15 December 2018

News Flash

इस्रायलची गलिल असॉल्ट रायफल

इस्रायलच्या सैन्यदलांनी १९६०च्या दशकात नव्या रायफलसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

इस्रायली सैन्यदलांचा भर १९५० आणि १९६०च्या दशकात प्रामुख्याने उझी सब-मशीनगन आणि बेल्जियमच्या एफएन-एफएएल किंवा सेल्फ लोडिंग रायफलवर होता. पण या दोन्ही बंदुकांच्या काही मर्यादा होत्या. उझी ही सब-मशिनगन प्रकारात मोडत असल्याने तिचा पल्ला कमी म्हणजे २०० मीटरच्या आसपास होता. त्यापेक्षा जास्त अंतरासाठी एफएन-एफएएल रायफल वापरता येत होती. पण ती वाळवंटातील धूळ आणि मातीप्रति खूप संवेदनशील होती. इस्रायली सैन्यदलांना वाळवंटातील वातावरणात निर्वेधपणे काम करू शकणारी आणि अधिक दूपर्यंत मारा करू शकणारी बंदूक हवी होती. या गरजेतून इस्रायलची गलिल असॉल्ट रायफल आकारास आली.

इस्रायलच्या सैन्यदलांनी १९६०च्या दशकात नव्या रायफलसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यातील एक रायफल उझी सब-मशीनगनचे डिझायनर उजीएल गाल यांनी डिझाइन केली होती. तर दुसरी इस्रायली मिलिटरी इंडस्ट्रीजचे प्रमुख शस्त्रास्त्र डिझायनर इस्रायल गलिली यांनी डिझाइन केली होती. गलिली यांची रायफल फिनलंडच्या वाल्मेट आरके ६२ असॉल्ट रायफलवर आधारित होती. आणि आरके ६२ रशियन एके-४७ वर आधारित होती. याशिवाय अमेरिकी एम १६ ए १, युजीन स्टोनर यांची स्टोनर ६३, जर्मनीची हेक्लर अ‍ॅण्ड कॉख ३३, तसेच रशियन एके-४७ या बंदुकांचाही विचार केला जात होता. अखेर १९७३ मध्ये इस्रायली सैन्यदलांनी गलिली यांच्या रायफलचा स्वीकार केला आणि तिला गलिल असे नाव दिले. मात्र १९७३ साली अरब आणि इस्रायल यांच्यात योम किप्पूरचे युद्ध उफाळले आणि गलिल सैन्याला मिळण्यास आणखी विलंब झाला. त्यामुळे इस्रायली सैन्याने गलिलचा प्रथम वापर केला तो १९८० च्या दशकातील लेबॅननमधील संघर्षांत.

गलिलमध्ये विविध असॉल्ट रायफलमधील उत्तम गुणांचा मिलाफ आहे. तिच्या गॅस आणि बोल्ट ऑपरेशन प्रणाली रशियन एके-४७ वर आधारित आहेत. गलिल मुख्यत्वे अमेरिकी ५.५६ मिमी व्यासाच्या गोळ्यांसाठी बनवली होती. पण तिच्या सुधारित आवृत्तीत ७.६२ मिमीच्या गोळ्याही वापरता येतात. गलिलला ३५ ते ५० गोळ्यांचे मॅगझिन बसते आणि ती मिनिटाला ६५०च्या वेगाने गोळ्या झाडू शकते. गलिलच्या एआर (स्टँडर्ड), एआरएम (लाइट मशिनगन), एसएआर (कार्बाइन) तसेच एमएआर (मायक्रो) अशा आवृत्तीही उपलब्ध आहेत. मायक्रो गलिल तिच्या लहान आकारामुळे कमांडो आणि चिलखती वाहनांमधील सैनिक वापरत. गॅलाट्झ ही आवृत्ती स्नायपर रायफल म्हणून वापरली जाते. मात्र गलिलचे वजन काहीसे अधिक म्हणजे ४ किलोच्या आसपास आहे. तरीही स्वदेशी रायफल म्हणून इस्रायलच्या सैनिकांनी ती आनंदाने स्वीकारली. तिच्या अनेक आवृत्ती मध्य अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशांना निर्यातही झाल्या.

sachin.diwan@expressindia.com

First Published on March 14, 2018 4:48 am

Web Title: israeli galil assault rifle