आधुनिक काळात अणुशक्तीवर चालणारी आणि क्षेपणास्त्रांवरून अणुबॉम्ब डागणारी पाणबुडी (एसएसबीएन) हे सर्वात विध्वंसक शस्त्र आहे. सध्या अमेरिका किंवा रशियाच्या अशा एका एसएसबीएनवर दुसऱ्या महायुद्धात सर्व देशांनी मिळून जितके बॉम्ब वापरले त्यापेक्षा अधिक संहारक क्षमता आहे.

या पाणबुडय़ांच्या (एसएसबीएन) वापराचे तत्त्वज्ञानही (ऑपरेशनल फिलॉसॉफी) वेगळे आहे. अणुबॉम्बचा आणि ती टाकू शकणाऱ्या विमाने आणि क्षेपणास्त्रांचा प्रसार झाल्यामुळे  युद्धाचे स्वरूप बदलले आहे. समजा शत्रूने प्रथम हल्ला करून एखाद्या देशाची क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेकी विमाने जमिनीवरच नष्ट केली तर शत्रूवर प्रतिहल्ला करण्यासाठी कोणते तरी साधन शिल्लक राहिले पाहिजे. या हेतूने एसएसबीएन प्रकारच्या अणुपाणबुडय़ांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला ‘न्यूक्लिअर ट्राएड’ म्हणतात. म्हणजे बॉम्बर विमाने, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि अणुपाणबुडीवरील क्षेपणास्त्रे (सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाइल – एसएलबीएम) या तीन घटकांमध्ये अण्वस्त्रे विभागून ठेवणे. यापैकी कोणतेही दोन घटक नष्ट झाले तरी तिसरा वापरता यावा. अणुपाणबुडय़ांच्या पाण्याखाली लपून राहण्याच्या अजोड क्षमतेमुळे त्यावरील बॉम्ब शत्रूच्या पहिल्या हल्ल्यात वाचण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे त्यावरून प्रतिहल्ला (सेकंड स्ट्राइक) करता येतो.

अमेरिकेने यासाठी पोलरिस, पॉसिडॉन आणि ट्रायडेंट नावाची एसएलबीएम असलेल्या अणुपाणबुडय़ा तयार केल्या. या पाणबुडय़ा पाण्याखाली असताना पाण्यावर क्षेपणास्त्र सोडू शकतात आणि ते क्षेपणास्त्र हजारो किलोमीटर अंतरावर पाण्यात किंवा जमिनीवर हल्ला करू शकते. अशा एका क्षेपणास्त्रावर एकापेक्षा जास्त अण्वस्त्रे असतात आणि ती वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकता येतात. याला मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एन्ट्री व्हेइकल (एमआयआरव्ही) म्हणतात. एका अणुबाणबुडीवर साधारण १६ ते २४ क्षेपणास्त्रे असतात आणि त्यापैकी प्रत्येकावर ८ ते १० अणुबॉम्ब असतात. ते सर्व वेगवेगळ्या लक्ष्यांवर डागता योतात. अशा प्रकारे एक पाणबुडी समुद्राच्या पाण्याखाली लपून राहून कित्येक हजार किलोमीटरवरील संपर्ण देश बेचिराख करू शकते.

रशियाची अशा प्रकारची कस्र्क नावाची पाणबुडी २००० साली बॅरंट्स समुद्रात अपघातग्रस्त होऊन बुडाली होती. या पाणबुडय़ा कायम समुद्राखाली लपून राहतात. त्यातच त्यांची खरी कसोटी असते, जेणेकरून वेळ येताच त्या त्यांच्यावरील अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे वापरू शकतील. त्यांना शोधून नष्ट करण्यासाठी हंटर किलर प्रकारच्या लहान पण वेगवान पाणबुडय़ा वापरल्या जातात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com