फ्रिगेट या प्रकारच्या युद्धनौका प्रथम १७ व्या शतकात तयार झाल्या. त्यानंतर त्यात बदल होत आजच्या आधुनिक फ्रिगेटपर्यंत प्रवास झाला. या दोन्ही काळातील फ्रिगेट्समध्ये गल्लत करता कामा नये.

सतराव्या शतकात शिप-ऑफ-द-लाइन प्रकारच्या मोठय़ा युद्धनौका नौदलातील प्रमुख नौका (कॅपिटल शिप) म्हणून वापरात होत्या. त्या बऱ्याच मोठय़ा आणि अवजड असत. साहजिकच त्यांचा वेग आणि हालचालींची क्षमता मर्यादित असे. अशा अनेक मोठय़ा युद्धनौकांचा ताफा समुद्रात मोहिमेवर असताना त्यांची मुख्य अडचण असे ती शत्रूला शोधणे. त्या काळात संवादाची साधने खूपच अप्रगत होती. तारायंत्र, रेडिओ, रडार, सोनार आदी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपापल्या नौकांमध्ये संपर्क राखणे आणि शत्रूच्या नौका शोधून काढणे हे अवघड काम होते. त्यासाठी काही हलक्या आणि वेगवान नौका मुख्य ताफ्याच्या पुढे टेहळणीसाठी (स्काऊटिंग) पाठवणे गरजेचे असे. या नौका मुख्य ताफ्याच्या आसपासचा प्रदेश पिंजून काढून शत्रूची चाहुल  लागताच मुख्य ताफ्यास सूचना देऊन सावध करत असत. काही वेळा त्यांचे स्वत:चेच शत्रूशी दोन हात होत असत. अशा वेळी त्यांनी स्वसंरक्षणासाठी आणि प्रतिहल्ल्यासाठी सज्ज असणे गरजेचे होते. त्यासाठी या नौकांवर माफक संरक्षक आवरण असे आणि त्या तोफांनी सज्ज असत. त्यांच्यावर मुख्य युद्धनौकेपेक्षा कमी तोफा असत आणि त्या एकाच मजल्यावर (डेकवर) लावलेल्या असत.

१७३० च्या दशकात फ्रान्सने प्रथम फ्रिगेट्सचा वापर सुरू केला. त्यावर तीन डोलकाठय़ा, ३२ तोफा आणि साधारण २०० खलाशी असत.   त्यांची बांधणी, आकार आणि वेगामुळे विविध कामे करू शकत.  मुख्य ताफ्याच्या पुढे राहून टेहळणी करणे, प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी आपल्याच वेगवेगळ्या युद्धनौकांवर संदेशांची दवाणघेवाण करण्यासाठी हेलपाटे मारणे, प्रसंगी प्रत्यक्ष युद्धात भाग घेणे, हल्ल्यात नादुरुस्त झालेल्या युद्धनौकांना ओढून युद्धक्षेत्रातून बाजूला सुरक्षित स्थळी नेणे, आपल्या व्यापारी जहाजांना संरक्षण देणे आणि शत्रूची व्यापारी जहाजे लुटणे आदी कामे त्या करत असत.

फ्रिगेट्सची उपयुक्तता पाहून ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांची नक्कल केली. त्या काळात युद्धनौकांच्या दोन्ही बाजूंना तोफा बसवलेल्या असल्याने त्यांच्या भाराने नौका दोन्ही बाजूंना झुकून मधून फुगत असे. त्याला ‘हॉगिंग’ म्हणतात. ते होऊ नये म्हणून अमेरिकी बोट डिझायनर जोशुआ हंफ्रेज यांनी फ्रिगेट बांधणीची विशेष पद्धत विकसित केली. त्यातून अमेरिकेच्या यूएसएस कॉन्स्टिटय़ूशनसारख्या सुपर फ्रिगेट्स अस्तित्वात आल्या.

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com