भारताच्या तिन्ही सेनादलांमध्ये स्वदेशीकरणाच्या बाबतीत नौदलाने आघाडी घेतली आहे. प्रोजेक्ट-१५ अंतर्गत नौदलाने १९८० च्या दशकापासून मुंबईतील माझगाव गोदीत आयएनएस दिल्ली, म्हैसूर आणि मुंबई या दिल्ली वर्गातील विनाशिका बांधल्या. त्यापुढे नव्या सहस्रकात प्रोजेक्ट-१५-एच्या माध्यमातून कोलकाता वर्गातील कोलकाता, कोची आणि चेन्नई या अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिकांची बांधणी केली. प्रोजेक्ट-१५-बी अंतर्गत विशाखापट्टणम वर्गातील विशाखापट्टणम, मार्मुगाव, पारादीप आणि पोरबंदर या स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. तसेच प्रोजेक्ट-१७ मध्ये शिवालिक वर्गातील शिवालिक, सातपुडा आणि सह्य़ाद्री या स्टेल्थ फ्रिगेट बांधण्यात आल्या. त्यापुढील प्रोजेक्ट-१७ एमध्ये आणखी सुधारणा केलेल्या ७ स्टेल्थ फ्रिगेट बांधल्या जात आहेत. याशिवाय कामोर्ता वर्गातील पाणबुडीविरोधी कॉव्र्हेट प्रकारच्या युद्धनौका, विक्रांत ही स्वदेशी विमानवाहू नौका आणि अरिहंत अणुपाणबुडी हे प्रकल्प नौदलाच्या स्वदेशीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आयएनएस कोलकाता ही भारताची सर्वात आधुनिक विनाशिका मानली जाते. १६ ऑगस्ट २०१४ रोजी ती नौदलात दाखल झाली. तिच्या बांधणीत स्टेल्थ तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ती शत्रूच्या रडारवर सहजपणे दिसत नाही. तिचे वजन (डिस्पेसमेंट) ७५०० टन आणि लांबी १६३ मीटर आहे. तिचा वेग ताशी ३० नॉट्सहून अधिक असून ती एका वेळी १५,००० किमी प्रवास करू शकते. तिच्यावर २५० अधिकारी आणि नौसैनिक तैनात करता येतात. शत्रूची जहाजे, पाणबुडय़ा आणि विमाने शोधण्यासाठी त्यावर इस्रायली ईएल-एम-२२४८ एमएफ-स्टार हे मल्टिफंक्शन अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अॅरे रडार, एलडब्ल्यू-०८ डी बँड एअर सर्च रडार, हम्सा-एनजी सोनार, अत्याधुनिक संवेदक (सेन्सर) आदी यंत्रणा आहेत. शत्रूची विमाने पाडण्यासाठी त्यावर इस्रायलच्या मदतीने विकसित केलेली बराक-८ ही ९० किमी पल्ला असलेली क्षेपणास्त्रे आहेत. त्यासह रशियाच्या सहकार्याने तयार केलेली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. कोलकातावर ७६ मिमी व्यासाची ओटो-मेलरा प्रकारची मुख्य तोफ आहे. त्यासह एके-६३० प्रकारच्या मशिनगन आहेत. शत्रूच्या पाणबुडय़ांचा नाश करण्यासाठी मार्क-४६ प्रकारचे पाणतीर (टॉर्पेडो) आणि आरबीयू-६००० प्रकारची रॉकेट्स आहेत. याशिवाय सी-किंग, चेतक किंवा ध्रुव या प्रकारची दोन हेलिकॉप्टर ठेवण्याची क्षमता आहे. आयएनएस कोलकात्याची तुलना अमेरिकी अर्ले बर्क आणि चिनी टाइप-५२-डी या अत्याधुनिक युद्धनौकांशी केली जाते.
सचिन दिवाण
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 4, 2018 12:31 am