युद्धात शत्रुपक्षाचे अधिकारी आणि सैनिक टिपणे हे स्नायपरचे महत्त्वाचे काम आहेच, पण अलीकडच्या काळात सैनिकांना टिपण्याबरोबरच शत्रूच्या युद्धसामग्रीला लक्ष्य बनवणे ही रणनीतीही अधिक प्रभावी ठरू लागली आहे. म्हणजेच अँटी-पर्सोनेल स्नायपिंगची जागा आता अँटी-मटेरियल स्नायपिंग घेऊ लागले आहे. त्यासाठी खास अँटी-मटेरियल स्नायपर रायफल विकसित होऊ लागल्या. त्यामध्ये अमेरिकेच्या बॅरेट एम ८२ या रायफलचा क्रमांक बराच वरचा लागतो. येथे बॅरेट (Barrett) आणि बरेटा (Beretta) यात गल्लत करता कामा नये. बरेटा ही इटलीची शस्त्रनिर्माती कंपनी आहे.

शस्त्रास्त्रविरोधी बंदुका पहिल्या महायुद्धातच वापरात आल्या होत्या. त्या वेळी प्रामुख्याने रणगाडय़ांचे चिलखत भेदण्यासाठी अँटी-टँक रायफल वापरण्यात आल्या. मात्र आधुनिक रणगाडय़ांचे चिलखत इतके जाडजूड आणि प्रभावी असते की ते रायफलच्या गोळीने भेदणे अवघड आहे. मात्र कमी जाडीची चिलखती वाहने, विमानतळावरील स्थिर विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रक्षेपक, रडार आणि संदेशवहन उपकरणे, छोटय़ा नौका आदी लक्ष्यांविरुद्ध अँटी-मटेरियल रायफलचा प्रभावी वापर करता येतो. अशी लक्ष्ये टिपण्यासाठी रायफल हे बरेच स्वस्त साधन आहे. अशा रायफलच्या गोळ्याही अधिक टणक धातूच्या असतात, जेणेकरून त्या लांब अंतरावरून कठीण लक्ष्याचा क्षेद करू शकतील.

बॅरेट एम ८२ ए १ ही रायफल अमेरिकेने १९८० च्या दशकात तयार केली. तिची एकूण लांबी ६१ इंच आणि वजन १४.७ किलो आहे. तिला ११ गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन बसवता येते. ही रायफल शॉर्ट रिकॉइल- गॅस ऑपरेटेड प्रणालीवर चालते. तसेच सेमी-ऑटोमॅटिक प्रकारे वापरता येते. तिची मझल व्हेलॉसिटी म्हणजे बंदुकीतून गोळी झाडण्याचा वेग एका सेकंदाला ८४३ मीटर इतका आहे.

तिच्यात ०.५० इंच व्यासाचे बीएमजी काडतूस वापरले जाते. बॅरेट एम ८२ ए १ रायफलचा पल्ला साधारण दोन किलोमीटर इतका आहे. इतक्या शक्तिशाली बंदुकीचा मागे बसणारा झटका कमी करण्यासाठी बंदुकीच्या बॅरलला पुढे मोठा मझल ब्रेक बसवलेला आहे. तसेच ती दोन पायांच्या स्टँडवर बसवून वापरावी लागते.

अमेरिकी स्नायपरनी ही रायफल १९९१ साली इराकविरुद्धच्या ऑपरेशन डेझर्ट शिल्ड, ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्ममध्ये, तसेच त्यानंतरच्या इराक आणि अफगाणिस्तानमधील संघर्षांमध्येही प्रभावीपणे वापरली. जगातील साधारण ३० देशांनी बॅरेट एम ८२ ए १ ही रायफल स्वीकारली आहे. भारतातही मुंबई पोलिसांच्या ‘फोर्स वन’ कमांडोंसाठी बॅरेट एम ८२ ए १ रायफलची एम १०७ ही आवृत्ती स्वीकारण्यात आली आहे. मूळच्या एम ८२ रायफलमध्ये काही बदल करून एम १०७ रायफल  बनवली आहे. त्यामुळे रायफल वापरण्यास अधिक सुलभ झाली आहे. मूळ रायफलप्रमाणेच एम १०७ लाही ‘लाइट फिफ्टी’ म्हटले जाते कारण त्यात ०.५० इंच व्यासाच्या गोळ्या वापरल्या जातात.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com