या १८९१ पासून आजवर ३७ दशलक्ष प्रती तयार झाल्या आहेत. दोन्ही महायुद्धे आणि त्यापुढेही या रायफल वापरात होत्या. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी फौजा मॉस्कोच्या वेशीपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र स्टालिनग्राडच्या ज्या ऐतिहासिक लढाईत जर्मनांना रेड आर्मीने धूळ चारली त्या विजयात मोझिन-नगांट रायफलचा वाटा मोठा होता. रशियन सैनिकांना मोझिन-नगांटने खरी साथसोबत केली. या रायफलची स्नायपर आवृत्ती वापरून रशियाच्या पुरुषांसह महिला स्नायपरनीही  शेकडो जर्मन सैनिकांचा बळी घेतला आहे.

या रायफलचे मूळ नाव थ्री-लाइन रायफल मॉडेल १८९१ असे होते. ३-लाइन म्हणजे ७.६२ मिमी. तेव्हापासून एके-४७ रायफलपर्यंत रशियन बंदुकांचे ७.६२ मिमी कॅलिबर कायम राहिले आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल होती आणि तिच्या मॅगझिनमध्ये एका वेळी ५ गोळ्या मावत असत.  बोल्ट-अ‍ॅक्शन पद्धतीत गोळी झाडताना बंदुकीचे कमीत कमी भाग हलतात. त्यामुळे त्यांची अचूकता चांगली असते. त्यामुळेच पुढे स्नायपर रायफल म्हणूनही मोझिन-नगांट चांगलीच लोकप्रिय झाली. मोझिन-नगांटच्या ड्रगून, कार्बाइन अशा आवृत्त्याही चलनात आल्या. मूळ मोझिन-नगांटची सुधारित मॉडेल ९१/३० ही आवृत्तीही तितकीच प्रभावी होती. झारचा रशिया, साम्यवादी क्रांतीनंतरचा सोव्हिएत रशिया, सोव्हिएत प्रभावाखालील पूर्व युरोपातील अनेक देश, चीन आणि बऱ्याच देशांत मोझिन-नगांट वापरात होत्या.  बोल्शेव्हिक क्रांतीतही त्या वापरल्या गेल्या.

मोझिन-नगांट रायफलची नेमबाजी स्पर्धासाठीचीही आवृत्ती होती. ती वोस्तोक नावाने ओळखली जायची. १९६० आणि १९७० च्या दशकात त्या युरोपीय देशांना निर्यातही केल्या गेल्या. एकंदर मोझिन-नगांट रायफलने रशियाच्या समाजजीवनावर अमीट ठसा उमटवला आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com