05 December 2020

News Flash

अब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे!

बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली.

४४ कॅलिबर डेरिंजर

अमेरिकेतील सुरुवातीच्या बंदूक निर्मात्यांनी १८५० च्या आसपास आणि त्यानंतर त्या देशाचा विस्तार होण्यास आणि यादवी युद्धात विजय होण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. पण अमेरिकेला यादवी युद्धात विजय मिळवून देणाऱ्या अब्राहम लिंकन या माजी अध्यक्षांना त्यापैकीच एका शस्त्राला बळी पडावे लागले.

अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बंदूक निर्माते हेन्री डेरिंजर (Henry Deringer) यांनी १८३० च्या दशकात आकाराने लहान, वापरास सुटसुटीत आणि एकच गोळी झाडू शकणारी पिस्तुले बनवली. नंतर तशा प्रकारची विविध कंपन्यांनी बनवलेली अनेक पिस्तुले बाजारात आली. त्यात एक किंवा दोन बॅरलमधून एक अथवा दोनच गोळ्या झाडता येत. लहान आकारामुळे ती बरीच लोकप्रिय झाली. बूथने वापरलेले डेरिंजर  .४४ कॅलिबरचे होते. सध्या ते जेथे लिंकन यांची हत्या झाली त्याच्या खालील मजल्यावरील फोर्ड््स थिएटर म्युझियममध्ये मांडलेले आहे.

त्याचप्रमाणे फ्रान्समधील कॅसिमिर लिफॉशो (Casimir Lefaucheux) यांनी १८२० च्या दशकात पिनफायर काटिर्र्ज तयार केले. ते वापरण्यासाठी अनेक बंदुका तयार झाल्या. त्यापैकी एक म्हणजे लिफॉशो पिनफायर रिव्हॉल्व्हर. बंदुकांच्या इतिहासात हे काही विशेष प्रभाव पाडणारे शस्त्र नव्हते. मात्र ते कायमचे लक्षात राहिले आहे ते प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट वॅन गॉ (किंवा गॉख – Vincent van Gogh) यांनी आत्महत्येसाठी वापरले म्हणून. गॉ यांनी २९ जुलै १८९० रोजी पॅरिसच्या जवळ मोकळ्या मैदानात स्वत:च्या छातीत ७ मिमी लिफॉशो पिनफायर पॉकेट रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. मात्र त्या काळात या रिव्हॉल्व्हरला कोणी फारसे गांभीर्याने घेत नव्हते. त्याच्या गोळ्यांनी माणूस मरण्याची शाश्वती नसे. त्यामुळे दुकानदार वगैरे मंडळी चोराचिलटांना हुसकावून लावण्यासाठी ते वापरत. त्यामुळे गोळी झाडून घेतल्यावर गॉ हॉटेलवर परतले आणि अनेक तासांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या चित्रांप्रमाणेच लिफॉशो रिव्हॉल्व्हरलाही अजरामर करून गेले.

सचिन दिवाण- sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2018 2:20 am

Web Title: gun that shot abraham lincoln and vincent van gogh
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : बर्मिंगहॅमचा गन क्वार्टर आणि वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट
2 गाथा शस्त्रांची : स्मिथ अ‍ॅण्ड वेसन : मॉडेल १, २, ३ रिव्हॉल्व्हर्स
3 स्मिथ अँड वेसन : व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे
Just Now!
X