मानवी संस्कृती जमिनीवर स्थिरस्थावर होत असतानाच माणूस पाण्याचा अडथळा पार करण्याचेही प्रयत्न करू लागला होता. सरोवरे, नद्या, समुद्र अशा जलमय प्रदेशात मिळणारे मासे हा अन्नाचा प्रमुख स्रोत होता. त्याच्या मिषाने तो प्रथम पाण्यात गेला असावा. पाण्यावर तरंगणाऱ्या विविध वस्तूंचा वापर करून नौकानिर्मितीचे तंत्रही विकसित होत गेले.  त्यानंतर अन्य प्रदेशांचा शोध घेणे, तेथील संसाधने वापरणे, त्यांचा व्यापार करणे, वसाहती स्थापन करणे अशा कृतींमधून सागरी चलनवलन वाढले. त्यातून हितसंबंध तयार होऊन त्यांच्या रक्षणासाठी पहिली सागरी युद्धे झाली.

नौदलासाठीचा इंग्रजी नेव्ही हा शब्द जुन्या फ्रेंच नेव्ही किंवा लॅटिन नेव्हिजियम या शब्दावरून आला आहे. नेव्हिजियम म्हणजे नौका किंवा जहाज आणि नेव्ही म्हणजे नौकांचा समूह. नेव्हल हा शब्द लॅटिन नेव्हलिस म्हणजे नौकांसंबंधीच्या बाबी यावरून आला आहे. या नेव्ही किंवा नाविक दलाचे दोन प्रकार. पहिला प्रवासी, मालवाहू, व्यापारी जहाजे किंवा र्मचट नेव्ही. दुसरा प्रकार म्हणजे लढाऊ जहाजे, युद्धनौका यांनी सज्ज नौदल ज्याला सामान्यपणे नेव्ही म्हटले जाते.

देशाच्या संसाधनांच्या गरजा पूर्ण करणे हे र्मचट नेव्हीचे काम. तर र्मचट नेव्ही ज्या प्रदेशातून ये-जा करते त्या सागरी मार्गाचे (सी लाइन्स ऑफ कम्युनिकेशन्स-स्लॉक्स) आणि र्मचट नेव्हीच्या जहाजांचे रक्षण करणे, देशाच्या सागरी हद्दीचे, तेथील साधनसंपत्तीचे आणि जमिनीवरील सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, परदेशांत देशाच्या हितसंबंधांचे रक्षण करणे तसेच देशाच्या लष्करी सामर्थ्यांचे जमिनीवरील सीमांच्या पलीकडे प्रदर्शन (पॉवर प्रोजेक्शन) करणे अशी नौदलाची सामान्यपणे कार्ये आहेत.

नौदलाच्या कार्यक्षेत्रानुसार त्याचे काही प्रकार आहेत. त्यात नद्या, सरोवरे किंवा किनाऱ्याजवळच्या प्रदेशात काम करताना त्याला ब्राऊन वॉटर नेव्ही म्हणतात. खोल समुद्रात कारवाया करणाऱ्या नौदलाला ब्लू वॉटर नेव्ही म्हणतात. तर या दोन्हींच्या साधारण मधील क्षेत्रात  काम करणारे नौदल ग्रीन वॉटर नेव्ही म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचा साधारण ७१ टक्के पृष्ठभाग समुद्रांनी व्यापला आहे. मात्र नौदलाच्या बहुतांशी कारवाया इतक्या विस्तृत प्रदेशात क्वचितच होतात. त्या प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या काही सागरी मैलांच्या प्रदेशात होतात. किनाऱ्यापासूनच्या काही अंतरावरील या समुद्री पट्टय़ाला लिटोरल झोन असे म्हणतात.

जमिनीवरील मैल हा १.६ किलोमीटरचा असतो. सागरी मैल किंवा नॉटिकल माइल हा १.८ किलोमीटरचा असतो. देशांच्या सागरी सीमा निश्चित करताना किनाऱ्यापासून समुद्रातील १२ सागरी मैलांचा पट्टा हा टेरिटोरियल सी म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात येण्यासाठी अन्य देशांच्या जहाजांना परवानगी घ्यावी लागते. तेथील सर्व साधनसंपत्तीवर त्या देशाचा हक्क असतो. त्यापुढील आणखी १२ सागरी मैलांचा पट्टा (किनाऱ्यापासून २४ सागरी मैल) कंटिग्युअस झोन म्हणून ओळखला जातो. किनाऱ्यापासून समुद्रातील २०० सागरी मैलांचा प्रदेश हा त्या देशाचा एक्स्क्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन समजला जातो. त्या प्रदेशात अन्य देशांची जहाजे ये-जा करू शकतात; पण तेथील साधनसंपत्तीला हात लावू शकत नाहीत. ती त्या देशाची असते. जेथे दोन देशांच्या समुद्रातील अंतर कमी असेल तेथे सीमा निम्म्यावर निश्चित केल्या जातात. नौदलाला मदत करण्यासाठी जमिनीवरील निमलष्करी दलांप्रमाणे समुद्रात तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) असते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com