|| सचिन दिवाण

इतिहास काळापासून नौकांचा वापर सैन्य वाहून नेऊन हव्या त्या ठिकाणी युद्धात उतरवण्यासाठी केला जात आहे. आधुनिक काळात त्याचे प्रमुख उदाहरण पहिल्या महायुद्धात भूमध्य समुद्राजवळ गॅलिपोली किंवा दार्दानील्स येथील कारवाईत आढळते. अशा प्रकारे समुद्रमार्गे नोकांमधून सैन्य नेऊन ते जमिनीवर उतवून केलेल्या हल्ल्याला ‘अ‍ॅम्फिबियस ऑपरेशन’ म्हणतात. बेडूक किंवा अन्य उभयचर प्राण्यांना अ‍ॅम्फिबियस म्हणतात. ते जसे जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे वावर करू शकतात तशा कारवायांना अ‍ॅम्फिबियस ऑपरेशन्स आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नौकांना अ‍ॅम्फिबियस शिप किंवा क्राफ्ट म्हटले जाते. त्या जमिनीवर सैन्य उतरवण्यासाठी वापरल्या जातात म्हणून त्यांना लँडिंग शिप किंवा लँडिंग क्राफ्ट असेही म्हटले जाते.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे तंत्र बरेच विकसित झाले होते. या कामासाठी खास नौका विकसित केल्या गेल्या होत्या. त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील अनेक कारवायांत उपयोग केला गेला. त्यात जर्मनीची नॉर्वेतील कारवाई, ब्रिटिश आणि मित्रराष्ट्रांनी केलेली उत्तर आफ्रिकेतील कारवाई (ऑपरेशन टॉर्च), सिसिलीतील कारवाई (ऑपरेशन हस्की), इटलीतील सालेर्नो येथील कारवाई (ऑपरेशन अ‍ॅव्हलांच) आदींचा समावेश होतो. मात्र त्या सगळ्यांवर कडी केली ती ६ जून १९४४ रोजी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आदी देशांनी फ्रान्समधील नमडी येथील किनाऱ्यावर सैन्य उतरवण्याठी केलेली कारवाई. युरोपमध्ये जर्मनीविरुद्ध दुसरी आघाडी उघडण्याच्या या मोहिमेचे नाव होते ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड.’ त्यामध्ये १,२१३ युद्धनौका आणि अन्य प्रकारच्या नौका वापरल्या होत्या. त्यातून पहिल्या दिवशी (डी-डे) १,३०,००० सैन्य इंग्लिश खाडीतून पलीकडे फ्रान्समध्ये उतरवले गेले.

खोल समुद्रातून किनाऱ्याजवळ सैन्य, रसद आणि शस्त्रास्त्रे वाहून नेणाऱ्या मोठय़ा नौकांना लँडिंग शिप म्हटले जात होते. तर त्यातून प्रत्यक्ष किनाऱ्यावर सैन्य उतरवणाऱ्या लहान नौकांना लँडिंग क्राफ्ट म्हटले जात असे. त्यातही विशिष्ट कामगिरीनुसार उपप्रकार पडत. त्यात रणगाडे वाहून नेणाऱ्या लँडिंग शिप टँक, पायदळाला नेणाऱ्या लँडिंग क्राफ्ट इन्फंट्री, हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लँडिंग क्राफ्ट असॉल्ट अशा नौका होत्या. सैन्याला मदतीसाठी मध्यम प्रतीच्या तोफा बसवलेल्या लँडिंग क्राफ्ट गन आणि रॉकेटचा मारा करणाऱ्या लँडिंग क्राफ्ट रॉकेट अशाही सुधारित नौका होत्या.

sachin.diwan@expressindia.com