अमेरिकेने ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली. तत्पूर्वी आणखी एका शस्त्राचा उदय झाला होता. नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात व्ही-१ आणि व्ही-२ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पहिल्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. तसेच जर्मन वायुदलाने (लुफ्तवाफ) हेन्शेल एचएस-२९३ नावाचा रेडिओ-कंट्रोल्ड गायडेड बॉम्ब बनवला होता. ते सुरुवातीचे युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र (गायडेड मिसाइल) होते. भूमध्य समुद्रातील युद्धात जर्मन वायुदलाने जानेवारी १९४४ मध्ये हेन्शेल एचएस-२९३ क्षेपणास्त्र डागून ब्रिटनची स्पार्टन नावाची क्रूझर युद्धनौका बुडवली होती. अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे या दोन नव्या अस्त्रांचा उदय झाला होता. त्याने सर्वच युद्धतंत्र बदलले.

या बदलांना नौदलही अपवाद नव्हते. या काळापर्यंत मोठय़ा युद्धनौका नौदलाच्या प्रमुख अस्त्र (कॅपिटल शिप) होत्या. मात्र युद्धनौकेवरील तोफांच्या पल्ल्यापेक्षा विमानवाहू नौकांवरील विमानांचा पल्ला अधिक असल्याने आणि विमानांवर टॉर्पेडो बसवून हल्ला करता येत असल्याने युद्धनौकांचा वापर मागे पडत चालला होता. युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात युद्धनौकांची समोरासमोरील चकमक बंद होऊन त्यांचा शत्रूच्या किनाऱ्यावर सैन्य उतरवण्यापूर्वी तोफांचा भडिमार करण्यासाठी प्रामुख्याने वापर होऊ लागला. जपानच्या मुख्य भूमीवर हल्ला करण्यापूर्वी प्रशांत महासागरातील ग्वाडलकॅनॉल, इवो जिमा, ओकिनावा या बेटांवरील हल्ल्यात युद्धनौकांचा असाच वापर केला गेला.

अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा उदय आणि  रडार व पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात झालेल्या सुधारणा यांनी युद्धनौकांच्या जुन्या प्रकारांचे स्वरूप एकदम पालटून टाकले. अमेरिकेने आयोवा वर्गातील युद्धनौका दुसऱ्या महायुद्धानंतरही वापरात ठेवल्या असल्या तरी त्यानंतर १९५० ते १९५३ या काळात झालेल्या कोरियन युद्धातही युद्धनौकांची भूमिका किनाऱ्यावर तोफांच्या माऱ्यापुरतीच मर्यादित होती. ब्रिटनने त्यांची व्हॅनगार्ड ही अखेरची बॅटलशिप १९६० च्या दशकात निकालात काढली.

क्रूझर या प्रकारच्या नौकांचे मोठय़ा, बहुउद्देशीय (जनरल पर्पज) युद्धनौकांमध्ये रूपांतर झाले. तर आधुनिक विनाशिका (डिस्ट्रॉयर) ही टॉर्पेडो-बोटविरोधी नौका न राहता लांब पल्ल्याच्या विमानवेधी क्षेपणास्त्रांनी सज्ज विमानविरोधी नौका (अँटी-एअरक्राफ्ट शिप) बनली. ब्रिटिशांनी जुन्या काळातील फ्रिगेट  नौकांना १९४० च्या दशकात पुनरुज्जीवित करून पाणबुडीविरोधी भूमिकेत वापरले. सध्याच्या काळात फ्रिगेट याच बहुतांशी वापरल्या जाणाऱ्या नौका आहेत. सुरुंगशोधक आणि नाशक नौका (माइन-स्पीवर्स) आता माइनहंटर्स किंवा माइन काउंटरमेजर्स व्हेसल बनल्या आहेत.

पाणबुडय़ा आणि विमानवाहू नौका अणुशक्तीवर चालू लागल्याने त्यांना अमर्यादित पल्ला मिळाला आहे. युद्धनौकांचे नियंत्रण, शस्त्रास्त्रांचे संचालन पूर्वीसारखे बोटीच्या ब्रिजवरून न होता आता ते संगणकांनी सज्ज अ‍ॅक्शन इन्फर्मेशन ऑफिस किंवा ऑपरेशन्स रूममधून होऊ लागले आहे. सध्याच्या एका अण्वस्त्रधारी पाणबुडीवर दुसऱ्या महायुद्धात सर्व देशांनी मिळून वापरलेल्या एकूण बॉम्बपेक्षा अधिक संहारक क्षमता आहे. आताच्या एका अमेरिकी विमानवाहू नौकेवर एखाद्या लहान देशाच्या संपूर्ण हवाई दलापेक्षा अधिक विमाने असतात. आता पाणबुडय़ा आणि विमानवाहू नौका नौदलाच्या ‘कॅपिटल शिप’ बनल्या आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com