बंदुकांमधील शॉटगन हा प्रकारही अन्य प्रकारांइतकाच, किंबहुना काकणभर अधिकच उपयोगी आहे. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर एकच बंदूक बाळगणे परवडत असेल तर तो शॉटगनची निवड करेल. कारण शॉटगन हा प्रकार बहुउपयोगी आहे. त्यामुळेच साधारण सतराव्या- अठराव्या शतकात बंदुकांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आजतागायत त्यांचे महत्त्व अबाधित आहे. शिकार, नेमबाजी, क्रीडाप्रकार, कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संस्था, संरक्षण दले अशा विविध क्षेत्रांत त्यांचा वापर होतो आहे.

शॉटगन या बहुतांशी स्मूथ बोअर किंवा नळीचा (बॅरल) आतील पृष्ठभाग गुळगुळीत असलेल्या बंदुका असतात. त्यावर रायफलिंग केलेले नसते. त्यांचा पल्लाही कमी असतो. शॉटगन साधारण ५० यार्डापर्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे त्या क्लोझ क्वार्टर बॅटल गन्स म्हणून वापरल्या जातात. शॉटगनचे नाव त्यात वापरल्या जाणाऱ्या काडतुसांच्या प्रकारावरून आले आहे. यात नेहमीसारखी एकच गोळी नसते आणि काडतूसही अन्य रायफलच्या गोळ्यांप्रमाणे पुढे निमुळते नसते. शॉटगनचे काडतूस आकाराने थोडे मोठे, दंडगोलाकार असते. त्याच्या आवरणात स्फोटाची दारू आणि आकाराने लहान आणि अनेक गोळ्यांचा समूह असतो. त्याला शॉट किंवा पेलेट्स म्हणतात. त्यावरून शॉटगन हे नाव आले आहे. बंदूक झाडल्यावर काडतुसातून या छोटय़ा-छोटय़ा धातूच्या गोळ्यांचा समूह एकत्र बाहेर पडतो आणि जसजसा लांब जाईल तसतसा अधिक आकारात पसरत जातो. त्यामुळे शॉटगनच्या लक्ष्यावर मोठय़ा आकारात बऱ्याच जखमा होतात. तसेच शॉटगनचा नेम चुकण्याची शक्यता कमी असते आणि लक्ष्यावर हमखास मारा होईल याची शाश्वती असते.

शॉटगनची सुरुवात सतराव्या आणि अठराव्या शतकात सुरू झाली. या सुरुवातीच्या बंदुका प्रामुख्याने आकाशातील उडते पक्षी टिपण्यासाठी वापरल्या गेल्या. म्हणून त्या बंदुकांना फाउलिंग पीस म्हटले जायचे. एकच गोळी झाडणाऱ्या बंदुकीपेक्षा अधिक क्षेत्रफळात पसरणाऱ्या शॉटगनच्या गोळ्या शिकारीची खात्री देत असत. त्यानंतर पक्षी टिपण्याच्या आणि नेमबाजीच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्यातही शॉटगन उपयोगी ठरल्या. पुढे पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध त्यांचा वापर सुरू केला. अमेरिकी वाइल्ड वेस्टच्या काळात तेथील नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी शॉटगनचा व्यापक वापर केला. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या खंदकांमध्ये उतरून किंवा हल्ल्याच्या अखेरच्या टप्प्यात ठाणे सर करताना शॉटगनचा वापर होऊ लागला. त्या कामीही त्या खूप प्रभावी ठरल्या.

काडतुसांचा गेज, बोअर किंवा कॅलिबर यानुसार किंवा कार्यपद्धतीनुसार पंप-अ‍ॅक्शन, लीव्हर-अ‍ॅक्शन, ब्रेक-अ‍ॅक्शन, सेमी-ऑटोमॅटिक असे शॉटगनचे प्रकार पडतात.  ब्राऊनिंग, विंचेस्टर, बेनेली, मोझबर्ग, हॅट्सन आदी प्रकारच्या शॉटगन प्रसिद्ध आहेत.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com