दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने त्यांच्या सैन्यातील विविध शस्त्रांचा आढावा घेतला. त्यात असे दिसून आले  की, सैन्याकडे अनेक प्रकारच्या बंदुका असल्याने त्यांच्यासाठी वेगवेगळा दारुगोळा पुरवण्यात अडचणी येत आहेत. बरेचदा एकाच तुकडीत सैनिकांकडे स्प्रिंगफिल्ड रायफल, थॉमसन सब-मशिनगन, ब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफल अशी वेगवेगळी शस्त्रे असत. त्या सगळ्यांत एकवाक्यता आणण्याच्या उद्देशाने नवी सिलेक्टिव्ह फायर ऑटोमॅटिक रायफल बनवण्याचा निर्णय घेतला गेला. सिलेक्टिव्ह फायर रायफलमधून ट्रिगर दाबल्यावर एका वेळी एकेक गोळी, सेमी-ऑटोमॅटिक मोडवर तीन गोळ्यांचा बस्र्ट किंवा फुल ऑटोमॅटिक मोडवर सर्व गोळ्या एका दमात झाडता येतात. त्यातून एम-१४ ही रायफल आकाराला आली.

अमेरिकी सैन्याने १९५७ साली  एम-१४ रायफल स्वीकारली. स्प्रिंगफिल्ड कारखान्यात १९५८ साली उत्पादनाची सामग्री बसवली आणि १९५९ पासून एम-१४ रायफल प्रत्यक्ष सैन्याला मिळण्यास सुरुवात झाली. तिच्या मॅगझिनमध्ये ७.६२ मिमी व्यासाच्या २० शक्तिशाली गोळ्या बसत. त्यामुळे या रायफलची मारक क्षमता चांगली होती. पण लवकरच व्हिएतनाम युद्धात एम-१४ च्या त्रुटी लक्षात येऊ लागल्या. व्हिएतनामच्या जंगलांमधील पावसाळी आणि दमट वातावरणात एम-१४ च्या लाकडी दस्त्यात (बट) आद्र्रता शोषली जाऊन लाकडी भाग फुगत असत. त्यामुळे तिच्यावरील नेम धरण्यासाठी बसवलेल्या साइट्सचे गणित बिघडून अचूकतेवर परिणाम होत असे. म्हणून एम-१४ चे पुढील मॉडेल एम-१६ ही रायफल विकसित करण्यात आली.

रशियन एके-४७ प्रमाणे अमेरिकी एम-१६ ही रायफलही जगभरात गाजली. कोल्ट आर्मालाइट फॅक्टरीतील युजीन स्टोनर यांनी ही रायफल १९५६ च्या आसपास डिझाइन केली आणि १९६४ पासून ती अमेरिकी सेनादलांत दाखल झाली.  तिच्या निर्मितीमध्ये हलके पण टिकाऊ मिश्रधातू, प्लास्टिक, कॉम्पोझिट मटेरियल आदींचा उपयोग केला होता. पूर्वीच्या एम-१४ मध्ये ७.६२ मिमीच्या गोळ्या वापरल्या जात. एम-१६ मध्ये त्याऐवजी थोडय़ा लहान म्हणजे ५.५६ मिमी व्यासाच्या गोळ्या भरल्या जात. त्यामुळे सैनिकांना तेवढय़ाच वजनात अधिक गोळ्या वाहून नेणे शक्य होते. तिला २० ते ३० गोळ्यांचे मॅगझिन बसत असे आणि त्यातून एका मिनटिाला ७०० ते ९५० च्या वेगाने गोळ्यांची बरसात होत असे.

मात्र व्हिएतनामच्या जंगलात एम-१६ रायफल वरचेवर जॅम होत असे आणि त्यामुळे अमेरिकी सैनिक मारले जात. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेने एम-१६ च्या गोळ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डय़ुपाँ आयएमआर पावडरऐवजी जुन्या एम-१४ च्या गोळ्यांमध्ये वारली जाणारी स्टँडर्ड बेल पावडर वापरण्यास सुरुवात केली. त्याने बॅरलच्या आतील पृष्ठभागावर काजळी कमी साठत असे. तसेच एम-१६ ला सुरुवातीला स्वच्छतेसाठी किट पुरवले नव्हते, तेही पुरवण्यास सुरुवात केली. रायफल साफ करण्याची सैनिकांना सवय लावली. बॅरल आणि अंतर्गत भागांवर क्रोमियम प्लेटिंग केले. त्यातून एम-१६ ची परिणामकारकता वाढली आणि ती एक खात्रीशीर बंदूक म्हणून नावारूपास आली.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com