फ्रान्सच्या दसाँ कंपनीकडून भारतीय हवाईदलासाठी विकत घेण्यात येणाऱ्या राफेल (किंवा रफाल) लढाऊ विमानांबद्दल सध्या वाद उफाळला असला तरी तांत्रिकदृष्टय़ा राफेल जगातील अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे याबाबत शंका नाही. फ्रान्सने १९८०च्या दशकात युरोपीय देशांच्या युरोफायटर टायफून या संयुक्त विमान प्रकल्पातून माघार घेऊन स्वत:चे राफेल हे विमान विकसित केले. हवाई संरक्षण, जमिनीवरील हल्ले या भूमिकांसह राफेल अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. त्यामुळे  जग्वार आणि मिराज-२००० विमाने जुनी होत असताना भारतासाठी राफेलचे विशेष महत्त्व आहे.

राफेल-ए या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण ४ जुलै १९८६ रोजी झाले. या विमानाच्या राफेल-बी (ट्विन सीट, ट्रेनर/मल्टि-रोल), राफेल-सी (सिंगल सीट, एअर डिफेन्स) आणि राफेल-एम (नौदलासाठी) अशा तीन आवृत्ती आहेत. फ्रेंच हवाईदल आणि नौदलात १९९९ ते २००५ दरम्यान २९४ राफेल सामील करण्याची योजना होती. राफेलची स्नेक्मा एम-८८-२ टबरेफॅन इंजिने त्याला ताशी कमाल २१२५ किमी इतका वेग प्रदान करतात. त्याचा पल्ला १८५० किमी (दुहेरी ३७०० किमी) आहे. ते कमाल ६५,६२० फूट (२० किमी) उंची गाठू शकते. त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) आणि त्यापुढील कॉकपिटजवळील लहान आकाराचे पंख (कॅनार्ड) त्याला उत्तम उड्डाण क्षमता मिळवून देतात. राफेल युद्धजन्य स्थितीत केवळ ४०० मीटर लांबीच्या धावपट्टीवरून हवेत झेपावू शकते.

राफेलच्या निर्मितीत प्रामुख्याने कार्बन आणि केवलार कॉम्पोझिट्सचा तसेच टायटॅनियम आणि अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातूंचा वापर केला आहे. त्यामुळे त्याची इलेक्ट्रो-मॅग्नेटिक आणि इन्फ्रा-रेड सिग्नेचर कमी होऊन त्याला स्टेल्थ क्षमता प्राप्त झाली आहे. म्हणजेच राफेल शत्रूच्या रडारवर सहजपणे न दिसता लपून हल्ले करू शकते. कॉकपिटमधील हॅण्ड्स ऑन थ्रॉटल अँड स्टिक (होटास), वाइड अँगल हेड-अप डिस्प्ले, फ्लाय बाय वायर प्रणाली आणि शक्तिशाली रडार यांनी त्यांचे नियंत्रण सुलभ होते. हेल्मेट माऊंटेड वेपन्स साइट प्रणाली वैमानिकाला केवळ नजर स्थिरावेल त्या लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता देते. लढाईच्या धामधुमीत वैमानिक विमानाच्या संगणकाला तोंडी आदेश देऊन (डायरेक्ट व्हॉइस इनपुट) विमान नियंत्रित करू शकतो. त्यावर ३० मिमी व्यासाची कॅनन, पारंपरिक किंवा स्मार्ट बॉम्ब यांच्यासह मात्रा मायका, स्काल्प, मिटिऑर, एक्झोसेट ही क्षेपणास्त्रे तसेच अण्वस्त्रे असा एकूण ६००० किलो वजनाचा शस्त्रसंभार वाहून नेता येतो.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com