एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एखाद्या देशाची ताकद त्याच्याकडे असलेल्या नौदलाच्या क्षमतेवर आणि त्यातही मोठय़ा युद्धनौकांवरून (बॅटलशिप) मोजली जात असे. मात्र १८६६ साली रॉबर्ट व्हाइटहेड यांनी शोधलेल्या लहानशा पण घातक टॉर्पेडोने त्यांच्या वर्चस्वाला हादरा दिला होता. त्यानंतर १८८० च्या दशकापर्यंत बहुतांशी प्रमुख देशांच्या नौदलात मोठय़ा प्रमाणात टॉर्पेडो डागणाऱ्या टॉर्पेडो बोट्स वापरात आल्या होत्या. त्यांच्यावरील टॉर्पेडोचा पल्ला ५०० मीटपर्यंत होता तर साधारण टॉर्पेडो बोटचा वेग ताशी १८ नॉट्सच्या आसपास होता. त्या काळातील युद्धनौकांच्या तुलनेने हा वेग बराच होता आणि त्यामुळे लहानशा पण वेगवान टॉर्पेडो बोट्स मोठय़ा युद्धनौकांवर मारा करून वेगाने निघून जात.

टॉर्पेडो बोट्सच्या संकटावर मात करण्यासाठी किंवा त्यांचा नाश करण्यासाठी नव्या प्रकारच्या युद्धनौकांचा उदय झाला. या नौका टॉर्पेडो बोट्सचा पाठलाग करून त्यांना नष्ट करत. त्यांना प्रथम कॅचर्स म्हटले जात असे. नंतर त्यांचा आकार आणि क्षमता वाढली. मग त्यांना टॉर्पेडो-बोट डिस्ट्रॉयर म्हटले जाऊ लागले. त्यांचा वापर वाढला आणि त्यांना नुसते डिस्ट्रॉयर (विनाशिका) म्हटले जाऊ लागले.  विनाशिका आकाराने मध्यम, काही प्रमाणात चिलखती आवरण असलेल्या, वेगवान आणि शत्रूच्या नौकांचा नाश करण्यासाठी तोफा, टॉर्पेडो आणि अन्य शस्त्रांनी सज्ज होत्या. नौदलाच्या ताफ्यातील अन्य नौकांचे रक्षण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असे.

ब्रिटिश नौदलाने १८९२-१८९३ साली पहिल्या सहा विनाशिकांची निर्मिती केली. ब्रिटिश नौदलातील विनाशिकांची संख्या १८९५ सालापर्यंत ३६ पर्यंत गेली होती. त्यात एचएमएस गॉसमर आणि एचएमएस रॅटलस्नेक या वर्गातील विनाशिकांचा प्रामुख्याने समावेश होता. टॉर्पेडो बोट्सचा नाश करण्यासाठी या विनाशिकांवर तोफा आणि अन्य शस्त्रे बसवली होती. त्यांचा वेग ताशी २७ नॉट्स इतका होता. त्या काळी वापरात असलेल्या टॉर्पेडो बोट्सचा वेग ताशी २४ नॉट्स होता. त्यामुळे टॉर्पेडो बोट्सच्या तुलनेत त्यांना आघाडी मिळत होती.

यानंतर ब्रिटनने एचएमएस हॅवॉक आणि एचएमएस हॉर्नेट या वर्गातील विनाशिकांची निर्मिती केली. त्यांचा वेग ताशी ३० नॉट्सपर्यंत वाढला होता. त्यांच्यावर १२ पौंडांचे गोळे डागणारी एक आणि ६ पौंडांचे गोळे डागणाऱ्या पाच तोफा बसवल्या होत्या. शिवाय या विनाशिकांवर टॉर्पेडो डागण्यासाठी दोन टॉर्पेडो-टय़ूब्जही बसवल्या होत्या. अशा प्रकारच्या ६८ विनाशिकांची ब्रिटनने बांधणी केली. सुरुवातीला त्यांचे वजन (डिस्प्लेसमेंट) २८५ टन इतके होते. ते नंतर ३६० टनांपर्यंत वाढत गेले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com