दुसऱ्या महायुद्धानंतर पिस्टन इंजिनावर चालणाऱ्या विमानांचा वापर मागे पडून जेट इंजिनावर आधारित विमाने वापरात येऊ लागली. प्रथम जर्मनीने त्यात आघाडी घेतली असली तरी युद्धातील पराभवानंतर जर्मनी या स्पर्धेतून बाद झाला. ब्रिटनने ग्लॉस्टर मिटिऑर हे लढाऊ जेट विमान बनवले. ब्रिटिश व्हिटल जेट इंजिनाच्या आणि युद्धात पकडलेल्या जर्मन माहितीच्या मदतीने अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, फ्रान्स आदी देशांनी जेट विमाने बनवली. त्यातून अमेरिकेने एअराकॉमेट आणि शूटिंग स्टार ही, तर सोव्हिएत युनियनने इल्युशिन आयएल-२८ बीगल आणि याकोवलेव्ह याक-१५ ही विमाने साकारली. या विमानांचा वेग वाढला असला तरी अद्याप ध्वनीच्या वेगाची मर्यादा (साऊंड बॅरियर) ओलांडली गेली नव्हती.

फ्रान्सच्या दसाँ कंपनीचे मिस्टियर हे १९५२ मध्ये अस्तित्वात आलेले लढाऊ जेट विमान त्या काळातील युरोपमधील उत्तम विमान होते. त्याचा वेग ताशी १११४ किमी होता आणि त्यावर ३० मिमी व्यासाच्या दोन कॅनन, ४५० किलोचे २ बॉम्ब किंवा १२ रॉकेट्स बसवण्याची सोय होती. सुएझ कालव्यावरून १९५६ साली झालेल्या अरब-इस्रायल युद्धात फ्रेंच आणि इस्रायली मिस्टियरनी इजिप्तकडील मिग-१५ आणि मिग-१७ विमानांचा सामना केला.

ब्रिटिश हॅविलँड कंपनीच्या व्हॅम्पायर या लढाऊ जेट विमानाचे डिझाइन नावीन्यपूर्ण होते. त्याच्या हॅलफर्ड एच-१ टबरेजेट इंजिनाला पूरक अशी रचना करण्यासाठी अभियंत्यांनी ‘ट्विन बूम’ पद्धत वापरली. त्यात विमानाला दोन फ्यूजलाज असल्यासारखे दिसते. त्याने हवेचा अवरोध कमी होऊन विमानाची हालचालींतील चपळता (मनुव्हरेबिलिटी) वाढली.

कॅनबेरा हे ब्रिटनचे १९५०च्या दशकात वापरात आलेले जेट बॉम्बर होते. त्याच्या रचनेमागची संकल्पना वेगळी होती. वेग आणि उंची गाठण्याच्या क्षमतेवर ते फायटर विमानांच्या संरक्षणाविना काम करू शकत असे. याच गुणांमुळे ते एक उत्तम टेहळणी विमानही होते. ते ब्रिटनच्या हवाईदलात ५५ वर्षे सेवेत होते. ही विमाने सुएझ आणि व्हिएतनाम युद्धात वापरली गेली. ब्रिटिश हंटर हेही वैमानिकांचे आवडते लढाऊ जेट विमान होते. डब्ल्यू. ई. डब्ल्यू. पेटर यांनी डिझाइन केलेले फॉलंड नॅट हे लहान जेट इंजिनांवर आधारित फायटर विमान होते. त्याचे चापल्य पाहून भारताने ते विकत घेतले होते. नॅट-२ ची भारतीय आवृत्ती ‘अजित’ नावाने ओळखली जात होती. भारतीय हवाई दलातील नॅट, हंटर, अजित, मिस्टियर, व्हँपायर, कॅनबेरा या विमानांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टारफायटर विमानांना धूळ चारली. स्टारफायटर हे मूळचे अमेरिकी विमान अत्यंत वेगवान होते. मात्र पश्चिम जर्मनीच्या हवाईदलातील स्टारफायटरच्या सततच्या अपघातांमुळे प. जर्मनीत हे विमान ‘विडो मेकर’ म्हणून कुप्रसिद्ध होते.

sachin.diwan@ expressindia.com