ऑस्ट्रियाचे ग्लॉक-१७  पिस्तूल म्हणजे हँडगन विकासाचा परमोच्च बिंदू आहे. जगातील सर्वाधिक खपाचे, वजनाने हलके, हाताळण्यास सोपे आणि अत्यंत खात्रीलायक पिस्तूल म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने पिस्तूल जगतात क्रांती घडवली.

युरोपमधील ऑस्ट्रिया या देशातील अभियंते गॅस्टन ग्लॉक यांनी स्थापन केलेल्या ग्लॉक जीईएस. एम. बी. एच. या कंपनीत १९८२ साली प्रथम तयार झालेल्या या पिस्तुलाने अल्पावधीत जागतिक बाजारपेठ काबीज केली. वास्तविक ग्लॉक यांचा बंदूकनिर्मितीशी तसा फारसा संबंध नव्हता. त्यांची कंपनी ऑस्ट्रियाच्या सैन्याला पडदे लावण्याच्या काठय़ा (कर्टन रॉड्स) आणि चाकू पुरवत असे. मात्र ग्लॉक यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कॅमेऱ्यांची हँडल तयार करणाऱ्या कंपनीत काम केले होते. तेथे त्यांना उत्तम दर्जाची प्लास्टिक पॉलिमर तयार करण्याचा अनुभव होता. त्यातून त्यांनी चाकूची हँडलही प्लास्टिकची बनवली. पुढे जेव्हा त्यांनी पिस्तूल डिझाइन केले तेव्हा त्यातही प्लास्टिक पॉलिमर्सचा भरपूर वापर केला.

ग्लॉक १७ पिस्तुलाचे बाहेरचे बहुतांश भाग प्लास्टिक पॉलिमरचे बनवले आहेत. त्यामुळे त्याचे वजन खूप कमी म्हणजे ०.६३ किलोग्रॅम इतकेच आहे. सुरुवातीला अमेरिकेने हे प्लास्टिकचे पिस्तूल विमानतळावरच्या मेटल डिटेक्टर यंत्रात दिसणार नाही म्हणून त्यावर बंदी घातली. पण त्याचे स्लाइड, बॅरल आणि ट्रिगर हे भाग दर्जेदार पोलादाचे आहेत. त्यामुळे ती भीती मावळली. आता अमेरिकेतील ६५ टक्क्यांहून अधिक कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा संस्था ग्लॉक १७ चा वापर करतात. त्यातूनच ग्लॉक १७ ला आता ‘प्लास्टिक फँटॅस्टिक’ किंवा ‘कॉम्बॅट टपरवेअर’ अशा बिरुदावली मिळाल्या आहेत. प्लास्टिक वापरूनही ते खूप मजबूत आणि टिकाऊ आहे.

ग्लॉकची एकूण लांबी केवळ सव्वा सात इंच आहे आणि त्यात ९ मिमी व्यासाच्या पॅराबेलम गोळ्या भरल्या जातात. ग्लॉकची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यात १७ किंवा अधिक गोळ्या मावतात. रिव्हॉल्व्हर कितीही चांगले असले तरी त्यात अधिकाधिक सहा ते सात गोळ्या मावतात. त्याच्या तुलनेत १७ गोळ्या सलग झाडू शकणारे ग्लॉक ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरले. ग्लॉकची खासीयत म्हणजे या पिस्तुलला चुकून गोळ्या झाडल्या जाऊ नयेत म्हणून असते ते सेफ्टी कॅचचे बटण नाही. ते काम करण्यासाठी ट्रिगरमध्येच सोय केली आहे. ट्रिगरचाच काही भाग थोडा पुढे आला आहे. तो दाबला असता पिस्तूल सेफ्टी ओपन होते. ट्रिगर आणखी दाबला की पिस्तूल गोळ्या झाडू लागते. या योजनेचे महत्त्व असे की पिस्तूल होलस्टर म्हणजे चामडय़ाच्या आवरणातून बाहेर काढले की विनाविलंब थेट झाडता येते.

ग्लॉकमध्ये शॉर्ट रिकॉइल प्रणाली वापरली आहे. म्हणजेच गोळी झाडल्यानंतर मागे बसणारा धक्का कमी होतो. तसेच त्याच्या बॅरलच्या पुढील भागात गोळी झाडल्यानंतर निर्माण होणारी आग आणि गरम वायू बाहेर फेकण्यासाठी खाचा आहेत. त्यामुळे ग्लॉकमधून गोळ्या झाडताना ते एखाद्या आग ओकणाऱ्या ड्रॅगनसारखे भासते. त्यानेही रिकॉइल कमी होते आणि अचूकता व हाताळण्यातील सुलभता वाढते.

या सर्व खुबींमुळे ग्लॉक १७ वापरणे म्हणजे लोण्याच्या गोळ्यातून सुरी फिरवल्याचा सफाईदारपणा अनुभवणे होय. याच कारणाने जगातील साधारण ५० देशांनी ते स्वीकारले आहे. त्यात महाराष्ट्र पोलीस दलाचाही समावेश आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com