आधुनिक युद्धशास्त्रात तोफखान्याला (Artillery) अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वत:च्या ठाण्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे आणि पायदळाच्या शस्त्रांच्या टप्प्यापलीकडे दूरच्या लक्ष्यांवर संहारक मारा करून त्यांना नेस्तनाबूत करण्यात तोफखाना मोठी भूमिका बजावतो. त्यायोगे लढाईचा निर्णय फिरवण्यातही तोफखान्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

तोफखान्याचे अस्तित्व मानवी इतिहासाइतकेच जुने असल्याचे मानले जाते. कारण हाताने दगड भिरकावणे हासुद्धा तांत्रिकदृष्टय़ा तोफखान्याचाच आद्य प्रकार आहे. त्यानंतर थोडय़ा सुधारित स्वरूपात किल्ल्याची तटबंदी किंवा वेढा फोडण्यासाठी वापरली जाणारी कॅटापुल्ट, बॅलिस्टा, मँगोनेल, ओनेगर, ट्रेब्युशे आदी यंत्रेही तोफखान्याचेच रूप होते. चीनमधील किमयागारांनी साधारण नवव्या शतकात (इ.स. ८५०) गनपावडरचा शोध लावला. इ.स. १००० च्या आसपास तिचा वापर विध्वंसक कामांसाठी होऊ लागला. त्यातून सुरुवातीचे प्राथमिक अवस्थेतले अग्निबाण, तोफा, बंदुका आणि बॉम्ब बनवले गेले. चीनच्या साँग घराण्याच्या शासकांनी ११३२ साली डिआनच्या वेढय़ात जिन लोकांविरुद्ध सर्वप्रथम गनपावडरचा लष्करी वापर केला. मध्य आशियातील मंगोल आणि पश्चिम आशियातील मुस्लीम शासकांच्या माध्यमातून त्यांचा जपान, भारत आणि युरोपमध्ये प्रसार झाला. सुरुवातीच्या हातात धरण्याच्या तोफांना किंवा बंदुकांना हँड कॅनन, हँड गन अथवा आक्र्विबस (arquebus) म्हणत.

तोफखान्याच्या वापरामुळे लढाईचे पारडे फिरल्याची अनेक उदाहरणे देता येतील. ऑटोमन तुर्क सम्राट मेहमत याने १४५३ साली आशिया आणि युरोप या खंडांना जोडणारे काँस्टँटिनोपोल हे शहर ख्रिश्चनांकडून जिंकून घेतले. काँस्टँटिनोपोलची भक्कम तटबंदी फोडण्यात तुर्काच्या तोफखान्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ साली बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी यांच्यात झाले. बाबरचे सैन्य लोधीच्या तुलनेत खूप कमी होते. मात्र बाबरने ऑटोमन तुर्क सेनानी उस्ताद अली कुली याच्या नेतृत्वाखाली तोफखाना वापरला. तोफांच्या आवाजाने लोधीच्या सैन्यात मोठय़ा प्रमाणावर असलेले हत्ती बिथरले आणि रणभूमीत सैरावैरा पळू लागले. त्यांच्या पायाखाली लोधीचेच सैनिक चिरडून मेले. कमी संख्येच्या बाबरच्या सैनिकांनी लोधीचा पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया रोवला.

युरोपमध्ये नेपोलियन बोनापार्टच्या काळापर्यंत तोफखान्याचा बराच विकास झाला होता आणि त्याचा वापरही वाढला होता. एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक आणि धातुशास्त्रातील प्रगतीबरोबरच तोफखानाही आधुनिक बनत गेला. ब्रिटिश तंत्रज्ञ विल्यम आर्मस्ट्राँग यांनी १८५४ साली तोफेला रायफलिंग करण्याचे तंत्र शोधले. म्हणजेच तोफेच्या आतील पृष्ठभागावर सर्पिलाकार आटे किंवा खाचा पाडल्या जाऊ लागल्या. त्याने पल्ला आणि अचूकता वाढली. जर्मन उद्योजक आल्फ्रेड क्रुप यांनी १८५६ साली ब्रीच-लोडिंग गन तयार केली. म्हणजे तोफेत पुढील बाजूकडून गोळा भरण्याऐवजी (मझल-लोडिंग) मागील बाजूने गोळा भरण्याची सोय केली. तोफ डागल्यानंतर झटका बसून ती मागे सरकण्याचा परिणाम (मझल किंवा रिकॉइल) कमी करण्यासाठी फ्रेंचांनी १८९७ सालापर्यंत हायड्रोन्यूमॅटिक रिकॉइल कंट्रोल सिस्टीम वापरात आणली. या सुधारणांनंतर पल्ला, मारक क्षमता, हाताळण्यातील सुलभता या बाबतींत तोफा खूपच सरस बनल्या होत्या.

सचिन दिवाण : sachin.diwan@expressindia.com