23 January 2021

News Flash

एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने

भारताकडे स्वदेशी बनावटीचे सुपरसॉनिक (स्वनातीत) लढाऊ विमान असावे यासाठी १९५० च्या दशकापासूनच प्रयत्न सुरू होते.

भारताकडे स्वदेशी बनावटीचे सुपरसॉनिक (स्वनातीत) लढाऊ विमान असावे यासाठी १९५० च्या दशकापासूनच प्रयत्न सुरू होते. मात्र त्यासाठी लागणारी तांत्रिक आणि औद्योगिक पाश्र्वभूमी त्या वेळी भारतात उपलब्ध नव्हती. विदेशी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे होते. म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रसिद्ध जर्मन एरोनॉटिकल इंजिनीअर कुर्त टँक यांना भारतात पाचारण केले. टँक यांनी दुसऱ्या महायुद्धात गाजलेली जर्मन फॉक-वुल्फ एफडब्ल्यू-१९० आणि टीए-१५२ यांसारखी लढाऊ विमाने डिझाइन केली होती. त्यांच्यासह १८ जर्मन तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल- त्या वेळचे नाव हिंदुस्तान एअरक्राफ्ट लि.) मध्ये १९५६-५७ साली नव्या विमानाच्या रचनेला सुरुवात झाली. ध्वनीच्या दुप्पट वेगाने (माक-२) प्रवास करू शकेल अशा, सर्व वातावरणांत वापरता येणाऱ्या, बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यातून एचएफ-२४ मरुत या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती झाली.

१७ जून १९६१ रोजी मरुतच्या प्रारूपाची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि १ एप्रिल १९६७ रोजी पहिले मरुत विमान भारतीय हवाई दलात सामील झाले. १९७५ पर्यंत साधारण १०० मरुत विमानांचे उत्पादन झाले आणि ही विमाने १९९०च्या दशकापर्यंत हवाई दलाच्या सेवेत होती. त्यांचा १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात वापरही झाला. या युद्धात मरुतने पाकिस्तानकडील अमेरिकी एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टारफायटर विमानांचा मुकाबला केला. याच युद्धात मरुतने राजस्थानमधील सीमेवरील लोंगेवाला येथील लढाईतही भाग घेतला.

मरुत हे एक प्रभावी विमान होते. मरुतचे ७० टक्के भाग स्वदेशी बनावटीचे होते. ते १२,२०० मीटर (४०,००० फूट) उंचीपर्यंत उड्डाण करू शकत असे. त्याचा पल्ला १००० किमी होता. त्यावर ३० मिमी व्यासाच्या ४ कॅनन (तोफा), ६८ मिमी व्यासाची ५० रॉकेट यासह अन्य शस्त्रास्त्रे बसवता येत. तशा प्रकारचे महासत्तांच्या बाहेर विकसित झालेले ते पहिलेच लढाऊ विमान होते. मात्र भारतीय हवाई दलाच्या सर्व अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा सर्वाधिक वेग ताशी १११२ किमी होता. म्हणजेच मरुत कधीही सुपरसॉनिक वेग (ताशी १२३५ किमी म्हणजे माक-१) गाठू शकले नाही. त्याची रोल्स-रॉइस ब्रिस्टॉल ऑर्फियस ७०३ टबरेजेट इंजिने तेवढी शक्तिशाली नव्हती. भारताने १९७४ साली पोखरण येथे केलेल्या पहिल्या अणुस्फोटानंतर लादण्यात आलेल्या र्निबधांनंतर त्यांचे सुटे भाग मिळवणेही अवघड झाले. अपुऱ्या वेगामुळे हे विमान फायटरऐवजी बॉम्बर किंवा ग्राऊंड अटॅक भूमिकेत अधिक वापरले गेले.

भारतीय हवाई दलात १९६०-७०च्या दशकांत ब्रिटिश फॉलंड/हॉकर सिडले बनावटीची नॅट ही लढाऊ विमाने वापरात होती. त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. या विमानांची नॅट-२ ही सुधारित आवृत्ती देशातच बनवण्यासाठी एचएएलने १९७४ साली ब्रिटनशी करार केला. या विमानाला भारताने अजित असे नाव दिले. भारतीय हवाई दलात साधारण ९० अजित विमाने १९९० च्या दशकापर्यंत वापरात होती. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात वापर झाला नाही.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2018 12:42 am

Web Title: hal hf 24 marut
Next Stories
1 अरिहंत अणुपाणबुडी
2 आयएनएस कोलकाता
3 विजयंता आणि अर्जुन रणगाडे
Just Now!
X