ब्रिटिश एल ८५ ए २ किंवा एसए ८० आणि फ्रेंच ‘फामास’ (Fusil d’Assaut de la Manufacture d’Armes de Saint-Étienne) या दोन्ही असॉल्ट रायफल बुलपप डिझाइनवर आधारित आहेत. फामास १९७८ मध्ये तर एल ८५ ही रायफल १९८५ साली वापरात आली. या दोन्ही रायफल काही सर्वोत्तम रायफलमध्ये गणल्या जात नाहीत. त्यातही फ्रेंच फामास ब्रिटिश एल ८५ पेक्षा थोडी सरस आहे. मात्र अनेक देशांच्या लष्करात त्या वापरात आहेत. या दोन्ही रायफलच्या निमित्ताने बुलपप डिझाइनच्या काही त्रुटीही समोर आल्या.

एल ८५ ही बुलपप रायफल असल्याने तिचे वजन मागे, दस्त्याच्या बाजूला एकवटलेले आहे. त्यामुळे फुल ऑटोमॅटिक मोडमध्ये फायर करताना बॅरल वर उचलले जाण्याची अडचण अधिक गंभीर होती. तिचा बोल्ट बाऊन्स होऊन रायफल जॅम होत असे. सिलेक्टर स्विच खाली पडत असे. प्लास्टिकचे मॅगझिन सहज तुटत असे. तर पॉलिमरचा दस्ता कॅमोफ्लाज रंगानी रंगवला की वितळत असे.

बुलपप डिझाइनचा आणखी तोटा असा की त्यात दस्त्याची लांबी कमी झाल्याने रायफलचे चेंबर सैनिकांच्या चेहऱ्याच्या खूप जवळ येते. त्याने आवाजाचा आणि मोकळी काडतुसे बाहेर पडताना चेहऱ्यावर लागण्याचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी काही बुलपप रायफलमध्ये मोकळी काडतुसे पुढे किंवा खाली टाकण्याची सोय करतात.

अखेर २००० साली जर्मनीच्या हेक्लर अँड कॉख कंपनीने ब्रिटिश एल ८५ ए १ रायफलमध्ये सुधारणा करून एल ८५ ए २ मॉडेल विकसित करून दिले. त्यानंतर ही रायफल बरीच खात्रीलायक बनली. एल ८५ वर बसवलेल्या ‘सुसात’ (Sight Unit Small Arms, Trilux) दुर्बिणीमुळे तिच्या अचूकतेत भर पडली आहे.

पॉल टेली यांच्या चमूने विकसित केलेली फामास ही त्यापेक्षा बरीच चांगली रायफल आहे. तिच्या मॅगझिनमध्ये ५.५६ मिमी व्यासाच्या ३० गोळ्या मावतात आणि त्या मिनिटाला ९०० ते १००० च्या वेगाने ३००मीटर अंतरापर्यंत झाडता येतात. फामासच्या वरच्या भागात उचलून नेण्याच्या हँडलमध्येच नेम धरण्यासाठीची दुर्बीण बसवली आहे. तसेच तिच्या बॅरलवर बसवून ग्रेनेड्सही फेकता येतात.

फामास जी २ हे मॉडेल खास निर्यातीसाठी तयार केले असून ते आजवर जिबुती, गेबन, सेनेगल, संयुक्त अरब अमिराती या देशांना निर्यात केले आहे.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com