व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने वापरलेल्या अनेक हेलिकॉप्टरमध्ये ह्य़ूज ओएच-६ कायूज या हेलिकॉप्टरचा प्रामुख्याने समावेश होतो. अमेरिकी सैन्याला १९६० च्या दशकात वजनाला हलके, टेहळणी हेलिकॉप्टर (लाइट ऑब्झव्‍‌र्हेशन हेलिकॉप्टर) हवे होते. त्यासाठी १२ कंपन्या स्पर्धेत होत्या. त्यामधून ह्य़ूज कंपनीच्या मॉडेल ३६९ या हेलिकॉप्टरची १९६५ मध्ये निवड करण्यात आली.

अंडाकार असल्याने त्याला फ्लाइंग एग असे टोपणनाव होते. त्याचा हवाई टेहळणी, तोफखान्याला लक्ष्य शोधण्यासाठी मदत करण्यासाठी, शत्रूच्या तोफा आणि सैनिक शोधण्यासाठी अशा कामांसाठी वापर केला गेला. दोन कर्मचाऱ्यांसह चार प्रवाशांना घेऊन ते ताशी २४४ किमी वेगाने ६११ किमी अंतर कापू शकत असे. त्यावर मशीनगन आणि ग्रेनेड लाँचरही बसवता येत असे. त्याने त्याला माफक प्रमाणात हल्ल्याची क्षमता मिळत होती.

कायूज हे नाव अमेरिकेतील स्थानिक आदिवासी टोळीवरून घेतले होते. हे हेलिकॉप्टर वापरण्याची विशिष्ट पद्धत अमेरिकी सैन्याने तयार केली होती. कायूज आणि बेल कोब्रा ही लढाऊ हेलिकॉप्टर एकत्र मोहिमेवर जात असत. त्यात कायूज कमी उंचीवरून प्रवास करत जमिनीवरील शत्रू शोधत असे. त्यावेळी कोब्रा हेलिकॉप्टर थोडय़ा अधिक उंचीवरून त्यांना हवाई संरक्षण देत. कायूजवर शत्रूने जमिनीवरून गोळीबार केला की ती अधिक उंचीवर जात आणि कोब्रा हेलिकॉप्टर खाली येऊन शत्रूचा नाश करत.

सिकोस्र्की सीएच-५४ ए ताऱ्हे हे हेलिकॉप्टर हवाई क्रेन म्हणून वापरले गेले. त्याचे पहिले उड्डाण मे १९६२ मध्ये झाले. त्यातील ताऱ्हे हे नाव अमेरिकेतील स्थानिक आदिवासी शब्दावरून घेतले आहे. हे हेलिकॉप्टर युद्धक्षेत्रात तोफा, चिलखती वाहने, नादुरुस्त विमाने, होलिकॉप्टर, रसद, दारूगोळा आदींची वाहतूक करत असे. त्याच्या पुढील भागात वैमानिकाचे केबिन होते आणि त्यामागील भागात मोठय़ा खाचेसारखी मोकळी जागा होती. तेथे अडकवून सामानाची वाहतूक केली जात असे.