भविष्यातील शस्त्रांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेल गनचा प्रामुख्याने समावेश असेल. या तोफा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालतील आणि कोणतेही स्फोटक नसलेले धातूचे तोफगोळे अत्यंत वेगाने दूरवर फेकून मोठे नुकसान घडवू शकतील.

सध्याच्या तोफांमध्ये तोफगोळा डागण्यासाठी गन पावडर किंवा अन्य स्फोटकांचा वापर केला जातो. तोफगोळ्याच्या आवरणात भरलेल्या स्फोटकांचा तोफेच्या नळीत स्फोट होऊन तोफगोळ्याला गती मिळते. त्याशिवाय तोफेच्या गोळ्यातही स्फोटके असतात. त्यांचा लक्ष्यावर आघात झाल्यावर स्फोट होऊन मोठे नुकसान होते. रेल गनच्या तोफगोळ्याला डागण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही स्फोटकाची गरज नसते. तसेच लक्ष्याचे नुकसान करण्यासाठी त्यात कोणतीही स्फोटके भरलेली नसतात.

रेल गनच्या रचनेत धातूच्या दोन रुळांसारख्या पट्टय़ा एकमेकांना समांतर अवस्थेत बसवलेल्या असतात. त्यामुळे या प्रकारच्या तोफेला रेल गन म्हणतात. या धातूच्या पट्टय़ांची एका बाजूची टोके विद्युतप्रवाहाच्या स्रोताला जोडलेली असतात. धातूच्या दोन पट्टय़ा किंवा रेलमध्ये विद्यतप्रवाह वाहून नेऊ शकेल अशा धातूचे आर्मेचर बसवलेले असते. त्यावर धातूचा तोफगोळा असतो. या यंत्रणेला एका बाजूने खूप जास्त प्रमाणात म्हणजे साधारण १० लाख अँपियर इतक्या क्षमतेचा विद्युतप्रवाह पुरवला जातो. हा विद्युतप्रवाह दोन्ही पट्टय़ा (रेल) आणि त्यांच्यामधील आर्मेचर आणि तोफगोळ्यातून वाहून सर्किट पूर्ण करतो. त्याने खूप शक्तिशाली विद्युतचुंबकत्व (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम) तयार होते आणि त्या शक्तीने तोफगोळा प्रचंड वेगाने बाहेर फेकला जातो. अशा प्रकारे तोफगोळ्याला गती देण्यासाठी स्फोटकांची गरज लागत नाही. तसेच तोफगोळ्याच्या आतही स्फोटके भरलेली नसतात. तोफगोळा भरीव धातूचा असतो. तो केवळ गतिज ऊर्जेच्या (कायनेटिक एनर्जी) जोरावर लक्ष्याचे नुकसान करतो. अशा तोफगोळ्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या सातपट (माक ७) असतो. स्फोटके वापरलेल्या तोफगोळ्याचा वोग सेकंदाला २ किलोमीटरच्या आसपास असतो, तर रोल गनचा तोफगोळा सेकंदाला ३ किमीहून अधिक वेगाने प्रवास करतो. रेग गनच्या तोफगोळ्याचा पल्लाही अधिक म्हणजे सध्या साधारण १०० ते १५० किमीपर्यंत आहे. भविष्यात तो बराच वाढवण्याचे प्रयत्न आहेत.

रेल गनमध्ये किंवा तिच्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके वापरावी लागत नसल्याने पारंपरिक तोफगोळ्यांच्या वाहतूक आणि साठवणुकीत येणाऱ्या अडचणी रेल गनच्या तोफगोळ्यांसाठी जाणवत नाहीत. त्यांचा खर्चही कमी असल्याने अधिक तोफगोळे वापरता येऊ शकतात. त्याचा युद्धाच्या निर्णयावर चांगला परिणाम होऊ शकतो. अमेरिका, रशिया, चीन आणि भारतासह अनेक प्रमुख देशांत रेल गनवर संशोधन सुरू आहे. सध्या त्यात अनेक अडचणीही आहेत. रेल गनसाठी खूप जास्त क्षमतेचा विद्युतप्रवाह वापरावा लागत असल्याने त्यातून मोठय़ा प्रमाणावर उष्णता निर्माण होते. त्याने रेल गनचे तसेच तोफगोळ्याचेही नुकसान होते. त्यामुळे तोफेचे आयुष्य कमी होते. उष्णतेमुळे तोफ शत्रूच्या शोधक यंत्रणांना (थर्मल इमेजर्स) सापडण्याची शक्यता वाढते. तसेच विद्यतप्रवाहाचा शक्तिशाली स्रोत गरजेचा असल्याने रेल गनचा आकारही मोठा आहे. सध्या तो युद्धभूमीवर वापरास सोयीचा नाही. तसेच या तोफगोळ्यांना दिशादर्शनाची यंत्रणा विकसित करणे हेदेखिल आव्हान आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com