कोरिया आणि व्हिएतनामच्या युद्धांत सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ आणि त्यानंतर मिग-२५ विमानांचा सामना करताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन अमेरिकेने एफ-१५ ईगल आणि एफ-१६ फायटिंग फल्कन (किंवा व्हायपर) या विमानांची निर्मिती केली. या दोन्ही विमानांची रचना हवाई लढाईत प्रभुत्व मिळवण्याच्या उद्देश्याने (एअर सुपेरिऑरिटी फायटर म्हणून) केली होती. या दोन्ही विमानांनी ती अपेक्षा तर पूर्ण केलीच, पण जोडीला जमिनीवरील हल्ल्यांसाठीची (ग्राऊंड अ‍ॅटॅक) उपयुक्तताही सिद्ध केली. त्यामुळे १९७० च्या दशकापासून एफ-१५ आणि एफ-१६ ही विमाने अमेरिकी हवाई प्रभुत्वाचे मुख्य आधारस्तंभ बनली आहेत.

दुसऱ्या महायुद्धापासून १९६० च्या दशकापर्यंत अमेरिकेचा कल अधिक वेग, उंची आणि अंतर गाठू शकणारी विमाने तयार करण्याकडे होता. एफ-१५ च्या बाबतीत प्रथमच ही भूमिका बदलून हवेतील लढाईसाठीचे (डॉगफायटर) विमान तयार केले गेले. त्यासाठी विमान वेगवान, हलके, शक्तीशाली तसेच चपळ (मनुव्हरेबल) असणे गरजेचे होते. मॅकडोनेल डग्लस (आता बोईंग) कंपनीकडून निर्मित एफ-१५ विमाने १९७४ मध्ये अमेरिकी हवाईदलात सामील झाली. एफ-१५ ध्वनीच्या अडीचपट (माक २.५) म्हणजे ताशी २६६० किमी वेगाने प्रवास करू शकते. एफ-१५ एका मिनिटात ३०,००० फूट उंची गाठते. त्याचा पल्ला ५५०० किमी आहे. म्हणजेच एकदा इंधन भरले की एफ-१५ अमेरिकेतून अटलांटिक महासागर पार करून युरोपमध्ये पोहोचते. त्याच्या बांधणीत मजबूत आणि टिकाऊ टायटॅनियम धातूचा वापर केला आहे.   मात्र एफ-१५ हे विमान एफ-१४ टॉमकॅटप्रमाणेच खूप महाग आहे.

अमेरिकेला किफायतशीर पण प्रभावी विमानाची गरज होती. त्यातून  जनरल डायनॅमिक्स (आता लॉकहीड मार्टिन) कंपनीने एफ-१६ ची निर्मिती केली. ती १९७९ मध्ये अमेरिकी हवाईदलात दाखल झाली. एफ-१६ हे विमान एफ-१५ पेक्षा आकाराने लहान आणि अधिक चपळ आहे. या दोन्ही विमानांवर शक्तिशाली प्रॅट अँड व्हिटनी इंजिने आहेत.  ते एफ-१६ ला ताशी २१२५ किमी वेग प्रदान करते. त्याची रचना हलक्या पण टिकाऊ अ‍ॅल्युमिनियमच्या मिश्रधातूंपासून केली आहे. एफ-१६ चे मुख्य पंख फ्युजलाजशी बेमालूमपणे संयोग (मर्ज) पावतात. त्यामुळे त्याला हवेत अधिक उठाव (लिफ्ट) मिळतो. या दोन्ही विमानांमध्ये कॉकपिटचे काचेचे आवरण (कॅनॉपी) बबल-शेप्ड आहे. त्यामुळे वैमानिकाला चौफेर दृष्टी लाभते. कॉकपिटमध्ये हेड अप डिस्प्ले (एचयूडी), फ्लाय-बाय-वायर प्रणाली, आधुनिक रडार, संवेदक, संगणकावर आधारीत  नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अँड काऊंटरमेजर्स आदी अत्याधुनिक यंत्रणा आहेत. या विमानांवर शक्तीशाली कॅनन, स्पॅरो आणि साइडवाईंडर क्षेपणास्त्रे, स्मार्ट आणि लेझर गायडेड बॉम्ब असा शस्त्रसंभार आहे. या दोन्ही विमानांनी सीरिया, इराक, अफगाणिस्तान, बोस्निया आदी संघर्षांत महत्त्वाची कामगिरी केली. ती इस्रायल, सौदी अरेबिया, जपान, तैवान, दक्षिण कोरिया आदी देशांना निर्यात केली गेली. इस्रायलने १९८१ साली इराकमधील ओसिरक अणुभट्टी नष्ट करण्यासाठी हिच विमाने वापरली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com