डिस्ट्रॉयर (विनाशिका) आणि फ्रिगेट या प्रकारच्या युद्धनौकांच्या खालोखाल कॉव्‍‌र्हेट या प्रकारच्या लहान नौका असतात. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात शिडाच्या लहान आणि वेगवान नौकांना कॉव्‍‌र्हेट म्हटले जात असे. विसाव्या शतकातील कॉव्‍‌र्हेट त्यांच्यापेक्षा वेगळ्या होत्या. त्यांची बांधणी लाकडाऐवजी धातूची होती आणि त्या यांत्रिक इंजिनावर चालत. त्या आकाराने आणि वजनाने अन्य नौकांपेक्षा लहान आणि वेगवान असल्या तरी त्यांची भूमिका बदलली होती. विसाव्या शतकात कॉव्‍‌र्हेट प्रामुख्याने व्यापारी नौकांना शत्रूच्या पाणबुडय़ांपासून संरक्षण पुरवण्यासाठी वापरल्या गेल्या.

डच कॉर्फ या शब्दाचा अर्थ लहान नौका असा होतो. त्यावरून फ्रेंचमधील कॉव्‍‌र्हेट हा शब्द आला असे मानले जाते. १८४० च्या दरम्यान कॉव्‍‌र्हेट आणि स्लूप या प्रकारच्या लहान आणि वेगवान नौका व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असत. त्या शिडासह वाफेच्या शक्तीवरही चालवल्या जात होत्या. अमेरिकेची १८४३ सालची यूएसएस प्रिन्सटन ही कॉव्‍‌र्हेट ९५ टन वजनाची आणि ५० मीटर लांबीची होती. तिच्यावर काही तोफाही बसवलेल्या होत्या. आधुनिक कॉव्‍‌र्हेट साधारण ५०० ते २००० टन वजनाच्या असतात.

आधुनिक काळातील कॉव्‍‌र्हेट मुख्यत्वे दुसऱ्या महायुद्धात विकसित झाल्या. अमेरिका आणि अन्य देशांकडून ब्रिटनला होणारा अन्न, कच्चा माल आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखण्यासाठी जर्मनीने पाणबुडय़ा वापरून ब्रिटनच्या व्यापारी नौका अटलांटिक महासागरात बुडवण्यास सुरुवात केली. त्यापासून बिटिश व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी सुरुवातीला व्हेल माशांची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नौका गडबडीने कॉव्‍‌र्हेट प्रकारात रूपांतरित करण्यात आल्या. पण त्या या कामासाठी अपुऱ्या होत्या. नंतर त्यात सुधारणा करून क्षमता वाढवली गेली. त्यातून फ्लॉवर वर्गातील प्रसिद्ध कॉव्‍‌र्हेट्स तयार झाल्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com