जगभरात कालानुरूप शस्त्रास्त्रांच्या विकासात कसे बदल होत गेले आणि त्यांनी युद्धावर कसा परिणाम घडवला याचा आढावा घेतल्यानंतर भारतात त्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे, हेही जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. यात प्राचीन आणि मध्ययुगीन काळापेक्षा आधुनिक काळातील घडामोडी जाणून घेणे गरजेचे आहे. ब्रिटिश राजवटीत भारतात अनेक ठिकाणी शस्त्रनिर्मिती आणि दारूगोळा कारखाने सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर त्यात थोडी भर पडून त्यांचे व्यवस्थापन ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाकडून (ओएफबी) केले जाते. या संरक्षणसामग्री उत्पादन कारखान्यांमध्ये पश्चिम बंगालमधील ईशापूर येथील बंदूकनिर्मिती कारखान्याची (रायफल फॅक्टरी ईशापूर – आरएफआय) कामगिरी महत्त्वाची आहे.

अठराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात स्वत:चा गन पावडर कारखाना उभा करायचा होता. त्यासाठी त्यांनी ईशापूर येथील जागा निवडली. १७१२ ते १७४४ या काळात तेथे डच ऑस्टेंड कंपनीची गन पावडर फॅक्टरी कार्यरत होती. ब्रिटिशांनी १७७८ मध्ये स्थानिक महाराजांकडून ही जमीन ताब्यात घेतली आणि तेथे १७८७ साली कारखाना उभारणीचे काम सुरू झाले. ईशापूर येथील कारखान्यात १७९१ ते १९०२ या काळात गन पावडरचे उत्पादन होत होते. तेथे १९०४ पासून बंदुकांचे उत्पादन होऊ लागले आणि कारखान्याचे नाव रायफल फॅक्टरी, ईशापूर असे करण्यात आले.

लंडनच्या उत्तरेला रॉयल स्मॉल आर्म फॅक्टरी ऑफ एनफिल्ड लॉक हा कारखाना आहे. त्याच धर्तीवर ईशापूरला एनफिल्ड ऑफ इंडिया असे म्हटले जात असे. तेथे मस्कट, रायफल्स, पिस्तूले, रिव्हॉल्व्हर, संगिनी, कुकरी आदी शस्त्रांचे उत्पादन होत असे. पहिल्या (१९१४ ते १९१८) आणि दुसऱ्या (१९३९ ते १९४५) महायुद्धात ईशापूरच्या कारखान्यात ब्रिटिश एसएमएलई किंवा एनफिल्ड .३०३ बोल्ट अ‍ॅक्शन रायफलचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झाले. त्या इंडिया पॅटर्न .३०३ रायफल्स म्हणून गाजल्या. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे या रायफल्सचे ईशापूरला उत्पादन सुरू होते आणि त्या भारतीय सैनादले आणि पोलिसांकडून वापरल्या जात होत्या.

मात्र १९६२ साली चीनबरोबरील युद्धात चिनी स्वयंचलित बंदुकांपुढे भारतीय .३०३ बोल्ट अ‍ॅक्शन रायफलच्या मर्यादा उघडय़ा पडल्या. त्यानंतर भारतीय सैन्याला स्वयंचलित रायफलची गरज भासू लागली. त्या वेळी ब्रिटिश सैन्यात एल-१ ए-१ ही रायफल वापरात होत. ती मूळ बेल्जियमच्या एफएन-एफएनएल या रायफलवर बेतलेली होती. भारतानेही या रायफलची नक्कल करून त्याची देशी आवृत्ती ईशापूर येथे तयार केली. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ७.६२ मिमी व्यासाची ही रायफल सेमी-ऑटोमॅटिक पद्धतीने चालत असे. या बंदुकीचा भारतीय सैन्याला १९६५ साली पाकिस्तानबरोबरील युद्धात बराच फायदा झाला. या कामगिरीबद्दल रायफल फॅक्टरी ईशापूरचा संसदेतही गौरवाने उल्लेख करण्यात आला आणि कारखान्याचे तत्कालीन जनरल मॅनेजर के. सी. बॅनर्जी यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतात सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) नावाने गाजलेली ही रायफल अद्याप अनेक राज्यांच्या पोलीस दलांत वापरात आहे. नवी दिल्लीतील अमर जवान ज्योती स्मारकातही हीच रायफल वापरली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com