News Flash

गाथा शस्त्रांची : फ्रेंच ७५ मिमी मॉडेल १८९७ तोफ

१८९७ पासून १९४० पर्यंत ती वापरात होती आणि त्या काळात अशा २१,००० हून अधिक तोफा तयार करण्यात आल्या.

गाथा शस्त्रांची : फ्रेंच ७५ मिमी मॉडेल १८९७ तोफ

प्रशियाबरोबर १८७० साली झालेल्या युद्धातील पराभवातून धडा घेऊन फ्रान्सने पुन्हा तोफांच्या विकासाकडे लक्ष पुरवले. त्यातून फ्रेंच ७५ मिमी मॉडेल १८९७ ही तोफ आकाराला आली. ती इतकी प्रसिद्ध झाली की तिला नंतर फ्रेंच ७५ किंवा नुसते ७५ म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक अर्थानी ती खरी आधुनिक फिल्ड गन होती. १८९७ पासून १९४० पर्यंत ती वापरात होती आणि त्या काळात अशा २१,००० हून अधिक तोफा तयार करण्यात आल्या.

या तोफेला हायड्रो-न्यूमॅटिक रिकॉइल कंट्रोल सिस्टिम होती. त्यात तोफेला गोळा डागल्यानंतर बसणारा झटका शोषला जाई. त्यामुळे आता प्रत्येक वेळी गोळा डागल्यानंतर ११८० किलो वजनाची संपूर्ण तोफ मागे सरकत नसे आणि सैनिकांना ती ढकलून परत जागेवर आणावी लागत नसे. हा त्रास कमी झाल्यामुळे प्रत्येक वेळी नेम धरण्याची गरज संपली. तो वेळ वाचला आणि तोफेचा ‘रेट ऑफ फायर’ एका मिनिटाला १५ तोफगोळे इतका वाढला. ही तोफ ५ ते ७ किलो वजनाचे गोळे ६ ते ११ किलोमीटर इतक्या अंतरावर डागू शकत असे. या तोफेला नेम धरण्यासाठी आधुनिक ‘साइटिंग सिस्टिम’ होती आणि सैनिकांना रक्षण पुरवण्यासाठी उभा लोखंडी जाड पत्राही बसवलेला होता. या तोफेची विमानवेधी आवृत्तीही १९१३ साली वापरात आली.

ऑगस्ट १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. तोपर्यंत फ्रान्सकडे अशा ४००० हून अधिक तोफा होत्या. त्यांचे दररोज २०,००० तोफगोळे तयार होत. युद्ध जसे पुढे सरकू लागले तसा १९१५ मध्ये  हा आकडा वाढून दिवसाला १ लाख तोफगोळ्यांवर गेला. पहिल्या महायुद्धातील मार्न आणि व्हर्दून येथील लढायांमध्ये फ्रान्सची मुख्य भिस्त या तोफांवर होती. व्हर्दून येथे फेब्रुवारी ते सप्टेंबर १९१६ अशा आठ महिने चाललेल्या भीषण संग्रामात फ्रेंच सैन्याने ७५ मिमी तोफांमधून एकंदर १६ दशलक्ष तोफगोळे डागले. म्हणजे फ्रान्सने या कारवाईत वापरलेल्या एकूण तोफगोळ्यांपैकी ७० टक्के गोळे ७५ मिमी तोफांमधून डागले होते. पुढील वसंतात फ्रान्सने जेव्हा व्हर्दून परिसरात आक्रमण सुरू केले तेव्हा याच ७५ मिमी तोफांमधून केवळ ३ दिवसांत ३० लाख गोळे डागले गेले. फ्रेंच सैन्याने ‘फॉस्जिन’ आणि ‘मस्टर्ड गॅस’ ही रासायनिक अस्त्रे डागण्यासाठीही याच तोफा वापरल्या.

१९१७ सालच्या वसंतात अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली. तेव्हा अमेरिकी सैन्यात फ्रेंच बनावटीच्या साधारण २००० मॉडेल १८९७  तोफा होत्या. त्यानंतर अमेरिकेतच त्यांचे परवान्याने उत्पादन होऊ लागले. अशा ११०० तोफा अमेरिकेत तयार झाल्या. त्यापैकी केवळ १४० तोफा फ्रान्समध्ये युद्धभूमीवर पोहोचल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष झालेले हॅरी ट्रमन पहिल्या महायुद्धात १२९ व्या फिल्ड आर्टिलरी तुकडीच्या ‘डी’ बॅटरीत कॅप्टन या हुद्दय़ावर होते. पहिल्या महायुद्धात १९१८ साली म्यूज-अर्गोनच्या लढाईत याच तोफांनिशी ते लढले होते.

फ्रेंच ७५ मिमी तोफ एक उत्तम फिल्ड गन होती. सपाट जमिनीवर समोरासमोरील सैन्याच्या विरोधात तिची उपयुक्तता वादातीत होती. पण तिलाही मर्यादा होत्या. ही तोफ कमी कॅलिबरची किंवा तुलनेने हलके गोळे डागणारी होती. पहिल्या महायुद्धापर्यंत खंदकांतील लढाई जोर धरू लागली होती. शत्रूच्या खंदकांमध्ये मारा करण्यास ही तोफ फारशी उपयुक्त नव्हती. त्या कामासाठी अधिक वक्राकार कक्षेत, अवजड गोळे डागणाऱ्या हॉवित्झर्सची गरज होती.

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 5:04 am

Web Title: french 75 mm field gun
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : तोफखाना : विसाव्या शतकात दमदार आगमन
2 गाथा शस्त्रांची : अमेरिकी गृहयुद्ध आणि तोफखाना
3 गाथा शस्त्रांची : क्रिमियन युद्ध आणि तोफखाना
Just Now!
X