News Flash

लष्करी रसदपुरवठा आणि वाहतूक विमाने

अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीचे सी-१३० हे विमान १९५०च्या दशकात वापरात आले.

अमेरिकी सी-१७ ग्लोबमास्टर

सीमेवरील किंवा युद्धक्षेत्रातील सैनिकांना वेळेवर आणि वेगाने दारुगोळा, शस्त्रास्त्रे, इंधन, अन्न, औषधे, कपडे आदी रसदपुरवठा करणारी विमाने युद्धात मोलाची कामगिरी बजावत असतात. जखमी सैनिकांना युद्धक्षेत्रातून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्यांचा हवाई रुग्णवाहिकेसारखा वापरही करता येतो. आधुनिक काळातील गतिमान युद्धात विजयी होण्यासाठी शस्त्रास्त्रांसह सैनिकांच्या मोठय़ा तुकडय़ा हव्या त्या ठिकाणी, लांब अंतरावर, त्वरित उतरवण्याची क्षमता (टॅक्टिकल अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक एअरलिप्ट केपबिलिटी) खूप महत्त्वाची ठरते. रसदपुरवठा आणि वाहतूक विमाने सैन्यदलांना ही क्षमता प्राप्त करून देतात. ही विमाने छत्रीधारी सैनिक (पॅराट्रपर्स) उतरवण्यासाठीही उपयुक्त असतात. याशिवाय ही विमाने त्यांच्यावर बसवलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने मर्यादित स्वरूपात हल्ल्यासाठीही वापरता येतात.

अमेरिकी सी-१३० हक्र्युलस, सी-१७ ग्लोबमास्टर, रशियन अँटोनोव्ह एएन-१२, एएन-३२, एएन-२२५, इल्युशिन आयएल-७६ आदी विमानांनी विविध देशांच्या हवाईदलांना मोठय़ा प्रमाणात रसदपुरवठा आणि वाहतुकीची क्षमता मिळवून दिली आहे.

अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीचे सी-१३० हे विमान १९५०च्या दशकात वापरात आले. तेव्हापासून विविध बदल होत ते आजतागायत सलग ६० वर्षे वापरात आहे. जगातील ६० हून अधिक देशांच्या हवाईदलांत त्याने सेवा बजावली आहे. सध्या त्याची सी-१३०-जे सुपर हक्र्यलस ही अत्याधुनिक आवृत्ती वापरात आहे. अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे सी-१७ ग्लोबमास्टर-३ हे अवजड वाहतूक विमान आहे. ते एका वेळी १०० ते १३० सैनिक किंवा एक अ‍ॅब्राम्स रणगाडा आणि ३ स्ट्रायकर चिलखती लढाऊ वाहने किंवा सहा एम-१११७ चिलखती वाहने ४५०० किमी अंतरावर वाहून नेऊ शकते.

रशियाची एएन-१२, एएन-३२ ही कमी आणि मध्यम क्षमतेची वाहतूक विमाने आहेत. तर आयएल-७६ हे अवजड वाहतूक विमान आहे. ते एका वेळी ४० ते ६० टन युद्धसामग्री ५००० किमी अंतरावर वाहून नेऊ शकते. एएन-२२५ हे जगातील सर्वात मोठे वाहतूक विमान ४६,००० घनफूट आकाराची किंवा २०० टन वजनाची सामग्री ४००० किलोमीटरवर वाहून नेऊ शकते. भारतीय हवाईदलात एएन-३२, आयएल-७६, सी-१३०, सी-१७ ही विमाने वापरात आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:45 am

Web Title: different types of weapons part 97
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : हवेत उड्डाणादरम्यान इंधन भरणारी विमाने
2 गाथा शस्त्रांची : शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी विमाने
3 गाथा शस्त्रांची : पाणबुडीविरोधी टेहळणी विमाने
Just Now!
X