04 March 2021

News Flash

पॅनएव्हिया टॉर्नेडो

टबरे युनियन या कंपनीने टॉर्नेडोसाठी रोल्स रॉइसच्या धर्तीवर टबरेजेट इंजिने तयार केली.

पॅनएव्हिया टॉर्नेडो

ब्रिटन, जर्मनी (तत्कालीन पश्चिम जर्मनी) आणि इटली या युरोपीय देशांनी संयुक्तरीत्या १९६०च्या दशकात विकसित केलेले पॅनएव्हिया टॉर्नेडो हे बहुउद्देशीय लढाऊ विमान (मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट) आजही जगातील प्रभावी विमानांमध्ये गणले जाते. बोस्निया, कोसोवो, इराक, अफगाणिस्तान आदी संघर्षांत या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली.

ब्रिटन आणि जर्मनीच्या हवाई दलांकडून १९६०च्या दशकात वापरली जाणारी स्टारफायटर आणि बकनियर ही विमाने त्या काळात सोव्हिएत युनियनच्या विमानांच्या तुलनेत जुनी होत चालली होती. ती बदलण्यासाठी त्यांना नवी विमाने हवी होती. नव्या, अत्याधुनिक विमानाच्या संशोधन आणि विकासाचा खर्च वाटून घेण्यासाठी आणि तंत्रज्ञानात भागीदारी करण्यासाठी ब्रिटन, जर्मनी आणि इटलीने एकत्र येऊन १९६८ मध्ये पॅनएव्हिया ही कंपनी स्थापन केली. अशा प्रकारे एकत्र येऊन, विविध अडचणींवर मात करून लढाऊ विमान विकसित केल्याचे हे मोठो आणि यशस्वी उदाहरण मानले जाते. टॉर्नेडो १९७९-८०च्या दरम्यान ब्रिटन, जर्मनी आणि इटलीच्या हवाईदलांत सामील झाली.

टबरे युनियन या कंपनीने टॉर्नेडोसाठी रोल्स रॉइसच्या धर्तीवर टबरेजेट इंजिने तयार केली. अशी दोन इंजिने टॉर्नेडोला ताशी कमाल २३३६ किमी वेग आणि २७७८ किमीचा पल्ला मिळवून देतात. दोन मिनिटांत ३० हजार फूट या वेगाने टॉर्नेडो कमाल ५० हजार फूट उंची गाठू शकते.

सोव्हिएत युनियनच्या रडारना चकवा देऊन, त्यांच्या भूप्रदेशात खोलवर घुसून रडार, विमानवेधी तोफा आणि क्षेपणास्त्रे, धावपट्टय़ा अशी लक्ष्ये नष्ट करणे हे टॉर्नेडोचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यासाठी जमिनीपासून कमी उंचीवरून उड्डाणाची क्षमता महत्त्वाची होती. ते साध्य करण्यासाठी टॉर्नेडोवर शक्तिशाली डॉप्लर रडारबरोबरच टेरेन फॉलोइंग रडार (टीएफआर) आणि ग्राऊंड मॅपिंग रडार (जीएमआर) आहेत. त्यांच्या मदतीने टॉर्नेडो झाडांच्या उंचीवरूनही (१०० ते २०० फूट) ध्वनीच्या वेगाने उडू शकते. याशिवाय टॉर्नेडोवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), लेझर रेंज फाइंडर, थर्मल इमेजिंग सिस्टम, फ्लाय बाय वायर आदी अत्याधुनिक यंत्रणा आहेत. तसेच शत्रूची रडार यंत्रणा निष्प्रभ करण्यासाठी स्काय शॅडो रडार जॅमिंग पॉड्स आहेत.

टॉर्नेडो फायटर, इंटरसेप्टर, बॉम्बर, टेहळणी अशा विविध भूमिकांमध्ये वापरता येते. त्यावर २७ मिमी व्यासाची कॅनन, पेव्हवे-२/३ हे लेझर गायडेड बॉम्ब आणि ब्रिमस्टोन हे रणगाडाविरोधी अस्त्र बसवता येते. टॉर्नेडोवरून साइडवाइंडर, स्टॉर्म शॅडो आणि अलार्म (एअर-लाँच्ड अँटी-रेडिएशन मिसाइल) ही क्षेपणास्त्रे डागता येतात. ब्रिटिश हवाईदलातील टॉर्नेडो विमानांनी १९९१च्या आखाती युद्धात इराकवर १५०० बॉम्बफेकी मोहिमा राबवल्या. त्यात इराकी क्षेपणास्त्रांनी सहा टॉर्नेडो विमाने पाडली. पुढे २००३ साली इराकविरोधी कारवाईत पुन्हा टॉर्नेडो वापरली गेली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:00 am

Web Title: different types of weapons part 91
Next Stories
1 फ्रेंच मिराज-२००० : अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान
2 अत्याधुनिक सुखोई-२७ लढाऊ विमान
3 मिग-२९ फल्क्रम
Just Now!
X