अमेरिकेचे एफ-१४ टॉमकॅट हे लढाऊ विमान अत्याधुनिक आणि प्रभावी असले तरी त्याची किंमत खूप जास्त होती. त्यामुळे ते मोठय़ा संख्येने सेनादलांना पुरवणे खर्चीक होते. त्याला पूरक म्हणून तितकेच प्रभावी, पण निर्मिती आणि देखभाल-दुरुस्तीला सोपे विमान हवे होते. त्या गरजेतून अमेरिकेच्या एफ/ए-१८ हॉर्नेट या लढाऊ विमानाची रचना करण्यात आली. हे विमान लढाऊ (फायटर) आणि जमिनीवरील हल्ले (ग्राऊंड अ‍ॅटॅक) अशा दोन्ही भूमिकांमध्ये तितक्याच कार्यक्षमतेने वापरता येते. त्यामुळे त्याच्या नावात ‘एफ’ आणि ‘ए’ ही दोन्ही अक्षरे वापरली आहेत. त्याची सुधारित आवृत्ती एफ/ए-१८ ई/एफ सुपर हॉर्नेट नावाने प्रचलित आहे. त्यातील ‘ई’ आणि ‘एफ’ ही अक्षरे अनुक्रमे सिंगल सीट आणि डबल सीट प्रकारांसाठी आहेत. ही दोन्ही विमाने विमानवाहू नौकांवरून वापरता येतात.

एफ/ए-१८ हॉर्नेट विमानाच्या विकासाला १९७० च्या दशकात सुरुवात झाली. त्या वेळी त्याची निर्मिती करणाऱ्या नॉरथ्रॉप या कंपनीकडे विमानवाहू नौकांवरील विमाने बनवण्याचा अनुभव नव्हता. म्हणून त्यांनी मॅकडोनेल डग्लस (आताचे नाव बोइंग) या कंपनीबरोबर सहकार्य करून एफ/ए-१८ हॉर्नेट तयार केले. नॉरथ्रॉप कंपनीच्या वायएफ-१७ या विमानावरून एफ/ए-१८ हॉर्नेट हे विमान विकसित करण्यात आले आहे. या विमानांचे उत्पादन १९८० च्या दरम्यान सुरू झाले. एफ/ए-१८ हॉर्नेट विमानावर जनरल इलेक्ट्रिकची एफ-४०४ टबरेफॅन इंजिने वापरली असून त्याचा थ्रस्ट-टू-वेट रेशो उत्तम (९:१) आहे.

तसेच त्याच्या रचनेत हायब्रिड किंवा स्ट्रेक प्रकारचे पंख वापरले आहेत. पंखांवरील लिडिंग एज एक्स्टेन्शन्समुळे या विमानाला असामान्य चपळाई लाभली आहे. त्याचा वेग ताशी १९१५ किमी इतका असून ते १०२० किमी त्रिज्येच्या क्षेत्रात प्रभावीपणे लढू शकते. एफ/ए-१८ हॉर्नेटचा प्रति तास उड्डाणाचा खर्च एफ-१४ टॉमकॅटच्या तुलनेत ४० टक्के कमी, तर देखभाल-दुरुस्तीचा वेळ ७५ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र कमी उंचीवरील, वेगवान उड्डाणात हॉर्नेट युरोपीय देशांच्या पॅनएव्हिया टॉर्नेडोइतके परिणामकारक नाही.

हॉर्नेटवर २० मिमी कॅनन, विविध प्रकारचे बॉम्ब, स्पॅरो, साइडवाइंडर, एआयएम-१२० प्रकारची क्षेपणास्त्रे असा शस्त्रसंभार आहे. हॉर्नेट आणि सुपर हॉर्नेट विमाने अमेरिकेच्या कोरल सी, साराटोगा, रुझवेल्ट, निमिट्झ आदी नौकांवर वापरात आहेत. त्यांनी लिबिया, इराक, अफगाणिस्तान आदी ठिकाणच्या संघर्षांमध्ये भाग घेतला आहे. ही दोन्ही विमाने आजही अमेरिकी सेनादलांत वापरात असून सुपर हॉर्नेट यापुढेही वापरात राहतील.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com