पक्ष्यांप्रमाणे हवेत संचार करता यावा, हे माणसाचे खूप पूर्वीपासूनचे स्वप्न. भारतीय संस्कृतीमधील पुष्पक विमानाप्रमाणे जगभरातील विविध देश आणि संस्कृतींमध्ये तशा संकल्पनांचे उल्लेख आढळतात. ग्रीक मिथकांमध्ये दीदालस आणि त्याचा पुत्र इकारस यांची गोष्ट आहे. क्रीट बेटावरील कैदेतून सुटका करण्यासाठी दीदालस पिसांचे पंख बनवून ते दोघांच्या हातांना मेणाने जोडतो. त्याच्या मदतीने दोघे बेटावरून उडून जात असतात. पण उत्साहाच्या भरात इकारस वडिलांची सूचना अव्हेरून सूर्याच्या खूप जवळ जातो आणि त्याच्या पंखांचे मेण वितळून तो समुद्रात पडतो आणि बुडून मरतो. त्यावरून ‘डोन्ट फ्लाय टू क्लोज टू द सन’ ही म्हण अस्तित्वात आली.

पण हवेत विहार करण्याच्या कल्पनेतील उत्सुकता आणि थरारच इतका होता की, अनेक जणांनी इकारससारखा वेडेपणा प्रत्यक्षात मोठय़ा हौसेने केला आणि त्यात हातपाय किंवा जीव गमावला. एकोणिसाव्या शतकात हातांना कृत्रिम पंख बांधून उंचावरून उडी मारणाऱ्या अशा ‘टॉवर जंपर्स’चे पेवच फुटले होते. युरोपीय रेनेसाँच्या काळात लिओनार्दो-द-विन्चीसारख्या तत्त्वज्ञाने विमान आणि हेलिकॉप्टरचे कल्पनाचित्र बनवले होते. मोठय़ा फुग्यांमध्ये गरम हवा भरून ते हवेत उडवण्याची कला उदयास आली होती. पण हवेपेक्षा जड कोणतीही वस्तू उडू शकणार नाही, हा समज ठाम होता. औद्योगिक क्रांतीच्या आसपास जड वस्तू  हवेत उडण्याची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी दोन प्रकारचे प्रयत्न होत होते. पक्ष्यांप्रमाणे शरीराला पंख बांधून ते फडकावत उडणे (फ्लॅपिंग विंग्ज) हा प्रकार अव्यवहार्य असल्याचे लवकरच लक्षात आले. दुसरा पर्याय होता पंखांना यांत्रिक शक्ती देऊन उडणे (पॉवर्ड विंग्ज फ्लाइट). एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक धाडसी प्रयोगवीरांनी ग्लायडर यशस्वीपणे उडवले होते. पण ते पूर्णपणे हवेच्या झोतांवर अवलंबून होते. त्यावर फारसे नियंत्रण नव्हते. मशिनगनचे जनक हिरम मॅग्झिम यांना विमान उड्डाणातही रस होता आणि ते ‘पॉवर्ड फ्लाइट’ या संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते होते.

हे तंत्र सर्वप्रथम यशस्वी केले ते अमेरिकेतील ऑरविल आणि विल्बर राइट या बंधूंनी. सायकल दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या उद्यमींनी उत्तर कॅरोलिनातील किटी हॉक येथे १७ डिसेंबर १९०३ रोजी त्यांच्या ‘द फ्लायर’ या पहिल्या विमानाचे यशस्वी उड्डाण करून दाखवले. तत्पूर्वी त्यांनी ‘बॉक्स काइट’ आणि ‘राइट ग्लायडर’ या साधनांनिशी उड्डाणाचे प्रयोग केले होते. पंखांच्या साधारण २०० आकारांचे नमुने (एरोफॉइल सेक्शन्स) सायकलवरून वाऱ्यात धरून आणि ‘विंड टनेल’मध्ये तपासले होते. विमान वळवण्यासाठी पंखांना किंचित दुमडण्याचे (विंग वार्पिग) तंत्र शोधले होते. त्यांच्या उड्डाणाने नवे दालन खुले केले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com