15 February 2019

News Flash

मिग-२९ फल्क्रम

‘नाटो’ संघटनेच्या देशांची विमानेही करू शकत नव्हती अशा अनेक हवाई कसरती मिग-२९ लीलया करू शकत होते.

मिग-२९ फल्क्रम

पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले आणि १९९० मध्ये सोव्हिएत प्रभावाखालील पूर्व जर्मनीच्या हवाईदलातील मिग-२९ लढाऊ विमाने पश्चिम जर्मनीच्या (त्यावेळी एकत्रित जर्मनीच्या) हाती पडली. या निमित्ताने पाश्चिमात्य देशांना सोव्हिएत विमानांचे सखोल परीक्षण करण्याची प्रथमच संधी  मिळाली. आजवर अमेरिकेच्या गुणात्मक वरचढ शस्त्रांना सोव्हिएत युनियन अधिक संख्याबळाने उत्तर देत होते. पण मिग-२९ ची कामगिरी पाहून पाश्चिमात्य लष्करी तज्ज्ञ अवाक झाले. ‘नाटो’ संघटनेच्या देशांची विमानेही करू शकत नव्हती अशा अनेक हवाई कसरती मिग-२९ लीलया करू शकत होते. अमेरिकी एफ-१५ आणि एफ-१६ विमानांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘नाटो’ने या विमानाला ‘फल्क्रम’ असे नाव दिले.

मिग-२९ इतके प्रभावी होते की सोव्हिएत युनियन फुटल्यानंतर स्वतंत्र झालेल्या मोल्डोव्हा या देशाकडील मिग-२९ इराणच्या हाती पडू नयेत म्हणून ती अमेरिकेने हस्तगत केली. सोव्हिएत युनियनने ती यापूर्वीच बल्गेरिया, पूर्व जर्मनी, क्युबा, रुमानिया, पोलंड, स्लोव्हाकिया, पेरू, सीरिया, हंगेरी, इराण, इराक, उत्तर कोरिया, मलेशिया यांच्यासह भारताला निर्यात केली होती. भारतीय हवाईदलात मिग-२९ ‘बाझ’ नावाने ओळखले जाते. त्याची मिग-२९-के आणि केयूबी ही नौदलासाठीची आवृत्ती आयएनएस विक्रमादित्यवर आहे. ही विमाने गोव्यातील आयएनएस हंसा या तळावर तैनात असतात.

सोव्हिएत युनियनने त्यांची जुनी होत चाललेली मिग-२१, २३ आणि सुखोई-१५ ही विमाने बदलण्यासाठी आणि अमेरिकेच्या एफ-१५ आणि एफ-१६ विमानांना उत्तर देण्यासाठी १९७० च्या दशकात मिग-२९ विकसित करण्यास सुरुवात केली. मिग-२९ च्या पहिल्या प्रारूपाने १९७७ साली उड्डाण केले आणि त्यात अनेक सुधारणा करून १९८५ च्या दरम्यान ही विमाने सोव्हिएत हवाईदलात सामील झाली. मिग-२९ ची रचना फ्रंटलाइन एअर सुप्रीमसी अ‍ॅण्ड ग्राऊंड कॉम्बॅट एअरक्राप्ट म्हणून केली होती. तसेच युद्धक्षेत्रात नुकसानग्रस्त धावपट्टय़ांवरून उडण्याची क्षमता त्यात आहे. त्यासाठी त्याचे वजन कमी, वेग अधिक आणि चपळ हालचाली करण्यासाठी उपयुक्त रचना आहे.

मिग-२९ चे फ्युजलाज आणि पंख एकत्र मिसळले आहेत. त्यामुळे त्याला ४० टक्के लिफ्ट (उठाव) फ्युजलाजमुळे मिळते. त्याची दोन क्लिमोव्ह आरडी-३३ टबरेफॅन इंजिने त्याला ताशी २४५० किमी (माक २.३) इतका वेग प्रदान करतात. त्याच्या जेट इंजिनांमध्ये हवा आत घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. धावपट्टीवरून वेग घेताना इंजिनमध्ये धूळ-माती जाऊ नये म्हणून जेटचे मुख्य दार (इनलेट) बंद होऊन पंख्यावरील खाचांमधून हवा आत येते.

मिग-२९ ची कमी वेगात, कमी उंचीवर लढण्याची क्षमता अजोड आहे. बरेचदा त्यानेच हवाई लढाईतील निकाल ठरतो. त्याची ‘थ्रस्ट-व्हेक्टरिंग’ प्रणाली जेटचा बाहेर पडणारा झोत हव्या त्या बाजूला वळवून विमान कमी जागेत वळवण्यास मदत करते. त्याचे रडार २४५ किमीवरील १० लक्ष्यांचा एकावेळी वेध घेऊ शकते. वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवरील खास यंत्रणेमुळे वैमानिकाची नजर ज्या लक्ष्यावर स्थिरावेल त्याच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले जाते. मिग-२९ वर ३००० किलो वजनाचे बॉम्ब, रॉकेट, हवेतून हवेत आणि जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आदी शस्त्रसंभार आहे. मिग-२९ हे सोव्हिएत तंत्रज्ञांच्या क्षमता सिद्ध करणारे विमान आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

First Published on August 24, 2018 12:55 am

Web Title: different types of weapons part 88