News Flash

गाथा शस्त्रांची : फ्रान्सचा अत्याधुनिक लेक्लर्क रणगाडा

सन्मानार्थ या रणगाडय़ाला लेक्लर्क हे नाव दिले आहे.

फ्रान्स आणि जर्मनी यांनी १९८० च्या दशकात रणगाडानिर्मितीचा संयुक्त प्रकल्प हाती घेतला होता. तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर फ्रान्सने स्वत:चा लेक्लर्क नावाचा रणगाडा तयार केला. जगातील सध्याच्या काही अत्याधुनिक रणगाडय़ांमध्ये त्याचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या ताब्यात गेलेला फ्रान्स नंतर मित्रदेशांनी मुक्त केला. त्यावेळी जर्मन सैन्याकडून पॅरिस जिंकून परत घेण्याची जबाबदारी फ्री फ्रेंच २ आर्मर्ड डिव्हिजनचे सेनानी जनरल फिलिप लेक्लर्क यांनी पार पाडली होती. त्यांच्या सन्मानार्थ या रणगाडय़ाला लेक्लर्क हे नाव दिले आहे.

लेक्लर्कचा मुख्य भर संरक्षण आणि गतिमानतेवर आहे. त्याच्या चिलखताबाबत नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी ते कॉम्पोझिट, मोडय़ूलर प्रकारचे असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनने त्यांच्या चॅलेंजर रणगाडय़ासाठी विकसित केलेले ‘चोभम’ नावाचे खास चिलखत फ्रान्सने नाकारले होते. लेक्लर्कवर १२० मिमी व्यासाची मुख्य तोफ आणि दोन मशिनगन आहेत. त्याच्या तोफेत गोळे भरण्याची यंत्रणा स्वयंचलित असल्याने तो चालवण्यास चारऐवजी तीनच कर्मचारी पुरतात. लेक्लर्कची स्मूथ बोअर गन एका मिनिटात १२ तोफगोळे डागू शकते. त्याची तोफगोळे डागण्याची प्रणाली संगणकीकृत आहे. त्यात लेझर रेंज फाईंडर आणि बॅलिस्टिक कॉम्प्युटरच्या मदतीने लक्ष्याचा वेध घेतला जातो. तसेच रणगाडा गतिमान असताना तोफ कोणत्याही दिशेने स्थिर राहून लक्ष्याचा वेध घेऊ शकते. आधुनिक गन स्टॅबिलायजेशन सिस्टममुळे हे शक्य होते. लेक्लर्क ताशी ७२ किमीच्या वेगाने एका दमात ४५० किमी अंतर पार करू शकतो.

लेक्लर्कवर ‘फाईंडर्स’ (फास्ट इन्फर्मेशन, नेव्हिगेशन, डिसिजन, अँड रिपोर्टिग सिस्टम) नावाची ‘बॅटलफिल्ड मॅनेजमेंट सिस्टम’ आहे. लेक्लर्क फ्रान्सच्या ‘जीआयएटी’ कंपनीने (आताचे नाव नेक्स्टर सिस्टम्स) तयार केला आहे. त्याच कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. त्यात रणगाडय़ाच्या कमांडरला डिजिटल स्क्रीनवर युद्धक्षेत्राचा नकाशा दिसतो. त्यावर त्याचा स्वत:चा रणगाडा, त्याच्या देशाच्या आणि शत्रूच्या सैन्याची स्थिती, संभाव्य लक्ष्ये आदी माहिती दिसते. त्याने त्याची मोहीम अधिक यशस्वी होण्यास मदत होते.

लेक्लर्क वाळवंटातील लढाईसाठी अत्यंत उपयोगी मानला जातो. त्यामुळेच संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) या रणगाडय़ाला पसंती दिली आहे. फ्रान्स आणि यूएईच्या लेक्लर्क रणगाडय़ांनी युरोपमधील कोसोवो येथील संघर्षांत आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. लेक्लर्क जगातील सर्वात महाग रणगाडा मानला जातो. २०११ साली एका लेक्लर्कची किंमत ९.३ दशलक्ष युरो इतकी होती.

sachin.diwan@expressindia.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:44 am

Web Title: french lynch tank
Next Stories
1 इस्रायलच्या लष्करी ताकदीचे प्रतीक : मर्कावा रणगाडा
2 लेपर्ड-२ : जर्मन अनुभव आणि अभियांत्रिकीचा मिलाफ
3 शीतयुद्धातील ‘नाटो’ देशांचे रणगाडे
Just Now!
X