आधुनिक युद्धात वैमानिकरहित विमानांना बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना ड्रोन, पायलटलेस प्लेन, रिमोटली पायलटेड व्हेईकल (आरपीव्ही) किंवा अनमॅन्ड एरिअल व्हेईकल (यूएव्ही) म्हणतात. लढाऊ विमाने किंवा हेलिकॉप्टर शत्रूच्या प्रदेशावर टेहळणी किंवा हल्ल्यासाठी पाठवताना त्यांच्या वैमानिकांना जिवाचा धोका पत्करावा लागतो. वैमानिकरहित विमाने वापरल्यास तो धोका कमी होऊन विमानांची अनेक कामे करणे शक्य आहे.

हे उपयोग लक्षात घेऊन भारतात स्वदेशी ड्रोन तयार करण्याच्या कामाला १९७० आणि १९८० च्या दशकांतच प्रारंभ झाला होता. सुरुवातीला विविध शस्त्रांच्या परीक्षणासाठी कृत्रिम लक्ष्य म्हणून किंवा पायलटलेस टार्गेट एअरक्राफ्ट (पीटीए) यारूपात ड्रोन तयार करण्यात आले. त्यानंतर हवाई टेहळणी आणि तोफखान्याला तोफगोळे डागण्यात आणि नेम सुधारण्यास मदत करण्यासाठी ड्रोनचा विकास होऊ लागला.

दरम्यानच्या काळात भारतीय सेनादलांत इस्रायलकडून घेतलेले सर्चर मार्क-१ आणि मार्क-२ तसेच हेरॉन या प्रकारचे ड्रोन वापरात आहेत. स्वदेशी ड्रोननिर्मितीचा कार्यक्रम संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंटतर्फे (एडीई) राबवण्यात येत आहे. त्यातून प्रथम लक्ष्य नावाच्या ड्रोनची निर्मिती झाली. त्याला लहान रॉकेटच्या मदतीने गती देण्यात येते आणि हवाई भ्रमणानंतर त्याला पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरवून घेतले जाते. लक्ष्य ध्वनीच्या ०.७ पट वेगाने, १५० किमी अंतरावर आणि ९००० मीटर उंचीवर टेहळणी करू शकतो. १९९०च्या दशकात लक्ष्य तयार होऊन त्याच्या प्राथमिक आवृत्ती सेनादलांत सामील करण्यात आल्या. त्यात सुधारणा करून लक्ष्य-१ आणि लक्ष्य-२ हे ड्रोन तयार केले जात आहेत.

यानंतर निशांत नावाच्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली. त्याचा वापर हवाई टेहळणी, तोफखान्याला मदत, हवाई छायाचित्रण, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हेरगिरी आदी कामांसाठी केला जातो. निशांतला हायड्रे-न्यूमॅटिक प्रणालीद्वारे हवेत सोडून पॅराशूटच्या मदतीने उतरवून घेतले जाते. तो हवेत साडेचार तास विहार करू शकतो.

सध्या रुस्तम-१ आणि २ या  नावांच्या स्वदेशी, अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती केली जात आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळूरुचे माजी प्राध्यापक डॉ. रुस्तम दमानिया यांच्या नावाने या ड्रोनची निर्मिती केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने एलसीआरए नावाचे विमान तयार केले होते. त्यावरून रुस्तम ड्रोनचा विकास केला जात आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com