बुलपप डिझाइनबरोबरच आणखी एक तंत्रज्ञान सध्या बंदूक क्षेत्रात गाजत आहे, ते म्हणजे कॉर्नरशॉट. या दोन्ही तंत्रज्ञानांनी अलीकडच्या काळात जगभरच्या सैन्य दलांचे आणि कमांडो पथकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बुलपप डिझाइनच्या रायफलमध्ये ऑस्ट्रियाची श्टायर एयूजी, ब्रिटनची एल ८५ ए २, फ्रान्सची फामास, सिंगापूर टेक्नोलॉजीज कायनेटिक्सची एसएआर २१, चीनची नोरिन्को क्यूबीझेड ९५ यासह इस्रायलची टव्होर असॉल्ट रायफल प्रसिद्ध आहे. साधारण २००० सालच्या आसपास टव्होर इस्रायली सैन्यात दाखल झाली. टव्होर रायफलच्या टीएआर-२१ आणि एक्स-९५ अशा आवृत्ती उपलब्ध आहेत. टीएआर-२१ या आवृत्तीपेक्षा एक्स-९५ चे बॅरल कमी लांबीचे आहे. या दोन्ही रायफलची रचना खास कमांडो पथकांच्या आणि चिलखती दलांतील सैनिकांच्या गरजा लक्षात घेऊन केली आहे. कमांडोंना शहरी भागात कमी जागेत आणि चिलखती दलांना त्यांच्या वाहनांच्या अडचणीच्या जागेत वापरण्यासाठी कमी लांबीच्या रायफलची गरज होती. त्यातून टव्होरसाठी बुलपप डिझाइन स्वीकारण्यात आले. तसेच तिच्या एक्स-९५ आवृत्तीत बॅरलची लांबी आणखी कमी केली गेली. टव्होरची एक खासियत म्हणजे त्याचे बॅरल काही क्षणांत बदलून कमी किंवा अधिक आकाराच्या गोळ्या झाडता येतात. भारतानेही आपल्या सुरक्षा दलांसाठी आणि कमांडो पथकांसाठी टव्होर रायफल घेतल्या आहेत. तसेच टव्होरची देशी आवृत्ती झितारा नावाने भारतातच बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कॉर्नरशॉट ही वेगळ्या संकल्पनेवर आधारित बंदूक आहे. एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यावरून किंवा दारा-खिडक्यांमधून ९० अंशांत शत्रूवर हल्ला करायचा असल्यास  सैनिकाला डोके थोडे बाहेर काढावे लागते. त्यात त्याचा बाहेर आलेला अवयव शत्रूच्या गोळीबाराला बळी पडू शकतो. अशा वेळी बंदूक जर वाकवता आली तर हा धोका टाळून शत्रूला टिपता येते. नेमकी हीच सोय कॉर्नरशॉट रायफलने उपलब्ध करून दिली आहे. तिच्यावरील कॅमेऱ्याने शत्रू पाहता येतो आणि बंदूक ९० अंशांत दुमडून गोळी झाडता येते. जुन्या पेरिस्कोप बंदुकांचा हा नवा अवतार आहे. इस्रायलच्या सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमॉस गोलन यांनी अमेरिकी गुंतवणुकीच्या मदतीने कॉर्नरशॉट रायफल तयार केली. तिच्या विविध आवृत्ती अनेक देशांनी स्वीकारल्या. भारतातही झेन टेक्नोलॉजीजने शूटएज नावाने कॉर्नरशॉट बंदूक तयार करण्याचे प्रयत्न केले आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com