पहिल्या महायुद्धात १९१६ साली फ्रान्समधील सोमच्या लढाईत रणगाडय़ांचा युद्धात सर्वप्रथम वापर झाला. तेव्हापासून आजपर्यंत त्यात बरीच उत्क्रांती झाली आहे. गतिमानता, संरक्षण, संहारकक्षमता हे रणगाडय़ाचे मुख्य घटक. त्यात अनेक सुधारणा होऊन आजचे अत्याधुनिक रणगाडे आकारास आले.

रणगाडय़ाला वेग पुरवणारे साधन म्हणजे इंजिन. सुरुवातीच्या रणगाडय़ांमध्ये बहुतांशी शेतीच्या ट्रॅक्टरसाठी बनवलेली इंजिने वापरात होती. त्यांची ताकद कमी होती आणि ती खूप धूर सोडत असत. दोन महायुद्धांदरम्यान विमानांचा वापर वाढत चालला होता. त्याचा रणगाडय़ांवरही परिणाम झाला. या काळात अनेक रणगाडय़ांना विमानांची इंजिने बसवलेली होती. त्यानंतर डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी इंजिने वापरात होती. १९५० च्या दशकापर्यंत बहुतांशी रणगाडे १२ सिलिंडरच्या डिझेल इंजिनांवर चालत होते. त्यांची साधारण शक्ती ७५० बीएचपी इतकी होती. त्यात वेगाने सुधारणा होऊन शक्ती जवळपास दुप्पट वाढली. २० व्या शतकाच्या अखेपर्यंत सोव्हिएत टी-८० आणि अमेरिकी एम १ अ‍ॅब्राम्स रणगाडय़ांवर गॅस टर्बाइन इंजिने बसवली गेली.

विसाव्या शतकातील मेन बॅटल टँक्सचे वजन साधारण ६० टनांच्या आसपास होते. त्यांना वेग देण्यासाठी तितक्याच शक्तीशाली इंजिनांची गरज होती. येथे एक संकल्पना लक्षात घेणे गरजेचे आहे. रणगाडय़ाचे वजन आणि त्याला गती देणाऱ्या इंजिनाची क्षमता यांचे गुणोत्तर ‘पॉवर टू वेट रेशो’ म्हणून ओळखले जाते. पहिल्या महायुद्धातील रणगाडय़ांचा ‘पॉवर टू वेट रेशो’ केवळ ४ अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) प्रतिटन इतका होता. दुसऱ्या महायुद्धापर्यंत तो साधारण १२ ते १५ अश्वशक्ती प्रतिटन इतका वाढला होता. सध्या तो साधारण २५ अश्वशक्ती प्रतिटन इतका आहे. म्हणजेच आजचे रणगाडे अधिक शक्तिशाली आहेत.

रणगाडय़ांच्या गतिमानतेत त्यांच्या चाकांवरील विशिष्ट रचनेच्या ट्रॅक्स किंवा सामान्य व्यक्तीच्या भाषेत चेनला खूप महत्त्व आहे. सुरुवातीला हे ट्रॅक्स साध्या धातूच्या पट्टय़ा एकमेकांना जोडून बनवले होते. ते वाहतुकीसाठी फारसे सुलभ नव्हते. त्यांनी रणगाडा बाजूला वळवणे शक्य होत नसे. तसेच ते वरचेवर निसटत असत. त्यावर मात करण्यासाठी चाके आणि ट्रॅक यांना जोडणाऱ्या ट्रॅक गाइडची रचना केली गेली. व्हिकर्स मीडियम टँकचे ट्रॅक्स अरुंद होते. त्यामुळे त्याचा वेग वाढला होता. तर जर्मन टायगर रणगाडय़ाला बरेच रुंद ट्रॅक्स होते. त्याने त्याचे वजन पेलण्यास मदत होत असे. आजच्या अनेक रणगाडय़ांना धातूच्या ट्रॅक्ससह रबरी पॅड्स असतात. त्याने ओबडधोबड आणि सपाट अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीवर वेगाने प्रवास करता येतो. तसेच गतिमानतेत रणगाडय़ाची रोड व्हिल (चाके), ट्रॅक्सना गती देणारे दातेरी चाक (ड्राइव्ह स्प्रॉकेट) आणि वरच्या बाजूचे ट्रॅक रिटर्न रोलर यांचीही रचना आणि भूमिका महत्त्वाची असते.

रणगाडय़ाला ओबडधोबड जमिनीवरून प्रवास करताना स्थैर्य देण्याची खूप गरज असते. शत्रूवर तोफेने नेम धरताना आणि सैनिकांना काम करताना त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे रणगाडय़ाचे सस्पेंशन विकसित होत गेले. सुरुवातीच्या लीफ स्प्रिंगपासून नंतर व्हॉल्युट स्प्रिंग, क्रिस्ती सस्पेंशन, हॉर्ट्समान या प्रकारांकडून सध्याच्या टॉर्शन बार आणि हायड्रोन्यूमॅटिक सस्पेंशनकडे प्रवास होत गेला. त्यातून रणगाडे अधिक गतिमान आणि वापरास सुलभ बनत गेले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com