सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपमध्ये तसेच अन्यत्र तोफांचे विविध प्रकार अस्तित्वात होते. या काळात युरोपमधील तोफांमध्ये प्रामुख्याने फल्कनेट, फल्कन, मिनियन, सेकर, डेमी-कल्व्हरीन, कल्व्हरीन, डेमी-कॅनन, कॅनन अशा प्रकारच्या तोफांचा समावेश होता. त्यातील फल्कनेट सर्वात लहान तर कॅनन सर्वात मोठी तोफ असे. फल्कनेटकडून कॅननकडे जाताना तोफांचा आकार आणि व्यास वाढत जात असे. त्या साधारण १.१२५ ते ६४ पौंड वजनाचे गोळे डागणाऱ्या तोफा होत्या.

त्यांची नावेही वैशिष्टय़पूर्ण होती. फल्कनेट म्हणजे लहान ससाणा पक्षी, फल्कन म्हणजे बहिरी ससाणा, मिनियन हा इंग्रजीतील ‘क्यूट’ या शब्दाचा फ्रेंचमधील प्रतिशब्द, सेकर हादेखील मध्य-पूर्वेत शिकारीसाठी वापरला जाणारा ससाण्याचाच एक प्रकार, कल्व्हरीन म्हणजे फ्रेंचमध्ये गवतातला एक साप, तर हॉवित्झर हा शब्द झेक ‘हाऊफनाइस’ किंवा जर्मन ‘हाऊफन’ या शब्दांवरून आला आहे. त्यांचा साधारण अर्थ गर्दी किंवा ढीग असा आहे. तोफेला हॉवित्झर हे नाव देताना सैनिकांच्या गर्दीत मारा करणे किंवा तोफगोळ्याचा ढिगासारखा वक्राकार भ्रमणमार्ग (ट्रॅजेक्टरी) या बाबी अभिप्रेत असाव्यात.  त्याशिवाय बॉम्बार्ड, बेसिलिस्क, कॅरोनेड आदी तोफांचे मोठे प्रकारही अस्तित्वात होते.

तोफांचे हे प्रकार बहुतांशी आकाराने खूप मोठे आणि वाहतुकीस अडचणीचे होते. त्यामुळे त्यांचा युद्धात वापर करताना मर्यादा येत असत. तोफा एकाच जागी ठेवून मारा करावा लागत असे. युद्धभूमीवरील बदलत्या सैन्यस्थिती आणि गरजेनुसार त्यांची जागा बदलता येत नसे.

फ्रान्समध्ये १७९२ ते १८१५ या काळात म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यानंतर झालेल्या नेपोलियनच्या युद्धांदरम्यान मोठा बदल घडून आला. नेपोलियन स्वत: तरुणपणी फ्रेंच लष्करात तोफखान्याचा अधिकारी होता. त्या प्रशिक्षणाचा आणि जडणघडणीचा फ्रान्सच्या तोफखान्याच्या आधुनिकीकरणात खूप फायदा झाला. या काळात आणि नंतरही युरोपमध्ये फ्रेंच तोफखाना सर्वात आधुनिक मानला जात असे. फ्रेंच लष्करात अठराव्या शतकात लेफ्टनंट जनरल जाँ बॅप्टिस्ट ग्रिबुवाल नावाचा अधिकारी होता. त्याने तोफखान्यात अनेक सुधारणा केल्या. त्याने वापरात आणलेल्या तोफा आणि पद्धती ‘ग्रिबुवाल सिस्टिम’ म्हणून परिचित आहे. त्याने ४, ८, १२, १६ आणि २४ पौंडांचे गोळे डागणाऱ्या तोफा तयार केल्या. त्यातही ८ आणि १२ पौंडी तोफा सामान्य होत्या. यापूर्वी तोफांचे असे प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) झाले नव्हते.

नेपोलियनच्या पूर्वीच्या काळात तोफा एकाच जागी ठेवून तटबंदीवर किंवा सैन्यावर मारा करण्यासाठी वापरल्या जात. किंवा चढाई करणाऱ्या पायदळाच्या तुकडय़ांना मदत म्हणून वापरल्या जात. नेपोलियनने या पद्धतीत मोठा बदल केला. त्याच्या हलक्या आणि लहान तोफा युद्धभूमीवर सहज वाहून नेता येत असत. त्याने तोफा दुय्यम भूमिकेत वापरण्याऐवजी हल्ल्याच्या मुख्य भूमिकेत वापरल्या. त्यातून ‘मास्ड-बॅटरी फायरिंग’चा प्रकार उदयास आला. शत्रूसैन्याच्या आघाडीवर तोफांचा भडिमार करून भगदाड पाडले जात असे आणि नंतर त्यातून पायदळ किंवा घोडदळ शिरून शत्रूचा पाडाव करत असे. नेपोलियनचा भर किल्ले जिंकण्यापेक्षा शत्रूसैन्याचा नाश करण्यावर होता. बोरोदिनो आणि ऑस्टरलिट्झ येथील लढायांमधील विजयात नेपोलियनला या तंत्रांचा विशेषत: फायदा झालेला दिसतो.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com