जगातील सर्वात प्रसिद्ध पिस्तुलांमध्ये जर्मन वॉल्थर पिस्तुलांचे स्थान नक्कीच अव्वल आहे. कार्ल वॉल्थर यांनी १८८६ साली स्थापन केलेल्या या कंपनीची पिस्तुले आजही जगभरात वापरात आहेत. त्यांच्या विविध सुधारित आवृत्तींचे आता अमेरिका, फ्रान्ससह अन्य देशांमध्येही उत्पादन होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्येसाठी वॉल्थर पीपीके हे पिस्तूल वापरले होते. इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या काल्पनिक पात्राच्या हाती सुरुवातीला .२५ बरेटा ४१८ पिस्तूल दिले होते. पुढे शस्त्रास्त्रतज्ज्ञ जॉफ्रे बूथरॉइड यांच्या सूचनेनंतर फ्लेमिंग यांनी डॉ. नो या कादंबरीपासून बॉण्डच्या हाती वॉल्थर पीपीके हे पिस्तूल दिले. तेव्हापासून जेम्स बॉण्डचे पिस्तूल म्हणून वॉल्थर पीपीके प्रसिद्ध आहे.

वॉल्थर पीपी हे पिस्तूल १९२९ साली प्रथम बाजारात आले. वॉल्थर पोलीस पिस्टल असे त्याचे पूर्ण नाव होते. ते प्रामुख्याने जर्मन पोलीस अधिकाऱ्यांसाठी तयार केले होते. अत्यंत सुबक आणि सुटसुटीत डिझाइनचे हे पिस्तूल तितकेच भक्कम बांधणीचे आणि वापरास खूपच प्रभावी होते. त्याची लांबी साधारण साडेसहा इंच तर वजन अवघे ०.६८२ किलोग्रॅम होते. त्यात ८ गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन बसत असे आणि हे सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल ब्लो-बॅक अ‍ॅक्शन तंत्रावर चालत असे. त्याच्या विविध आवृत्तींमध्ये ९ मिमी शॉर्ट, ७.६५ मिमी, ६.३६ मिमी आणि ०.२२ इंच अशा कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. पण वॉल्थर पीपीमध्ये प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी (७.६५ मिमी व्यास आणि १७ मिमी लांबीचे) काडतूस वापरले जायचे. सुरुवातीला पोलिसांसाठी तयार केलेल्या या पिस्तुलाचे गुण लवकरच जर्मन सेनादलांनीही हेरले आणि लष्करासह जर्मन हवाईदलात म्हणजे लुफ्तवाफमध्ये वॉल्थर पीपी प्रसिद्ध झाले.

१९३० साली त्याची वॉल्थर पीपीके (पोलीस पिस्टल कुर्झ) ही आवृत्ती वापरात आली. जर्मन भाषेत कुर्झ म्हणजे लहान किंवा आखूड. मूळ पीपी पिस्तुलापेक्षा पीपीके लांबीला थोडे लहान होते. त्याच्याही विविध कॅलिबरच्या आवृत्ती असल्या तरी त्यात प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी हे काडतूस वापरले जायचे. वॉल्थर पीपीकेचे वजन केवळ ०.५६८ किलोग्रॅम होते. त्यात ७ गोळ्यांचे मॅगझिन बसवले जायचे. त्याची सेफ्टी कॅच म्हणजे सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी होती.

याशिवाय १९३८ साली वॉल्थर पी-३८ नावाचे पिस्तूलही वापरात आले. ते प्रामुख्याने आधीच्या जर्मन लुगर पिस्तुलांना पर्याय म्हणून विकसित झाले होते. डबल अ‍ॅक्शन ट्रिगर, इंडिकेटर पिन असलेली हॅमर सेफ्टी आदी वॉल्थर पिस्तुलांची खासियत होती. डबल अ‍ॅक्शन प्रकारात ट्रिगर दाबल्यावर बंदूक कॉक आणि फायर दोन्ही होते. म्हणजे ट्रिगर आणि हॅमरचे काम एकाच वेळी होते. तर हॅमर सेफ्टी इंडिकेटर पिनमुळे पिस्तूल भरलेले आहे की रिकामे आहे हे कळत असे.

वॉल्थर पिस्तुलांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचे प्रमुख पिस्तूल म्हणून काम केले. नाझी सेनादलांचे आणि राजवटीचे ते एक दृश्यचिन्ह म्हणून आकारास आले. त्याची परिणामकारता इतकी चांगली होती की आजही अमेरिकेत स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीतर्फे आणि फ्रान्समध्ये मॅनुऱ्हिन कंपनीतर्फे त्यांचे उत्पादन होते.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com