दुसऱ्या महायुद्धापासून जर्मन चिलखती दले जगातील उत्कृष्ट राहिली आहेत. त्या अनुभवाला जर्मन अभियांत्रिकीची जोड मिळून आधुनिक काळातील लेपर्ड-२ हा उत्तम रणगाडा आकारास आला आहे. त्यामध्ये संहारक क्षमता, गतिमानता आणि संरक्षण यांचा सुरेख संगम साधला आहे. लेपर्ड-२ रणगाडय़ाच्या विकासाला १९७४ मध्ये प्रारंभ झाला आणि आणि जर्मन सेनादलात त्याचे १९७९ साली आगमन झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्याची जगातील सर्वोत्तम मेन बॅटल टँक्समध्ये (एमबीटी) गणती होते.

जर्मनीच्या लेपर्ड-१ रणगाडय़ाची निर्मिती फ्रान्सबरोबरील भागीदारी संपल्यानंतर झाली. तर लेपर्ड-२ ची निर्मिती रणगाडानिर्मितीसाठी अमेरिकेशी केलेली भागीदारी संपल्यानंतर झाली. एमबीटी-७० नावाच्या संयुक्त प्रकल्पातून माघार घेतल्यानंतर जर्मनीने स्वतंत्रपणे त्या प्रकल्पांतर्गत विकसित केलेली यंत्रणा वापरून व क्राऊस-मॅफी कंपनीच्या सहकार्याने त्यात सुधारणा करून लेपर्ड-२ बनवला. त्याचे चिलखत अतिकठीण पोलाद, टंगस्टन, प्लास्टिक आणि सिरॅमिक यांच्या अनेक थरांपासून बनवलेले (कॉम्पोझिट आर्मर) आहे. या रणगाडय़ाचे वजन ५८ टनांवर आहे. तरीही त्याच्या १२ सिलिंडरच्या १५०० अश्वशक्तीच्या इंजिनामुळे त्याचा वेग ताशी ७२ किमी इतका असून तो एका दमात ५०० किमीपर्यंत मजल मारू शकतो. त्यावर ऱ्हाइनमेटलने विकसित केलेली एल-४ ही १२० मिमी व्यासाची आतील पृष्ठभाग गुळगुळीत असलेली (स्मूथ बोअर) तोफ आहे. त्याच्या सुधारित आवृत्तीत थोडी अधिक लांबीची एल-५५ ही तोफ बसवण्यात आली. याशिवाय दोन मशीनगन आहेत.

या रणगाडय़ात लेझर रेंज डेटा प्रोसेसर, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, कमांडरसाठी पेरिस्कोप, आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्रांपासून संरक्षण (एनबीसी), रणगाडाविरोधी शस्त्रांपासून संरक्षण, तोफेला बसवलेला फ्यूम एक्स्ट्रॅक्टर आणि थर्मल स्लीव्ह आदी अत्याधुनिक सुविधा आहेत. या सर्व गुणवैशिष्टय़ांमुळे लेपर्ड-२ जगातील सर्वोत्तम रणगाडय़ांपैकी एक बनला आहे.

त्यामुळे जर्मनीसह ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वित्र्झलड, स्वीडन, स्पेन आदी देशांच्या सैन्याने तो स्वीकारला आहे. आजवर ३२०० हून अधिक लेपर्ड-२ रणगाडय़ांची निर्मिती झाली आहे. याशिवाय फिनलंड, पोलंड, ग्रीस, तुर्कस्तान आदी देशांनी त्यांच्या खरेदीसाठी ऑर्डर नोंदवल्या आहेत. आजवर त्याच्या अनेक सुधारित आवृत्ती तयार झाल्या असून सध्या लेपर्ड-२ ए ६ ही सर्वात नवी आवृत्ती वापरात आहे. त्यापुढे लेपर्ड-२ ए ६ ईएक्स या भविष्यातील आवृत्तीवर संशोधन सुरू आहे.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com