युजीन एली यांनी १९११ साली युद्धनौकेवरून पहिले विमान उड्डाण केले तेव्हा स्वतंत्र विमानवाहू नौका ही संकल्पना अस्तित्वात आली नव्हती.  १९१३ साली एचएमएस हर्मिस या ब्रिटिश नौकेवर लहान धावपट्टी आणि तीन विमानांची सोय केली गेली. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश नौकांवरून सी-प्लेन पाण्यात उतरवून उडवण्याची आणि पुन्हा पाण्यात उतरवून बोटीवर उचलून घेण्याची सोय होती. ब्रिटनने १९३८ साली बांधलेल्या एचएमएस आर्क रॉयल या विमानवाहू नौकेवर आजच्या आधुनिक विमानवाहू नौकांप्रमाणे विमान उतरवून घेण्यासाठी अरेस्टर वायर, नेट क्रॅश बॅरियर होती. विमानांना मार्गदर्शनासाठी बॅट्समन आणि उड्डाणाला मदतीसाठी कॅटापुल्ट आदी सोयी होत्या. प्रशांत महासागरात १९४२ साली झालेले कोरल सी आणि मिडवे येथील संग्राम या पूर्णपणे विमानवाहू नौकांच्या लढाया होत्या.

विमानवाहू नौकांच्या विकासात प्रत्यक्ष नौका, त्यावरील विमाने आणि विमानांवरील शस्त्रे अशा तीन घटकांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर तिन्हींतही वेगाने बदल झाले. १९४५ साली विमानवाहू नौकांवरील सर्वात वेगवान असलेल्या कोर्सेअर या पिस्टन-इंजिन लढाऊ विमानांचा वेग ताशी ७५७ किमी इतका होता. १९६० च्या दशकापर्यंत वापरात आलेल्या मॅकडोनेल डग्लस फँटम या विमानांचा वेग ताशी २,२७८ किमी इतका होता आणि त्यांचे वजन कोर्सेअरच्या पाचपट अधिक होते. इतक्या वेगवान विमानांना उड्डाणासाठी धावपट्टीही मोठी लागत होती. त्यामुळे विमानवाहू नौकांची लांबी आणि आकार वाढवावा लागला. अमेरिका सोडल्यास अन्य देशांना ते फारसे प्रभावीपणे करणे जमले नाही.

ब्रिटनने १९४६ साली ओशन या विमानवाहू नौकेवर सी व्हॅम्पायर या पहिल्या जेट विमानाच्या उतरण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर ब्रिटिशांनी जेट विमानांच्या उड्डाणासाठी नौकेच्या इंजिनमधील वाफेचा वापर करून कॅटापुल्ट बनवले. ते विमानाला गलोरीप्रमाणे हवेत भिरकावत. तसेच विमानांच्या उड्डाणाला मदतीसाठी धावपट्टीच्या टोकाला तिरपा चढ असलेले स्की-जंप रॅम्प तयार केले. याशिवाय मुख्य धावपट्टीशी थोडय़ा कोनात असलेली दुसरी धावपट्टी किंवा अँगल्ड डेक तयार केला. त्याने एकाच वेळी विमानांच्या उड्डाणाची आणि उतरण्याची सोय झाली आणि अपघातांचे प्रमाण कमी झाले. डेकवरील ब्रिज किंवा सुपरस्ट्रक्चर एका बाजूला हटवल्याने धावपट्टीला जागा मोकळी झाली.

ब्रिटनने १९७० च्या दशकात सी-हॅरियर ही व्हर्टिकल/शॉर्ट टेक-ऑफ लँडिंग (व्हीएसटीओएल) म्हणजे सरळ उभी हवेत उड्डाण करणारी किंवा तशीच उतरू शकणारी विमाने बनवली. त्याने विमानवाहू नौकांवरील लांब धावपट्टीची गरज संपली. ब्रिटनने सी-हॅरियर असलेल्या एचएमएस इन्व्हिन्सिबल वर्गातील तीन नौका बनवल्या. त्यानंतर सोव्हिएत युनियननेही व्हीएसटीओएल तंत्रावर आधारित याकोवलेव याक-३६ एमपी फोर्जर ही विमानवाहू नौकांवरील लढाऊ विमाने बनवली. अमेरिकेची यूएसएस एन्टरप्राइझ ही अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू नौका १९६१ साली दाखल झाली. या ७५,७०० टनी नौकेवर १०० विमाने मावतात आणि ही नौका अणुइंधन पुन्हा भरण्याची गरज न लागता सलग २० वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करू शकते. विमानवाहू नौकांवर हेलिकॉप्टरही दाखल झाल्याने कमांडोंना खास कारवायांसाठी कोठेही उतरवणे आणि तेथून परत आणणे शक्य झाले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com