उझी सब-मशीनगन ही इस्रायलच्या सैन्यदलांकडून जगाला मिळालेली अमोघ देणगी आहे. चहुबाजूंनी अरब शत्रुराष्ट्रांनी घेरलेल्या चिमुकल्या इस्रायलची जीवनरेखा मजबूत करण्यात या बंदुकीचा मोठा हात आहे. तसेच जगातील सुमारे ९० देशांच्या सुरक्षादलांनी या बंदुकीचा स्वीकार केला आहे. भारतातही पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपच्या (एसपीजी) कमांडोंकडून उझीच्या विविध अवतारांचा वापर होत होता.

शतकानुशतकांचा वनवास संपून अखेर १९४८ साली ज्यूंना इस्रायलच्या रूपात त्यांची हक्काची भूमी मिळाली. पण राष्ट्रनिर्मितीच्या दुसऱ्याच दिवशी शेजारी अरब देशांनी त्याच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न केला. या संघर्षांवेळी इस्रायलकडे पुरेशी शस्त्रे नव्हती. मिळेल तेथून चोरूनमारून, नक्कल करून, किबुत्झमधील जमिनीखालील तळघरांत तयार केलेल्या शस्त्रांनिशी ज्यू स्त्री-पुरुषांनी प्रतिकार केला. त्यात जर्मन माऊझर, अमेरिकी टॉमी गन, ब्रिटिश स्टेन गन आदींचा समावेश होता. पण नंतर इतक्या शस्त्रांचा दारूगोळा जमवणे अवघड झाले. त्यामध्ये एकवाक्यता आणण्याची गरज होती. त्या गरजेपोटी इस्रायली सैन्यातील मेजर उझीएल गाल यांनी १९४० च्या दशकाच्या अखेरीस उझी ही सब-मशीनगन डिझाइन केली. तिचे पहिले प्रारूप १९५० च्या आसपास तयार झाले आणि प्रत्यक्ष उत्पादनास १९५४ मध्ये सुरुवात झाली. त्याच वेळी ती इस्रायली संरक्षण दलांनी स्वीकारली. सुरुवातीला आरिएल शेरॉन यांच्या नेतृत्वाखालील युनिट १०१ नावाच्या कमांडो पथकाने ती पॅलेस्टिनी हल्लेखोरांविरुद्ध वापरली. त्यानंतर १९५६ चे सुएझ युद्ध, १९६७ चे सहा दिवसांचे युद्ध (सिक्स डे वॉर) आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध यात उझीने इस्रायलच्या सेना दलांना खूप आधार दिला.

उझी सब-मशीनगनमध्ये दोन महत्त्वाच्या तंत्रांचा विकास साधला आहे. पहिले तंत्र म्हणजे रॅपअराउंड किंवा टेलिस्कोपिक बोल्ट. या प्रकारात रायफलचा बोल्ट बॅरलच्या मागील किंवा ब्रिचकडील भागाच्या भोवतीने एखाद्या दुर्बीण किंवा टेलिस्कोपप्रमाणे बसवलेला असतो. त्यामुळे बंदुकीची लांबी कमी करता येते. सब-मशीनगनसाठी ही बाब महत्त्वाची असते. त्याने बंदुकीचा समतोल पिस्टल ग्रिपभोवती साधता येतो आणि नेम धरण्याची क्षमता सुधारते. दुसरी बाब म्हणजे उझीचे मॅगझिन पिस्तूलप्रमाणे बंदुकीच्या ग्रिपमध्ये बसवता येते.

उझीच्या मॅगझिनमध्ये २५ ते ३२ गोळ्या मावतात. उझी मिनिटाला ६०० च्या वेगाने गोळ्या झाडू शकते. तरीही ती बऱ्यापैकी स्थिर असून तिचा धक्का (रिकॉइल) कमी आहे. त्यामुळे अचूकताही चांगली आहे. तसेच तिचा आकार लहान असल्याने ती खंदकांत आणि कमी जागेत फिरवून वापरता येते. त्यामुळे कमांडो पथकांची ती आवडती बंदूक आहे. वापरण्यास सोपी असल्याने इस्रायली संरक्षण दलांत भरती होणाऱ्या महिला सैनिकांना प्रथम उझी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

सचिन दिवाण
sachin.diwan@ expressindia.com