23 September 2020

News Flash

गाथा शस्त्रांची : हायपरसॉनिक शस्त्रे

भारतासह अनेक देशांत संशोधन सुरू असून सध्या रशिया, चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतली आहे.

हायपरसॉनिक वेगाने प्रवास करणारी शस्त्रे

सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com

शस्त्रांच्या विकासात पल्ला (रेंज), अचूकता (अ‍ॅक्युरसी) आणि संहारकता (लिथॅलिटी) यांच्याबरोबरच वेग (स्पीड) या घटकालाही तितकेच महत्त्व आहे. त्या संदर्भात हायपरसॉनिक वेगाने प्रवास करणारी शस्त्रे ही भविष्यातील गरज बनली आहे. त्यावर भारतासह अनेक देशांत संशोधन सुरू असून सध्या रशिया, चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतली आहे.

लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीच्या वेगाच्या तुलनेत मोजला जातो. कोरडय़ा हवेत, २० अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग एका सेकंदाला ३४३ मीटर (म्हणजे ताशी १२३५ किलोमीटर) इतका असतो. त्याला माक किंवा मॅच १ असे म्हणतात. त्याच्या पटीत विमानाचा किंवा क्षेपणास्त्राचा वेग माक २.३ इत्यादी असल्याचे म्हटले जाते. ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाला सबसॉनिक तर ध्वनीपेक्षा अधिक वेगाला सुपरसॉनिक (स्वनातीत) म्हटले जाते. ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट किंवा त्याहून अधिक (माक ५ ते माक २५ या मर्यादेतील वेगाला) हायपरसॉनिक वेग म्हणतात. लढाऊ विमाने वेगाने प्रवास करताना त्यांच्या टोकाला हवेचा शंकूच्या आकाराचा पडदा तयार होत असतो. ध्वनीच्या वेगाची मर्यादा (साऊंड बॅरियर) पार करताना हा हवेचा पडदा फाटून जोरात आवाज होतो. त्याला सॉनिक बूम म्हणतात आणि त्याने जमिनीवरील घरांच्या काचांची तावदाने आदी फुटू शकतात. या वेगानुसार शस्त्रांची सबसॉनिक, सुपरसॉनिक किंवा हायपरसॉनिक अशी विभागणी केली जाते.

अमेरिकेचे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र सबसॉनिक वेगाने प्रवास करते. २० ऑगस्ट १९९८ रोजी अमेरिकेला टॉमहॉकच्या मर्यादा लक्षात आल्या. त्या दिवशी पूर्व अफगाणिस्तानमधील अल-कायदाच्या तळावर ओसामा बिन लादेन उपस्थित असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. त्यानुसार तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अरबी समुद्रातील युद्धनौकेवरून टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश दिला. पण टॉमहॉकला ताशी ५५० मैलांच्या वेगाने प्रवास करून त्या तळावर हल्ला करण्यास दोन तास लागले. क्षेपणास्त्र तळावर पडण्याच्या एक तास आधीच लादेन तेथून निघून गेला होता. त्यानंतर अमेरिकेला आणि अन्य देशांनाही हायपरसॉनिक शस्त्रांची गरज जाणवू लागली. हायपरसॉनिक (माक ६) वेगाने प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्राला १००० किमी अंतर कापण्यासाठी केवळ ९ मिनिटे ३० सेकंद लागले असते.

सध्याची अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हायपरसॉनिक आहेत. मात्र त्यांचा प्रवासमार्ग (ट्रॅजेक्टरी) बराचसा अंदाज बांधण्याजोगा असल्याने त्यांना पाडता येते. भविष्यातील हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे किंवा शस्त्रे हवेत मार्ग बदलून शत्रूच्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना चकवा देऊ शकतील. त्यामुळे त्यांची बचावाची आणि शत्रूवर हल्ल्याची शक्यता वाढेल. यासाठी अनेक शक्यता आजमावून पाहिल्या जात आहेत. हायपरसॉनिक शस्त्र नेहमीच्या क्षेपणास्त्रातून ठरावीक उंचीवर सोडून तेथून ते हायपरसॉनिक वेगाने प्रवास करू शकेल. त्याला हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल म्हणतात. हायपरसॉनिक वेग गाठण्यासाठी सध्याच्या गती देणाऱ्या यंत्रणा (प्रॉपल्शन सिस्टिम्स) उपयोगी नाहीत. त्यासाठी स्क्रॅमजेट किंवा एअर ब्रिदिंग रॉकेट यंत्रणा वापरावी लागते. त्यात नेहमीप्रमाणे रॉकेटवर द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजन वाहून नेले जात नाहीत. त्याऐवजी हे वायू वातावरणातून वेगळे करून वापरले जातात. हायपरसॉनिक वेग, त्याने निर्माण होणारी प्रचंड उष्णता आणि दाब (हाय ग्रॅव्हिटेशन फोर्स) सहन करू शकतील असे धातू आणि यंत्रे बनवणे हे सध्या मोठे आव्हान आहे. ते पेलण्यावरच हायपरसॉनिक शस्त्रांचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:01 am

Web Title: hypersonic weapons
Next Stories
1 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेल गन
2 गाथा शस्त्रांची : भविष्यातील शस्त्रे
3 गाथा शस्त्रांची : गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे
Just Now!
X