|| सचिन दिवाण

शीतयुद्धात प्रत्यक्ष युद्धाचा भडका उडालाच तर पश्चिम युरोपवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियनने ‘वॉर्सा पॅक्ट’ देशांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणावर रणगाडे तयार ठेवले होते. त्याच्या तुलनेत ‘नाटो’ संघटनेच्या देशांचे रणगाडे संख्येने कमी होते. मात्र ते सोव्हिएत युनियनच्या रणगाडय़ांपेक्षा तांत्रिकदृष्टय़ा वरचढ होते. ‘नाटो’ देशांनी सर्व सदस्य देशांच्या शस्त्रास्त्रांमध्ये एकवाक्यता आणण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना पूर्णपणे यश आले नाही. परिणामी प्रत्येक देशाच्या धोरणानुसार वेगवेगळी डिझाइन असलेले रणगाडे तयार झाले. मात्र १९५० च्या दशकापासून ब्रिटिश ‘एल-७’ ही १०५ मिमी व्यासाची तोफ बहुतांशी ‘नाटो’ देशांनी रणगाडय़ांसाठी स्वीकारली.

दुसऱ्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीची पूर्व आणि पश्चिम जर्मनीत विभागणी झाली. युद्धोत्तर काळात १९५५ साली पश्चिम जर्मनीच्या सेनादलांची फेररचना करताना त्यांना प्रामुख्याने अमेरिकेने शस्त्रास्त्रे पुरवली. दोन वर्षांनी जर्मनी आणि फ्रान्सने संयुक्तरीत्या रणगाडा तयार करण्याचा प्रकल्प राबवला. पण १९६२ साली ही भागीदारी फुटली. त्यातून जर्मनीने लेपर्ड-१ तर फ्रान्सने एएमएक्स-३० नावाचा रणगाडा तयार केला. तत्पूर्वी फ्रान्सचा एएमएक्स-१३ हा हलका चिलखतधारी रणगाडा वापरात होता. एएमएक्स-३० रणगाडय़ात संहारकता आणि गतिमानतेला महत्त्व होते. ३७ टनांचा हा रणगाडा ताशी ६४ किमी वेगाने प्रवास करू शकत असे आणि त्यावर १०५ मिमी व्यासाची तोफ होती.

जर्मन लेपर्ड-१ रणगाडय़ात गतिमानतेला अधिक महत्त्व दिले गेले होते आणि त्यांचे चिलखत काहीसे कमी जाडीचे होते. जर्मनीच्या दुसऱ्या महायुद्धातील रणगाडय़ांपेक्षा ही रचना वेगळी होती. लेपर्ड-१ रणगाडय़ासाठी जर्मनीने अनेक कंपन्यांकडून डिझाइन मागवून त्यापैकी म्युनिकच्या ‘क्राऊस-मॅफी’ कंपनीचे सर्वोत्तम डिझाइन १९६३ साली निवडले होते. त्यावर तोफ निवडताना मात्र ब्रिटिशांच्या १०५ मिमीच्या ‘एल-७’ या तोफेला पसंती दिली होती. लेपर्ड-१ मध्ये उत्तरोत्तर सुधारणा झाल्या.

ब्रिटिशांच्या चिफ्टन या रणगाडय़ात चिलखत आणि संहारक क्षमतेला अधिक महत्त्व दिले होते आणि त्याचा वेग काहीसा कमी होता. चिफ्टन १९६६ साली वापरात आला. तो युरोपच्या युद्धभूमीत सोव्हिएत रणगाडय़ांचे आक्रमण थोपवण्याच्या उद्देशाने बनवला होता. ५५ टनांच्या या रणगाडय़ावर १२० मिमी व्यासाची मुख्य तोफ होती. युरोपमधला चालकाचे आसन मागे झुकलेल्या (रेक्लाइन्ड) अवस्थेतील असलेला हा पहिलाच रणगाडा होता. त्याने रणगाडय़ाची उंची कमी होण्यात मदत झाली होती. याशिवाय ब्रिटनच्या सेंच्युरियन रणगाडय़ाची मार्क-१३ ही सुधारित आवृत्ती १९६६ पासून वापरात होती.

अमेरिकेने एम-४७, एम-४८ आणि एम-६० ही पॅटन रणगाडय़ांची मालिका वापरात आणली. त्यात कालानुसार सुधारणा होत गेल्या. एम-६० रणगाडा १९६३ साली वापरात आला. त्यावर १०५ मिमीची तोफ बसवल्याने त्याची मारकक्षमता वाढली होती. तसेच त्याचे चिलखत अधिक जाड आणि डिझेल इंजिन पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक प्रभावी होते.

‘नाटो’च्या या रणगाडय़ांमध्ये आधुनिक फायर कंट्रोल सिस्टिम, लेझर आणि इन्फ्रारेड रेंज फाईंडर अशा सुविधा होत्या. यातील अनेक रणगाडय़ांनी इराण-इराक युद्ध, अरब-इस्रायल युद्धे, १९९१ चे आखाती युद्ध, बोस्निया, अफगाणिस्तान, येमेन आदी संषर्घामध्ये भाग घेतला.

sachin.diwan@expressindia.com