जर्मन अ‍ॅडमिरल आल्फ्रेड टर्पिट्झ यांनी निगुतीने वाढवलेले नौदल पहिल्या महायुद्धात ब्रिटिश नौदलाचे वर्चस्व पूर्णपणे संपवण्यास अयशस्वी ठरले असले तरी ब्रिटिश नौदलासाठीही विजयाची किंमत मोठी होती.

युद्धानंतर मोठय़ा ड्रेडनॉट प्रकारच्या युद्धनौकांसाठीचा अट्टहास थोडा कमी झाला असला तरी पूर्ण संपला नव्हता. आजवर अशा मोठय़ा बॅटलशिपनी नौदलाच्या कॅपिटल शिप म्हणून सन्मान मिरवला होता. आता पाणबुडय़ा आणि विमानवाहू नौका ती जागा घेण्यास सज्ज होऊ लागल्या होत्या. पहिल्या महायुद्धातील जटलँडच्या सागरी लढाईत काही प्रमाणात अगदी प्राथमिक अवस्थेतील विमानांचा वापर झाला होता. ब्रिटिश सीप्लेन टेंडर कँपानिया आणि एनगॅडिन नावाच्या नौकांवरून काही विमाने टेहळणीसाठी वापरली होती. ब्रिटिशांकडे सॉपविथ श्नायडर, सॉपविथ बेबी, शॉर्ट १८४, फेअरी कँपानिया, सॉपविथ स्टट्रर, सॉपविथ पप, सॉपविथ कॅमल, सॉपविथ ककू आदी नौकेवरून वापरली जाणारी विमाने होती. ब्रिटिश फ्लाइट लेफ्टनंट एफ. जे. रटलँड हा ‘रटलँड ऑफ जटलँड’ म्हणून नावारूपास आला. तर जर्मनीने झेपेलीन विमानांचा मर्यादित वापर केला होता.

शस्त्रनिर्मितीवर खूप मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर शस्त्रस्पर्धा रोखण्यासाठी १९२२ साली वॉशिंग्टन करार झाला. त्यानुसार अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि इटली या देशांनी नौदलाच्या विकासावर काही मर्यादा घालून घेतल्या. ठरावीक मर्यादेवरील युद्धनौका बांधणीला मज्जाव होता. त्यामुळे अमेरिका व जपानने त्या वेळी बांधल्या जात असलेल्या युद्धनौकांची रचना बदलून त्यांचे रूपांतर विमानवाहू नौकांमध्ये केले.

ब्रिटिश नौदलात १९२९ साली ईगल आणि १९२४ साली हर्मिस या विमानवाहू नौका दाखल झाल्या. ब्रिटनने १९२० च्या दशकात फ्युरियस, करेजस आणि ग्लोरियस या मूळच्या क्रुझरना विमानवाहू नौकांत रूपांतरित केले. १९३८ साली आर्क रॉयल विमानवाहू नौका ब्रिटिश नौदलात दाखल झाली. अमेरिकेने १९२० च्या दशकात लँग्ले, लेक्झिंग्टन आणि साराटोगा या विमानवाहू नौका बांधल्या. त्यापाठोपाठ १९३० च्या दशकात यॉर्कटाऊन आणि वास्प वर्गातील विमानवाहू नौका बांधल्या. जपानने अ‍ॅडमिरल इसोरोकू यामामोटो यांच्या नेतृत्वाखाली १९२०-३० च्या दशकांत होशो, अकागी, कागा, रियुजो या विमानवाहू नौका बांधल्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com